श्री श्री रविशंकर :
आपल्या आयुष्याचा बहुतेक काळ आपण चेतनेच्या तीन अवस्थेत जगत असतो. जागृती, स्वप्न आणि निद्रा.
चेतनेच्या जागृतावस्थेत आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जगाचा अनुभव घेत असतो.आपण आपला उत्कर्ष आणि आनंद या ज्ञानेंद्रियामार्फत शोधत असतो. जर यातले एकही ज्ञानेंद्रिय चालत नसेल तर त्या ज्ञानेंद्रियाचे सगळे परिणामच बदलून जातात. ज्याला ऐकू येत नाही, तो आवाजाच्या सगळ्या जगालाच मुकतो. तसेच ज्याला दिसत नाही, तो सर्व सुंदर दृश्यांना आणि रंगांना मुकतो. म्हणजे ज्ञानेंद्रिय त्या जाणून घेण्याच्या वस्तूपेक्षा खूप जास्त महत्वाचे आणि खूप जास्त मोठे आहे.
मन हे ज्ञानेंद्रिया पेक्षा उच्च आहे. मन हे असीम आहे. त्याच्या इच्छा आकांक्षा अनेक आहेत पण आनंद भोगण्याची ज्ञानेंद्रियांची कुवत मर्यादित आहे. हाव म्हणजे इंद्रिय गोचर वस्तू आणखी जास्त हवे असणे. जरी माणसाला त्याच्या आयुष्यभरात एका मर्यादेतच उपभोग घेता येत असले तरी त्याला जगातली सगळी संपत्ती हवी असते.
इंद्रिय गोचर वस्तुंना खूप जास्त महत्व देण्याने हाव वाढते, ज्ञानेंद्रियांना खूप जास्त महत्व देण्याने तीव्र वासना वाढते आणि मनाला आणि त्याच्या आकांक्षाना खूप जास्त महत्व देण्याने विभ्रम वाढतो.
आपण मनातल्या संकल्पनांना धरून ठेवतो आणि गोष्टी एका ठराविक पद्धतीने होण्याची वाट बघत बसतो. अशाप्रकारे आपल्या मनातल्या कल्पनांमुळे, आपलाच भाग असलेली असीम चेतना अनुभवण्यास अडथळा येतो. याचा अर्थ असा नाही की ज्ञानेंद्रिये किंवा मन वाईट आहे. पण आपण सतत गोष्टींमध्ये भेद करायला शिकले पाहिजे आणि जे घडते आहे त्याबद्दल सजग राहिले पाहिजे. मगच मनात स्पष्टता येईल. चेतनेच्या उच्च स्तरावर पोहोचण्याची ही पहिली पायरी आहे.
जागृतावस्थेत माणूस सतत बघण्यात, खाण्यात, कार्य करण्यात वगैरे गुंतलेला असतो.
दुसरे टोक म्हणजे निद्रावस्था. ज्यात माणूस पूर्णपणे सगळ्यापासून अलग आणि सुस्त असतो. तो सुस्तपणा आणि जडत्व जागे झाल्यानंतरही रेंगाळत रहाते. माणूस जितका झोपेल तितकी जास्त सुस्ती येते. कारण झोपेत बरीच ऊर्जा खर्च होते.
त्यानंतर येते स्वप्नावस्था. जेथे माणूस धड झोपलेलाही नसतो आणि जागाही नसतो. इथे तुम्हाला विश्रांतीही मिळत नाही आणि भोवतालच्या परिसराची जाणीवही नसते.
ध्यान :
चेतनेचा उच्च स्तर कुठेतरी जागृतावस्था, निद्रावस्था आणि स्वप्नावस्था यांच्या मध्ये असते. इथे आपल्याला माहीत असते की आपण ‘आहोत’, पण हे माहित नसते की आपण कुठे आहोत. मी ‘आहे’ पण मला माहित नाही ‘कुठे’ आहे किंवा ‘ काय’ आहे, या अवस्थेला ‘शिव’ म्हणतात. ही अवस्था जितकी जास्तीत जास्त विश्रांती मिळणे शक्य असेल तितकी गाढ विश्रांती देते. आणि ती ध्यानातून मिळू शकते.
ध्यान केल्याने दोन प्रकारे फायदा होतो:
१. तणावाला आपल्या यंत्रणेत शिरकावच मिळत नाही आणि त्याचवेळी जमा झालेला तणाव निघून जातो.
२. ध्यानाचा रोजच्या जीवनात अंतर्भाव केल्याने, ज्याला 'वैश्विक चेतना' म्हणतात, त्या चेतनेच्या उच्च स्तराचा, आपल्यात उदय होतो.
संपूर्ण विश्व हा आपला प्रत्येकाचा भागच आहे असे वैश्विक चेतना मानते. आपल्यात आणि जगात प्रेम अगदी जोशाने वहात असते. हेच प्रेम आपल्याला आपल्या विरोधात असलेल्या आणि त्रासदायक असलेल्या गोष्टींवर मात करण्याचे बळ देते. क्रोध आणि अपेक्षाभंग ह्या क्षणभंगुर भावना बनतात, ज्या क्षणभर येतात आणि नाहीशा होतात. चेतनेचा उच्च स्तर अचानक कधीतरी येत नाही. चेतनेचे रोपटे तुमच्यातच आहे. ध्यानासारख्या आध्यात्मिक साधनेने त्याचे पोषण केले पाहिजे. काही नारळाची झाडे तीन वर्षांनी फळ देतात तर काही दहा वर्षांनी. आणि ज्यांचे पोषण झाले नाही ते कधीच फळ देत नाहीत ते फक्त असतात.
चेतनेचा उच्च स्तर गाठण्यासाठी काही गुंतागुंतीची योजना लागत नाही, फक्त सोडून देण्याची कला शिकावी लागते. ज्ञानाचा योग्य मेळ घालणे, समजण्याची पात्रता आणि साधना याने जीवनास परिपूर्णता येते. तुम्ही जेंव्हा चेतनेच्या उच्च स्तरापर्यंत पोहोचता तेव्हा तुमच्या लक्षात येते की वेगवेगळ्या परिस्थितीत आणि त्रासात तुमचे संतुलन जाऊन तुम्ही कोलमडत नाही. तुम्ही मजबूत तरीही सौम्य राहता, एक नाजूक आणि सुंदर व्यक्ती. जीवनातील मूल्ये अगदी सहज अंगिकारू शकतात. जशी तुमची चेतना जागृत होते आणि सगळी यंत्रणा शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या उन्नत होते आणि तुमचे जीवन जगण्यायोग्य होते.
श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य www.artofliving.org/mr
Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri