शिव आणि कृष्ण एकच आहेत (Shiva Krishna in Marathi)

देवदूत हे परमात्म्याचाच एक भाग आहेत. या अनंतामध्ये अनेक गुण निहित आहेत, आणि विशिष्ट गुणांना देवदूत म्हटले जाते. देवदूत दुसरे तिसरे काहीही नसून ते तुमच्या चेतनेचाच एक भाग आहेत. तुम्ही जेव्हा केंद्रित होता तेव्हा ते तुमच्या सेवेला उपस्थित असतात. ज्याप्रमाणे एक बीज अंकुरित झाल्यानंतर त्यामधून मुळे, खोड आणि पाने उगवतात त्याचप्रमाणे जेंव्हा तुम्ही केंद्रित होता तेंव्हा तुमच्या जीवनातील सर्व देवदूत प्रकट होतात. तुमच्या संगतीत देवदूत हर्षित होतात परंतु त्यांच्याकडून तुम्ही काहीच फायदा करून घेऊ शकत नाही. ते केवळ अशाच लोकांच्या आसपास येतात ज्यांना त्यांच्यापासून काहीच फायदा करून घेण्यात रस नसतो. देवदूत म्हणजे तुमचे विस्तारित हात होय. जसे धवल सूर्यप्रकाशात सगळे रंग असतात त्याचप्रमाणे सर्व देवदूत तुमच्या आत्म्यात उपस्थित असतात. परमानंद त्यांचा श्वास असतो, वैराग्य त्यांचे निवासस्थान असते. परमानंद, निरागसता, सर्वव्यापकता आणि वैराग्य प्रदान करणारी जी चेतना आहे तो आहे शिव. कृष्ण हा शिवाचे बाह्य स्वरूप आहे. आणि शिव हा कृष्णाची आंतरिक शांती आहे.