ऋतू बदलामुळे उद्भवणाऱ्या समस्या सुसह्य करण्यासाठी आणि हिवाळ्याचा आनंद घेता येण्यासाठी जीवनशैली आणि योग विषयक काही सूचना.
थंडीच्या मोसमात उबदार पांघरूणात पडून राहण्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. सकाळी आरामात ऊुठून,खिडकीतील धुक्याचा आनंद घेत गरम कॉफीचा आस्वाद घेणे, किंवा संध्याकाळी शेंगा, खजूर यावर ताव मारणे अशा अनेक रम्य गोष्टी हिवाळा घेऊन येतो. पण त्याच बरोबर कोरडी त्वचा, शुष्क ओठ, अंगदुखी, सर्दी, खोकला, साथीचा ताप आणि सांधेदुखी एवढेच नाही तर सर्वसाधारण कंटाळवाणे आणि निरुत्साही वातावरण अशा सारख्या अवांछित भेटी सुद्धा घेऊन येतो.
कफसंचयापासून मुक्त व्हा
- एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध एक कप कोमट पाण्यात मिसळा आणि प्या.
- २० तुळशी पत्र, पाच ग्रॅम आले आणि सात काळी मिरी दोन ग्लास पाण्यामध्ये उकळत ठेवा. ते मिश्रण एका ग्लास होईपर्यंत उकळा. आवश्यकता वाटल्यास मिश्रण गोड करण्यासाठी काही पदार्थ टाका आणि प्या.
हिवाळ्यात योगाभ्यास सुद्धा अतिरिक्त संरक्षक कवचाचे कार्य करतो. यामुळे शरीरातील उबदारपणा वाढतो आणि सर्वसामान्य संसर्गजन्य रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. योगावर आधारित काही उपाय आम्ही आपल्याकरिता आणले आहेत, जेणेकरून आपणास हिवाळ्याचा आनंद घेता येईल.
१. उबदार रहा
अधिक झोप घेण्याचा मोह टाळा आणि दररोजचा योगाभ्यास चुकवू नका. यामुळे शरीर उबदार राहील आणि नेहमीची दुखणे व सांध्यांमधील कडकपणा यापासून बचाव होईल. काही सूर्यनमस्कार घालून दिवसाची सुरुवात करा आणि त्याचबरोबर थोडा हलका आणि सूक्ष्म व्यायाम करा. यामुळे सामान्यतः हिवाळ्यात वृद्धांमध्ये आढळणारा सांध्यांमधील कडकपणा कमी होण्यास मदत होईल.
२. जंतूंपासून दूर राहा
हिवाळ्याबरोबरच सर्दी, खोकला, साथीचा ताप सारख्या गोष्टी येतात. नियमित योगाभ्यास केल्यामुळे शरीर सशक्त राहण्यास व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते आणि जंतुसंसर्ग पासून बचाव होऊ शकतो.
कॉलेज विद्यार्थी नीता सिंघवी म्हणते, ‘मला हिवाळ्याचा तिटकारा होता कारण प्रत्येक हिवाळ्यात मी आजारी पडत असे. याची सुरुवात सर्दी पासून होत असे आणि त्यात वाढ होऊन ताप आल्यामुळे पाच दिवस बिछान्यात घालवावे लागत. मी अतिशय कंटाळून गेले होते. पण तीन वर्षांपूर्वी श्री श्री योग शिकून त्याच्या नियमित अभ्यास सरावामुळे आता मी वारंवार आजारी पडत नाही, आणि प्रत्येक हिवाळ्यात तर नाहीच नाही. मला खूप आराम मिळाला.’
श्वसनाचा व्यायाम प्राणायाम केल्याने हिवाळ्यात सर्वसाधारणपणे होणारा छातीतील कफ संचय दूर करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्याकरता सूर्यभेदन (उजव्या नाकपुडीने श्वसन ) उत्तम आहे. कपालभाती प्राणायामाने सुद्धा शरीरातील उष्णता वाढते. याचा सराव हिवाळ्यात लाभदायक ठरतो. याशिवाय सर्वसामान्य संसर्ग रोखण्यासाठी जलनेतिचा ( श्री श्री योग पातळी दोन मध्ये शिकवले जाणारे प्राचीन योग तंत्र ) प्रयोग करून पहा.
३. नैराश्यावर मात करा
कंटाळवाण्या आणि निरुत्साही वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो आणि काहीही कारण नसताना कमजोरी आणि सुस्ती जाणवते. या ऋतूमध्ये ध्यान करण्यासाठी काही वेळ काढा. यामुळे लगेचच सकारात्मक मनस्थिती प्राप्त होते. तुम्ही स्वतः हा फरक अनुभवू शकाल. दररोज योगाभ्यास झाल्यानंतर काही वेळ डोळे बंद करून शांत बसणे खूप फायदेकारक आहे. यामुळे दिवसाची सुरुवात उत्तम होते. दिवसभर ऊर्जावान आणि प्रसन्न राहण्यासाठीची तयारी होते
४. चोचले पुरवा पण जिरवा सुद्धा
हिवाळ्यात अनेक चविष्ट पदार्थांवर ताव मारण्याचा बहाणा मिळतो, गोड आणि चटकदार दोन्ही. याला वजन वाढण्याचे निमित्त होऊ देऊ नका. जे आवडते ते खा पण जिरवा सुद्धा. यात योग आसनांची मदत होऊ शकते याशिवाय वजन कमी राखण्यात आणि अंतर्गत अवयव सक्षम करण्यास मदत होते.
हिवाळ्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खाली दिलेल्या योग क्रमाचा अभ्यास करा:
पश्चिमोत्तानासन
- उदरातील अवयवांची मालिश होऊन सुदृढ होतात.
- पाठीचा खालचा भाग नितंब आणि पायातील स्नायूंचा चांगला व्यायाम होतो.
त्रिकोणासन
त्रिकोनासनाचे फायदे.
- पचन सुधारते आणि ताण कमी होतो.
- चिंता, सायटीका आणि पाठीचे दुखणे कमी होते.
सर्वांगासन
सर्वांगासन कसे करावे याबद्दल अधिक वाचा.
- कंठ ग्रंथी (थायरॉईड ) आणि अंतःस्त्रावी ग्रंथी ( पॅरा थायरॉईड ) सक्रिय होतात आणि त्यांचे कार्य सुधारते.
- अपचन आणि बद्धकोष्ठता यापासून आराम मिळतो.
भुजंगासन
- पोटाला व्यायाम होऊन त्यातील रक्त प्रवाह सुधारतो.
- पाठीचा मधला भाग आणि वरचा भाग सशक्त व लवचिक बनतो.
भुजंगासनाबद्दल अधिक जाणून घ्या.
धनुरासन
धनुरासनाचे फायदे.
- पायातील आणि बाजूतील स्नायू बळकट होतात.
- बद्धकोष्ठता आणि मासिक पाळीतील त्रासापासून आराम मिळतो.
शलभासन
- मान आणि खांदे या भागातील मज्जातंतू आणि स्नायू बळकट होतात.
- उदरातील अवयव बळकट होतात.
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहार व जीवनशैली विषयक काही सूचना
- प्रामुख्याने कफ प्रकृती असलेल्या व्यक्तींनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यायची आहे कारण कफाच्या असंतुलनामुळे सर्दी खोकला होतो. आल्याचा चहा यासाठी फार उपयुक्त आहे. याशिवाय आहारात धान्याचे प्रमाण थोडे कमी करावे.
- थंड वातावरण असल्यामुळे शरीर आकुंचन स्थितीत असते. तुमच्या त्वचेला मानवेल अशा तेलापासून नियमित मालिश केल्याने आकुंचन पावलेले स्नायू पूर्ववत होण्यास मदत होते.
- सुगंध उपचार पुष्पौषधीचा वापर करा. खोलीमध्ये निलगिरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे घसा आणि छातीमधील कफ कमी होतो आणि श्वसनाला मदत होते.
- आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे हिवाळ्यात दुपारी झोप घेणे टाळावे. झोपणे टाळावे. यामुळे शरीरात सुस्ती येते. रात्री सहा ते आठ तास चांगली झोप घ्या. झोपण्याआधी गरम पाण्यात चिमूटभर हळद आणि मीठ टाकून गुळण्या करा हे दररोज किंवा दिवसाआड करू शकता.
- दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाश अंगावर घ्या. यासाठी घराबाहेर बागकाम करणे, पहाटेच्या उगवत्या आणि संध्याकाळच्या मावळत्या सूर्याकडे पहाणे, चालणे इत्यादी गोष्टी करू शकता.
- या ऋतूमध्ये दूध, लोणी, उसाचा रस, तूप या गोष्टींचा आहारात समावेश करा. गरम सूप, शिजवलेल्या भाज्या, भात, ओटस् पासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे लाभदायक आहे. हे खाद्यपदार्थ शरीराला सुखकारक उब देतात. थंडीत चमकदार त्वचा राखण्यासाठी योग्य आहाराबद्दल अधिक जाणून घ्या.
- बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता (संयमित मात्रेमध्ये) हिवाळ्यासाठी चांगला पूरक आहार आहे. याशिवाय खजूर, अंजीर, पालक, हिरव्या पालेभाज्या ह्या सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत.
- औषधी वनस्पतींनी बनवलेला पूरक आहार जसे की चवनप्राश आणि दशमुलरसायन यांचा वापर हिवाळ्यात विशेष करून सुचवला गेलेला आहे कारण त्यामुळे शरीरातील सर्दीचा प्रतिकार करण्यास मदत होते.
डॉक्टर सेजल शहा – श्री श्री योग प्रशिक्षक आणि डॉक्टर निशा मणिकंठन l- श्री श्री आयुर्वेद तज्ञ यांच्या माहितीवर आधारित.