वैफल्यग्रस्त जीवन
६०० लोकवस्तीचे डोलारा गांव, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, आई-वडील, चार बहिणी, तुटपुंजी शेती, इलेक्ट्रिकल मध्ये आय टी आय शिक्षण, नोकरी नाही, हाताला काम नाही अशी परिस्थिती. मग फोटोग्राफी करणे, वाहन चालवणे, पैसे मिळण्यासाठी पडेल ते काम कर. मिळालेले पैसे व्यसनात संपव. पैसे संपले की पुन्हा व्यसनपूर्तीसाठी पडेल ते काम कर. आयुष्याला दिशा , काही ध्येय नाही की कोणाकडून प्रेमाचा ओलावा नाही, जगण्याची उमेद संपून गेलेली. आत्महत्येचा विचार देखील येऊन जायचा. मित्र परिवार, गावकरी, नातेवाईक यांनी टाळायला सुरुवात केली, त्यांच्या कुटुंबियांना देखील पै पाहुण्यांच्या कार्यक्रमांचे निमंत्रण येणे बंद झाले. वैतागून वडिलांनी एक दिवस सांगितले, "बाबारे आमचे जे व्हायचे ते होऊ द्या, परंतू तू घरातून बाहेर पड.”
सोनियाचा दिवस
“त्या दिवशी दिवसभर दारू प्यायलो, बेहोश झालो. शुद्धीवर आलो आणि कोण जाणे कसे काय चुलत बहिणीचा फोन आला. ती बिचारी सतत सांगत होती, “आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स कर, सुदर्शन क्रिया शिक.” तिचे तोंड बंद करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स केला. तिचे तोंड बंद झाले, आणि त्या दिवसापासून माझे तोंड पण पिण्यासाठी बंद झाले आणि लोक सेवेसाठी निरंतर चालू लागले. महीन्यातून तीन तीन युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबीर, आठवड्यातून दोन दोन पांच पांचशे लोकांसोबत सत्संग, ही वीणा गुरुदेवांच्या आशीर्वादाने अखंड सुरूच आहे.” शरद डोलारकर सांगत होते.
हे जीवन चांगले आहे
शरदजीनी युवक नेतृत्त्व शिबीर केले. त्याचा अनुभव सांगताना ते म्हणाले, “ सुदर्शन क्रिया केली आणि मनातील ताण-तणाव, पश्चातापाची भावना निघून गेली. शिबिराच्या प्रशिक्षकांचे चमकते चेहरे, सेवा भाव पाहून, प्रेमळ स्वभाव पाहून पुन्हा जगण्याची उम्मेद निर्माण झाली. हे जीवन ‘चांगले आहे’ वाटू लागले. यातच जीवनाची दिशा मिळाली, गुरुजींच्या रुपाने ध्येय गवसले. ‘आता आयुष्यभर गुरुजीना सोडायचे नाही,’ हाच संकल्प केला.”
तुका म्हणे काही न मागो आणिक । तुझे पायी सर्व सुख आहे ।।
गुरुजींचा सारथी
नवरात्री उत्सवावेळी शरदजीना बेंगलोर आश्रमातील किचन मध्ये सेवा मिळाली. हातांना सेवा मिळाल्यावरच डोके आणि मन शांत झाले. ते सेवेत रमून गेले, सेवेचा आनंद प्राप्त होऊ लागला. “एका रात्री किचनमध्ये पाठीवर थाप पडली. ती गुरुजींची होती. गुरुजी विचारत होते, “कैसे हो, सब ठीक है?” माझी चौकशी केली. मी सारे काही सांगितले. त्यांच्या चौकशीमुळे, डोळ्यातील प्रेम भावामुळे, विश्वासक स्पर्शामुळे, त्यांच्या निव्वळ उपस्थितीमुळे शरीर, श्वास शांत झाला होता, मन अत्यंत प्रफुल्लीत होते, सर्व क्लेष, दुःख गेले होते. मी पूर्णपणे ‘त्यांचा’ झालो होतो. गुरुजींनी मला त्यांच्या सोबत कुटीर मध्ये घेऊन गेले, सतत मला बरोबर ठेवले, व्यसनासाठी वाहन चालवणाऱ्या शरदला गुरुजींनी त्यांच्या गाडीचे सारथी बनवले, जीवन कृतार्थ झाले.” शरदजी भावनावश होऊन बोलत होते.
प्रोजेक्ट विदर्भ
एके दिवशी कळले की, कोणीतरी श्री विजय हाकेजी नावाचे संस्थेतील वरिष्ठ, मला शोधात आले. माझे धाबेच दणाणले. पण गाठ पडल्यावर त्यांनी मला विचारले, “चल, विदर्भाला येतोस? तेथे खूप सेवा आहेत.” मग गुरुजींच्या परवानगीनेआणि आशिर्वादाने ‘प्रोजेक्ट विदर्भ’ च्या सेवेत लागलो. बुलढाणा जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये, नवचेतना शिबिरे, सत्संग, अग्निहोत्र, नैसर्गिक शेती, शून्य खर्चाधारीत शेती, व्यसन मुक्ती, महीला सबलीकरण, स्वयंरोजगार विषयक प्रशिक्षण अश्या सेवा केल्या. आणि आश्रमातील ‘विदर्भ डे’ साठी १४०० - १५०० ग्रामस्थांना गुरुजीच्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलो. गुरुजींनी सर्वांचे मनोगत ऐकले. ग्रामस्थांचे समूळ जीवन परिवर्तन, जीवनाची नवी उम्मीद आणि कृतज्ञता पाहून मला खूप आनंद झाला. तळागाळातील माणसांसाठी हृदयात अत्यंत कळवळा असणारे गुरुजींचे रूप मी सतत पहात आलो आहे.”
चिंतामुक्त जीवन
शरदजींनी आश्रमातच "दिव्य समाज निर्माण" शिबिर केले त्यानंतर अॅडव्हांस कोर्स केला तेव्हा काही दिवसातच मिळालेली ऊर्जा, झालेले चांगले बदल लक्षात आले आणि समजले शिबिरात काहीतरी अचाट शक्ती आहे जी आपल्यावर कार्य करते. भाषा समजली नाही तरीही ती शक्ती आपल्यात बदल घडवून आणते.
आश्रमात शरदजींच्या आई-वडिलांचे डोळे गुरुजींच्या दर्शनाने भरून आले होते. गुरुजींनी वडिलांची चौकशी केली तेंव्हा माझ्याकडे बोट दाखवत वडील म्हणाले, “अब काहे की परेशानी ? हमारी सबसे बडी परेशानी तो आपने ले ली I” गुरुजींनी त्यांना विश्वास दिला, “अब वह मेरा है, मेरे पास ही रहेगा I” अशी हजारो कुटुंबे आज गुरुजींच्या विश्वासावर जगत असताना मी पहात आहे.
सामाजिक शिबिरे
शरदजी २००८ साली हॅपिनेस प्रोग्रामचे प्रशिक्षक बनले. २०१० साली युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षक बनले आणि तेंव्हा पासून आज तागायत दर महिन्याला तीन वाय.एल.टी.पी. शिबिरे होतात. प्रत्येक शिबिरांमधून पर्यावरण रक्षण, प्लास्टिक वापरावर बंदी, हुंडा बंदी, महिला संरक्षण आणि सबलीकरण, व्यसनमुक्ती, वरिष्ठांचा आणि राष्ट्राचा सन्मान असे अनेक मार्गे सामाजीक प्रबोधन सुरूच असते. कुटुंबांचा आर्थिक ताण कमी व्हावा, अनावश्यक खर्चाला फाटा बसावा म्हणून ‘सामुदायिक विवाह’ देखील घडवून आणतात. यामध्ये मुस्लीम विवाह देखील होतात. शिबिरांमध्ये त्यांचा भर गावातील एकी वर आणि तंटा मुक्त गावावर असतो, सत्संगावर असतो. कारण त्यांना गुरुजींचा गुरुमंत्र चांगलाच ध्यानात आहे.
“शांती तलवारसे नही, ताली बजानेसे मिलेगी I”
बुलढाणा, अकोला, जालना, परभणी, बीड इत्यादी जिल्ह्यांमध्ये सेवा सुरु केली. परळी गावांमध्ये गावकऱ्यांमध्ये खूपच पराकोटीचे वितुष्ट होते. ते लोक कायद्याला जुमानत नव्हते. दर दोन तीन महीन्यातून एक खून ठरलेला. श्री.किरण गित्ते , जिल्हाधिकारी: अमरावती , म्हणतात, " भारतामध्ये बिहार, महाराष्ट्रात बीड आणि बीड जिल्ह्यात परळी." अश्या कुख्यात परळी गावांत शरदजींनी दोन हजार पेक्षा जास्त लोकांचे चोवीस वाय.एल.टी.पी घेतले, सुदर्शन क्रिया, ज्ञान आणि साधनेमुळे लोकांच्यातील इर्षा, अहंकार नाहीसा होऊन प्रेम भावना वाढीला लागली, आपलेपणा वाढला, जीवन असे देखील असू शकते याची जाणीव सर्वाना व्हायला लागली आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात गावांत एकही मारामारी, खून नाही."
जीवनातील परिपूर्णता
शरदजी त्यांच्या सेवाभावी जीवनाबद्दल बोलताना सांगत होते, “सेवा करण्यासाठी कोणत्याही साधन-सुविधा, पद, अधिकाराची गरज नाही. सेवा सुरु करा – हरीचे हात हजार, आपोआप सर्व उपलब्ध होईल. जबाबदारी घ्याल तसतसे अधिकार प्राप्त होतील,” हा गुरुजींचा मूलमंत्र मी शब्दश: जगतो. याचाच प्रत्यय मला दिवसेंदिवस येतोय. माझे जीवन परिपूर्ण बनले आहे. माझ्यासारखेच अनेक युवाचार्य/शिक्षक भारतातील अनेक गावांमध्ये काम करत आहेत आणि आपले आयुष्य सार्थक करीत आहेत”
“माणूस पाण्यात पडल्याने मरत नाही तर पोहता येत नाही म्हणून मरतो, पोहणे जशी कला आहे तसेच जीवन ही देखील एक कला आहे. ती आत्मसात करण्यासाठी जीवनाप्रती उच्च दृष्टीकोन मिळवण्यासाठी, प्रेमाची-भक्तीची नवी उंची गाठण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबिर करण्याशिवाय पर्याय नाही....”