आयुर्वेदिक शुद्धीकरण आहार म्हणजे काय ?
हा एक विशिष्ट प्रकारचा आहार असून तो आपल्या शरीरात जमा झालेले विषारी द्रव्ये बाहेर काढून शरीराला शुद्ध करतो. हा आहार पाचक असतो. त्याच्या सेवनाने पचनसंस्थेला आराम मिळतो आणि विजातीय द्रव्यांचे पचन करून त्यांना शरीराबाहेर काढण्यात सक्रीय होतो. हा आहार आपल्या संपूर्ण शरीराला विजातीय द्रव्यापासून मुक्त करण्यास सहाय्यक ठरतो.
हा आहार वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांसाठी वेगळा असतो काय? ह्याचे सेवन कशाच्या आधारे ठरविले जाते?
शुद्धीकरण आहार दोन प्रकारचा असतो. ह्यातील पहिल्या प्रकारचा आहार साधारणतः सर्व लोकांसाठी लाभप्रद असतो आणि प्रत्येक व्यक्ती त्याचे सेवन करू शकते. दुसऱ्या प्रकारचा आहार लोकांच्या शरीरातील जमा झालेले विजातीय द्रव्य (ज्याला आयुर्वेदात 'आम' असे म्हटले जाते), त्याचे प्रमाण व शरीराच्या कोणत्या भागात तो जमा झाला आहे आणि त्याची तीव्रता या आधारे ठरविला जातो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या शरीर प्रकृती (वात-आम, कफ-आम आणि पित्त आम) ध्यानात घेतली जाते. शरीरात कोणता आम जमा आहे आणि त्याचे प्रमाण जाणून घेण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर नाडी परीक्षा व अन्य तपासण्या करतात.
शरीराला या विषारी द्रव्यापासून(आम/टॉक्सिन) मोकळे करण्याची गरज काय?
कारण आपल्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारचे विषाक्त पदार्थ असतात. वेगवेगळ्या प्रकारचे भोजनसुद्धा आपल्या शरीरात हे विषद्रव्य निर्माण करत असतात. आपण नेहमीच निरोगी दिनचर्या अनुसरू शकत नाही आणि स्वास्थ्यवर्धक आहार घेऊ शकत नाही. त्या व्यतिरिक्त वातावरणातील किरणोत्सर्ग व मानसिक ताणाचा आपल्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होत असतो. साधारणपणे आपली शरीर प्रणाली अशा जमा होणाऱ्या विषद्रव्यांना बाहेर काढून टाकण्यात सक्षम असते व रोजच्या शरीरकार्याचा भाग म्हणून ते बाहेर निघत असते. पण कधीकधी हे योग्य प्रकारे घडून येत नाही किंवा आपणच ह्या शुद्धीकरण प्रक्रियेबद्दल उदासीन राहतो. जर आपली दिनचर्या शरीराच्या जैविक घड्याळानुसार नीटपणे सुरू असेल आणि आपण नैसर्गिकपणे जीवन जगत असलो तर हि विजातीय द्रव्ये आपोआप शरीराबाहेर टाकली जातात. जर आपण भरपूर प्रमाणात पाणी पित असलो आणि योग, व्यायाम नियमितपणे करीत राहिलो तर शरीरातून घाम व मल निस्सारण योग्यपणे होते जे शरीराच्या शुद्धीकरणात उपयुक्त ठरते. आयुर्वेदाच्या मान्यता काही वेगळ्याच आहेत. जसे, जर तुम्ही योग्य प्रमाणात आहार घेतला तर तो वात शमन करण्यास उपयुक्त ठरतो.
ही प्रक्रिया किती कालावधीनंतर परत करायला हवी?
तुमच्या शरीरात जमा झालेल्या विषारी द्रव्याच्या प्रमाणावर हे अवलंबून आहे. साधारणपणे दर तीन महिन्यातुन एकदा ही प्रक्रिया करायला हवी. काही व्यक्तींना वर्षातून एकदा केली तरी पुरेसे आहे.
यात कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा लागतो?
जुनाट रोगाच्या लोकांना केवळ एकदा हा आहार घेऊन फायदा होत नाही. त्यांच्यासाठी तज्ञ डॉक्टर विशिष्ट आहार ठरवितात. विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी एक उपचार पद्धती आहे ज्याला ‘पंचकर्म’ असे म्हणतात. ह्या पद्धतीत सुद्धा वेगवेगळ्या आहाराचा समावेश असतो. परंतु ह्यात आहारापेक्षा जमा झालेला मल बाहेर काढण्याला महत्व दिले जाते. मधुमेही रुग्णांना आवश्यक आहे की त्यांनी ह्या आहारपद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा व त्यांनी सांगितलेल्या आहार प्रणालीचे पालन करावे.
इथे जो आहार सुचविण्यात आला आहे तो पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही व्यक्ती तो घेऊ शकते. आपल्या वैयक्तिक शारीरिक स्थितीप्रमाणे त्यात थोडाफार बदल करू शकतो.
या आहारात पहिले तीन दिवस फळे, फळांचा रस, भाज्या आणि भाज्यांचा रसांचे सेवन करावे. हे सारे कच्चेच असते. (शिजविण्याची गरज नाही) हे पचायला हलके असते, तसेच विजातीय द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते. तीन दिवसांनंतर फळं, भाज्या आणि त्यांच्या रसासोबतच हळूहळू शिजविलेले अन्नही घ्यायला सुरुवात करावी. ह्यात सूप, मुगाच्या डाळीचे वरण व सूप ह्याच्या सेवनाने सुरुवात करावी. त्यासोबत खिचडीचाही अंतर्भाव करावा.हे दहा दिवसांचे संतुलित आहाराचे वेळापत्रक आहे जे कोणीही उपयोगात आणू शकतात.
मधुमेही रुग्णांनी फळांच्या ऐवजी भाज्या व भाज्यांचा रस आहारात घ्यावा, तसेच आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने काही पाचक अन्नपदार्थ घेऊ शकतात. तुमच्या शरीराची गरज तुम्हीच योग्य प्रकारे जाणता, म्हणून जर प्रत्येक तीन तासांनी काही खायची गरज वाटली तर त्याप्रमाणे आपल्या आहारात तसा बदल करू शकता.
दुसऱ्या प्रकारचे आहाराचे वेळापत्रक पूर्णपणे त्या त्या व्यक्तींच्या गरजा ओळखून आहार तज्ञांच्या सल्ल्याने ठरविले जाते.
असा आहार किती वेळासाठी घ्यावा आणि किती दिवसांनी परत सुरु करावा?
असे आहाराचे वेळापत्रक दर तीन महिन्यांनी दहा दिवसांसाठी पाळावे.अर्थात वर्षातून चारदा प्रत्येक ऋतू बदलताना घेऊ शकतो. ऋतू बदलताना आपल्या शरीरातही काही बदल होत असतात. आपल्या आहारातही काही बदल होतो. अशा वेळी शरीरात विषद्रव्यांचे प्रमाण वाढू शकते.
या आहारशैलीनंतर आपण परत आपली जुनी आहारपद्धती स्वीकारू शकतो?
हळूहळू आपल्या जुन्या आहाराच्या सवयीवर परत येणे जास्त योग्य असते. तसेच हेही अत्यंत महत्वपूर्ण आहे की नेहमी आहारात योग्य आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा. आपले शरीर बऱ्याच प्रकारचे अन्न पचवू शकत नाही. आपल्या आहाराची निवड करताना ते अन्न तिथेच उगवणारे, नैसर्गिक, चांगल्याप्रकारे शिजलेले, ताजे आणि रसायनमुक्त आहे नां, यावर विशेष ध्यान ठेवावे. जर आपण या सर्व बाबी लक्षात ठेवून आपला आहार घेतला तर प्रकृती उत्तमच राहील. आता लोक असा आहार घेऊ लागले आहेत. भारत हा असा देश आहे की जिथे वर्षभर ताजे अन्न उपलब्ध होते. आपल्याला डब्बाबंद अन्न विकत घेण्याची गरजच पडत नाही. याउलट कित्येक देशांत अन्न आयात करावे लागते.
या प्रकारच्या आहार पद्धतीमुळे काय लाभ होतो?
तुमची पचनशक्ती सुधारते. गाढ झोप येते. त्वचा नितळ, सुंदर आणि मऊ होते. शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो.
जुनाट रोगांच्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा असे आढळते की वैद्यकीय उपचारांचा काहीच उपयोग होत नाही. अश्या वेळी सावधानपूर्वक आहारचिकित्सा करावी आणि विशेष लक्ष ठेवावे. असे अभावानेच होते. असे झाल्यास रुग्णाला परत त्याच्या सामान्य आहारशैलीशी जुळवून घ्यायला सांगावे.
कसे समजेल की या उपचाराची तुमच्या शरीराला गरज आहे: जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल, गाढ झोप येत नसेल, त्वचा रोग असेल, पोट फुगत येत असेल, कंबरेत वा सांध्यात दुखणे असेल, केस गळत असतील किंवा डोळ्यांचा काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाता. डॉक्टर म्हणू शकतात की तुम्हाला काहीच आजार नाही. तरीही तुम्ही ह्या त्रासांनी त्रस्त असाल तर तुमच्या शरीरात विषद्रव्ये जमा झाली आहेत याचे स्पष्ट संकेत आहेत.
आयुर्वेदिक उपचार पद्धतीत नाडी परीक्षा ह्या आगळ्यावेगळ्या रोगनिदान प्रकाराचा अवलंब केला जातो, ज्यात विषद्रव्ये जमा झाल्यामुळे शरीरात नेमका कोठे प्रभाव पडतोय, हे जाणले जाते. म्हणून नाडी परीक्षा करवून घेणे खूपच आवश्यक आहे ज्यामुळे शरीरात होणाऱ्या रोगांपासून बचाव करू शकतो.
प्रश्न: आयुर्वेदाच्या सहाय्याने आपण कसे निरोगी राहू शकतो? कृपया याबद्दल काही सांगा.
निरोगी आयुष्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत: योग्य आहार, स्वस्थ जीवनशैली आणि मनाची अवस्था.
आहार:
निरोगी स्वास्थ्यासाठी आहाराची महत्वाची भूमिका आहे. म्हणून हे अत्यंत गरजेचे आहे की बदलत्या ऋतूनुसार स्थानिक पिकणाऱ्या अन्नाचा आहारात अधिक वापर करावा. ताजे आणि रसायनमुक्त अन्न पचण्यास हलके आणि आरोग्यासाठी उत्तम असते.
स्वस्थ जीवनशैली :
निसर्गाला एक लय असते. दिवसाची वेळ कामासाठी आणि रात्रीची वेळ विश्रांतीसाठी असते. आपल्या शरीरात एक जैविक घड्याळ असते जे सूर्याच्या स्थितीनुसार चालत असते. आपल्या शरीराला हे माहीत असते की केंव्हा काम करायचे आहे आणि केंव्हा विश्रांती घ्यायची आहे. दिवसा आपले शरीर पोषण प्राप्त करते व रात्री विषाक्त पदार्थांचे पचन आणि ते बाहेर काढण्यात व्यस्त असते. विशेषतः आपले यकृत आणि पित्ताची पिशवी रात्री सफाईचे काम करीत असते. जर एखादी व्यक्ती रात्री नीट झोपू शकली नाही तर त्याच्या शरीरातून विषद्रव्ये बाहेर पडू शकणार नाहीत. म्हणूनच जैविक घड्याळानुसार आपला जीवनक्रम पार पाडणे हे आयुर्वेदाचे मुख्य तत्व आहे, ज्याला 'दिनचर्या' असे म्हटले जाते.
काही लोकं आपल्या व्यावसायिक गरजांमुळे जैविक घड्याळानुसार आपला दिनक्रम पार पाडू शकत नाहीत. ह्याचा काही अपाय होऊ नये म्हणून अशा लोकांनी विशेष मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
मनाची स्थिती :
स्वस्थ जीवनशैलीत व्यक्तीच्या मानसिक स्थितीला खूप महत्व आहे. आपल्या आयुष्यात जे काही सुखद वा दुःखद घडत आहे, त्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. पण अप्रिय घटनांवर आपली प्रतिक्रिया नेहमी एकसारखीच नसते.
जेंव्हा तुम्ही शांत असता तेंव्हा अश्या घटनांमुळे तुम्ही त्रस्त किंवा क्रोधीत होणार नाहीत. क्रोधाच्या अवस्थेत तुमच्या शरीराचे तापमान वाढू लागते व दुःखाच्या अवस्थेत तापमान घटू लागते.
मनाचा प्रभाव शरीरावर पडतो हे सर्वमान्य सत्य आहे. मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमुळे शरीरात दिवसभरात अनेक सूक्ष्म बदल होत असतात. पण आपल्या मनाला कसे सांभाळावे व तिथे उठणाऱ्या अलग अलग भावनांतून कसे मुक्त व्हावे हे आपण जाणत नाही.
आपण शरीर आणि मनासोबतच जन्म घेतो. शरीराबद्दल तर आपल्याला थोडंफार शिकवलं गेलंय की कसे ते स्वस्थ ठेवावे, कशी स्वच्छता बाळगावी आणि आजारी पडल्यास कसा उपचार घ्यावा. पण आपल्याला मनासाठी योग्य ते ज्ञान मिळालेलं नाही. पण मनाचा शरीरावर खूप प्रभाव पडत असल्यामुळे, आपले मन कसे सांभाळावे हे जाणणे अत्यंत आवश्यक आहे.
योग व ध्यान मनाला कुशलतेने कसे सावरून घ्यायचे हे शिकविते.आजकाल बहुतांशी लोक वेळेचा अभाव, ऊर्जेची कमतरता आणि कामाचा प्रचंड डोंगर ह्याच समस्येने घेरलेले आहेत. कामाचा व्याप आणि वेळेचा अभाव हे दोन्हीही आपल्या नियंत्रणात नाही. पण योग आणि ध्यानाद्वारे आपल्या ऊर्जेचा स्तर आपण नक्कीच वाढवू शकतो. आपली मानसिक आणि भावनिक स्थिती उच्च पातळीवर नेऊन आपल्यातील ताण आणि क्रोध कमी करू शकतो. याप्रकारे आपण आपले जीवन अधिक निरोगी व आनंदमय बनवू शकतो.
द्वारा : डॉ निशा मनिकंठन, आर्ट ऑफ लिविंग आयुर्वेदिक विशेषज्ञ