पू म्हणजे पूर्णता, आणि जा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेले. म्हणूनचं पूजा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेली ती पूजा. आणि पूजा केल्याने परिपूर्णता व संतुष्टी प्राप्त होते. पूजा केल्याने वातावरणात सकारात्मकता वाढविणाऱ्या सूक्ष्म लहरी तयार होतात.
आपो दीपो भवः
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे, "आपो दीपो भवः", म्हणजे तुम्ही स्वतःचं प्रकाश रूप व्हा. सगळे वेद व उपनिषद हेच सांगतात, की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात. तुमच्यापैकी कोणी प्रकाशित झाला आहात तर कोणी अद्याप व्हायचे आहेत. पण सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे. दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर सारतो. अंधकार मिटविण्यासाठी केवळ एक तिरीप पुरेशी नाही. त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागेल. परिवारातील केवळ एक सदस्य प्रसन्न असेल तेवढे पुरेसे नाही, प्रत्येक सदस्याला प्रसन्नचित्त व्हावे लागेल. जर एकसुद्धा नाराज राहिला, तर बाकी सगळे प्रसन्न राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक घराला प्रकाशमान व्हावे लागेल. दुसरी गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्यात आचरावी लागेल ते म्हणजे माधुर्य. इतरांना केवळ मिठाई वाटू नका, तर सगळ्यांना तो गोडवा वाटा. दिवाळीचा सण आम्हाला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात काही अढी, ताण असेल तर फटाक्यासारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून, उत्सव साजरा करा.
लक्ष्मी पूजन
अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मी ची पूजा करतात. आम्हाला समृध्द करणारी दिव्यता, ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे. भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रुपात सुध्दा पुजले जाते. ज्या प्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात, त्याप्रमाणे दिव्यतेची वेगवेगळी रूपे असतात. म्हणून आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्रांद्वारे देवी लक्ष्मी ची आराधना करू या आणि त्या द्वारे सकारात्मक लहरी व समृद्धी प्राप्त करू या.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. प्राचीन काळी लोकं ह्या दिवशी आपले सारे धन देवासमोर आणून ठेवीत. सामान्यतः आपले धन बँकेत किंवा लॉकर मध्ये सुरक्षित ठेवल्या जाते. पण प्राचीन काळी लोकं आपले सारे धन समोर पसरवून ठेवत आणि समृद्धी चा आनंद घेत होते. केवळ सोनं, चांदी हेच धन नव्हे तर आपले ज्ञान हे सुद्धा एक धनच आहे. तर ह्या प्रकारे उत्सव साजरा केला जात असे. तुम्हाला आपल्या ज्ञानाचे नीट जतन करायला हवे व त्याबद्दल समृद्धीची भावना हवी. धनत्रयोदशी हा आयुर्वेदाचा दिवस आहे, कारण आपली जडी बुटी व त्या वनस्पती सुद्धा एक प्रकार चे धन आहे. असे म्हणतात की ह्याच दिवशी मानवतेला अमृताची देण मिळाली होती.
तर आजच्या दिवशी तुम्ही खूप सौभाग्यशाली आहात असे मानावे आणि तृप्तीचा अनुभव घ्यावा. जेव्हा जेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजतो तेव्हा आयुष्यात बरेच काही प्राप्त होते. बायबल मध्ये लिहिले आहे की "ज्यांच्या जवळ आहे त्यांना अजून दिल्या जाईल आणि ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्या कडून जे काही थोडं फार आहे तेही हिसकावून घेतल्या जाईल". प्राचीन काळापासून हीच शिकवण आहे की मनात सतत समृद्धी चा भाव जागता ठेवावा. समृद्धी आपल्या आतून सुरु होते व मग ती बाहेर अभिव्यक्त होते. तुम्हाला खूप आशीर्वादाचे पाठबळ आहे, ह्याच भावनेने आज परत जावे.