आजकाल हृदयाचे आजार कोणाला होतील यासाठी कोणतेही वयाचे बंधन नाही. लोक आपल्या वयाच्या विशीत देखील हृदयविकाराला बळी पडत आहेत. अॅटलासप्रमाणे जगाचा भार आपल्या खांद्यावर आहे, असे वाटते म्हणून असे होत आहे कां ? आपण आपले जेवण नीट न जेवता त्या ऐवजी कसलेही पोषणमूल्य नसलेले आपल्या सोयीचे अन्न पोटात ढकलतो म्हणून असे होत आहे कां ? कारणे अनेक आहेत, विशेषत: चुकीच्या जीवनशैलीशी संबंधित.
यात चांगली गोष्ट ही आहे की आपण याबद्दल बरेच काही करू शकतो. निरोगी जीवनशैलीसाठी वचनबद्ध असणे महत्वाचे आहे आणि त्याचे अनुसरण करणे हे कल्पनेपेक्षा सोपे आहे. काही साधे शरीर ताणण्याचे व्यायाम आणि प्राणायाम केल्यास तुम्हाला (विशेषतः तुमच्या हृदयाला) चांगले वाटू शकले , तर कसे ? योगासने ही निरोगी हृदयासाठी प्रतिबंधात्मक तसेच एक उपचारात्मक उपाय म्हणून सुद्धा फायदेशीर आहेत. आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, तर अधिक शांती आणि निरामय आरोग्य जाणवेल.
निरोगी हृदयासाठी योग
गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात: “योग हा जीवनाचा अभ्यास आहे, तुमच्या शरीराचा, श्वासाचा, मन, बुद्धी, स्मृती आणि अहंकाराचा अभ्यास आहे, तुमच्या अंतर्गत नैसर्गिक शक्तींचा अभ्यास आहे.”
ज्ञान आणि तत्वज्ञानासोबतच, योग म्हणजे आसन, प्राणायाम आणि ध्यानाचा आरामदायी संयोग आहे. प्रत्येक योगासनाचा श्वसनसंस्थेवर विशिष्ट प्रभाव पडतो आणि त्यामुळे हृदयावर योग्य परिणाम होतो. यातून होणारे फायदे:
- रक्तदाब कमी होतो.
- फुफ्फुसाची क्षमता वाढते.
- खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.
- सुधारित हृदय गती
- रक्ताभिसरण वाढते.
ताणतणाव आणि दबावाचा सामना करण्यासाठी योग प्रभावी आहे. यामुळे, हृदयाच्या रुग्णांना बरे वाटू शकते.
निरोगी हृदयासाठी २० योग व्यायाम
हृदयाशी संबंधित समस्यांसाठी योगामध्ये विशिष्ट आसने आहेत. निरोगी हृदयासाठी खालील २० योगासनांचा त्या क्रमाने सराव करायला हवा. निरोगी हृदयासाठीच्या योगासनांची मालिका साध्या आसनांनी सुरू होऊन हळूहळू अधिक दम लागणाऱ्या आसनांकडे नेते. ही सारी प्रक्रिया हळुवार आणि टवटवी देणारी आहे.
१ . ताडासन
हे आसन मेरुदंड आणि हृदय मजबूत करण्यास मदत करते. यावेळी घेतले जाणारे दीर्घ श्वास फुफ्फुसाचा विस्तार देखील करतात.
२. वृक्षासन
वृक्षासनाचे फायदे.
वृक्षासन शरीराची दृढ आणि संतुलित स्थिती विकसित करण्यास मदत करते. खांदे रुंदावतात आणि हृदय मोकळे होते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि प्रसन्न वाटते.
३. उत्थित हस्तपादासन
उत्थित हस्तपादासन हे योगासन करण्यासाठी एकाग्रता आणि संतुलन लागते, त्यासाठी शक्तीची गरज पडते. याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते.
४.त्रिकोनासन
त्रिकोनासन हे हृदय मोकळे करणारे, उभ्या स्थितीतले योगासन आहे, जे हृदय आणि त्याच्या रक्तवाहिन्याच्या व्यायामासाठी तयार केलेले आहे. श्वास जसा गहिरा आणि लयबद्ध होतो, तशी छाती रुंदावते. यामुळे तग धरण्याची क्षमता सुद्धा वाढते.
५.वीरभद्रासन
वीरभद्रासन या आसनाने शरीराचे संतुलन सुधारते आणि तग धरण्याची क्षमता वाढते. याने रक्ताभिसरण सुद्धा सुधारते आणि तणाव दूर होतो. हृदय गती नियंत्रित रहाते.
६. उत्कटासन
उत्कटासन या आसनात आपणास हृदय आणि श्वासोच्छवासाची गती वाढलेली जाणवेल. हे आसन छातीला ताण देते आणि हृदयाला उत्तेजित करते.
७. मार्जारासन
उत्कटासन नंतर मार्जारासन म्हणजे हवाहवासा वाटणारा आराम आहे. या आसनाने हृदयाची गती स्थिर होत सौम्य आणि लयबद्ध होते, तसेच रक्ताभिसरण वाढते
८. अधोमुख श्वानासन
हे योगासन छातीच्या स्नायूंना बळकट करते आणि फुफ्फुसाच्या भागाची क्षमता वाढवते.
अधोमुख श्वानासन बद्दल अधिक वाचा.
९. भुजंगासन
भुजंगासनात छातीला ताण मिळतो आणि हृदयाला स्फूर्ती मिळते.
१०. धनुरासन
धनुरासन (धनुष्याची मुद्रा) हृदयाच्या भागाला रुंदावते आणि मजबूत करते. ते उत्तेजना देते आणि संपूर्ण शरीर लवचिक बनवते.
११. सेतू बंधनासन
सेतू बंधनासनामुळे गहिरे श्वास घेणे सुलभ होते. हे पाठीचा कणा आणि छातीला ताण देते. याने छातीच्या भागात रक्त प्रवाह देखील वाढतो.
१२. सलंब सर्वांगासन
हे आसन शरीराला आराम देणाऱ्या पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्थेला शांत करते आणि सक्रिय करते. हे आसन छाती विस्तारणारे आणि विश्रांती आणि टवटवी देणारे आहे.
१३. अर्ध मत्स्येंद्रासन
या आसनात शरीराचा पिळ संपूर्ण मणक्यावर कार्य करतो आणि जेंव्हा डाव्या आणि उजव्या बाजूने हे केले जाते तेंव्हा छातीच्या बाजू मोकळ्या होतात, तसेच हृदयाला चालना मिळते.
अर्ध मत्स्येंद्रासनाबद्दल अधिक जाणून घ्या.
१४. पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन आसनामुळे डोके हृदयापेक्षा खालच्या बाजूला येते. त्यामुळे हृदय गती आणि श्वासोच्छ्वास कमी होण्यास मदत होते, तसेच संपूर्ण शरीर प्रणालीला आराम लाभतो.
१५. दंडासन
या आसनामुळे पाठीला बळकटी येत असल्याने शरीराचा बांधा योग्य होतो. यात खांदे आणि छातीला देखील ताण मिळतो.
१६. अर्ध पिंच मयुरासन
हे आसन अधोमुख श्वानासन पेक्षा अधिक बाक देऊन करावे लागते. तग धरण्याच्या क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होते, तसेच शरीराच्या वरच्या भागाला मजबुती लाभते. या आसनाने हृदय मोकळे करणाऱ्या पुढच्या आसनांची तयारी होते.
१७. मकर अधोमुख श्वानासन
मकर अधोमुखी श्वानासन खांदे आणि पोटाच्या स्नायूंना मजबूत करते. यामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि मनही संतुलित होते.
१८. सलंब भुजंगासन
सलंब भुजंगासनने (स्फिंक्स पोझ) छाती विस्तारते. हे शरीराला मागे हलकासा बाक देणारे आसन आहे ज्याने छाती हळुवारपणे विस्तारते आणि खांदे आणि फुफ्फुसांना ताण मिळतो..
१९. शवासन
शवासनाचे फायदे
सर्व योगासनानंतर सखोल विश्रांती देणारी स्थिती करणे योग्य असते. यामुळे शरीर आणि श्वासाला आराम मिळतो. या आसनाने तणावाचे निवारण होते. हृदय आणि शरीराचे एकूण आरोग्य सुधारते.
२०. अंजली मुद्रा
अंजली मुद्रा हृदयाला मोकळे करते आणि मेंदूला शांत करते. हे प्रभावीपणे तणाव आणि चिंता कमी करते. यामुळे प्राणायाम आणि ध्यानासाठी शरीराची चांगली तयारी होते.
सर्व आसनांच्या शेवटी काही मिनिटांचे ध्यान करणे योग्य आहे. या यादीतून एक मार्गदर्शित ध्यान निवडता येईल. हृदयासाठीच्या ह्या साध्या योगासनांचा नियमित सराव आपल्या आयुष्यात अनेक फायदे मिळवून देईल. अधिक आरोग्यदायी आणि हृदयस्थ आयुष्य जगा!
योगाभ्यास शरीर आणि मनाचा विकास करण्यास मदत करतो. आणि त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. तथापि, हा औषधाला पर्याय नाही. प्रशिक्षित योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली योगासने शिकणे आणि त्याचा सराव करणे महत्वाचे आहे. कोणत्याही वैद्यकीय परिस्थितीत डॉक्टर आणि श्री श्री योग प्रशिक्षकांचा सल्ला घेतल्यानंतरच योगाभ्यास करा.