प्रश्न : गुरुदेव, आनंदी असणे हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे संयुक्त राष्ट्र यांनी मान्य केले आहे. २६ जानेवारीचे (भारतीय प्रजासत्ताक दिन) औचित्य साधून आपण ‘एक आनंदी राष्ट्र‘ बनण्याच्या दिशेने कशी काय वाटचाल करू शकतो?
श्री श्री रविशंकर:
हा प्रश्न आपल्या देशातील प्रत्येक नागरीकाला पडायला पाहिजे की,आपण स्वत्वामध्ये आनंद कसा शोधू शकतो? आणि मग आपल्याला जाणवेल की आपल्या समाजात आनंद वृद्धिगत होत आहे. म्हणून हा विचार सर्वप्रथम प्रत्येक मनामध्ये रुजवा म्हणजे तो लवकरच फळेल.
आपण सरकत्या जिन्यावर उभे असल्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करतो. वस्तू सरकत आहेत, वस्तू जात आहेत आणि आपण त्यांचा विचारसुद्धा करीत नाही. एक दिशाहीन, हेतुविरहित आयुष्य! कदाचित एकुलता एक हेतू म्हणजे या ना त्या प्रकारे भरपूर पैसा कमावणे, बस्स इतकेच.
आपल्या देशातील भ्रष्टाचार सर्वप्रथम संपुष्टात यायला हवा. वर पासून खाल पर्यंत सगळे भ्रष्ट आहेत. मला तर वाटते की यापेक्षा भ्रष्टाचार अधिक बळाऊ नये.
आज मी काही उद्योगपती आणि व्यावसायिकांना भेटलो. तुम्हाला माहिती आहे - त्यांनी काय सांगितले? ‘भारतामध्ये कोळश्याचे सर्वाधिक भांडार आहे, तरीसुद्धा आपण कोळश्याची आयात करीत आहोत. आपल्याकडे तेल आणि नैसर्गिक वायू आहेत आणि तरीसुद्धा आपण ते बाहेरून घेत आहोत. आपल्याकडे इतक्या लोखंडाच्या खाणी आहेत, तरीसुद्धा आपण स्टीलची आयात करीत आहोत. आपल्या देशात भरपूर बॉक्साईट उपलब्ध आहे. आपण तर बॉक्साईटच्या खाणीवर बसलो आहोत आणि तरीसुद्धा आपण बॉक्साईट बाहेरून विकत घेत आहोत.
मध्य पूर्व आशिया, मलेशिया आणि इंडोनेशिया येथे नैसर्गिक वायू आणि तेल आहे. आपणसुद्धा त्याच भौगोलिक पट्ट्यात आहोत, एकदम मधोमध. पण या राजकारण्यांनी आणि शासनाने लोकांना एक काडीसुद्धा हलवणे अवघड करून ठेवले आहे. केवळ त्यांच्या वैयक्तिक फायद्याकरिता त्यांनी देशाच्या विकासाला ब्रेक लावले आहेत आणि यामध्ये होरपळला जातोय तो सामान्य माणूस.
जेंव्हा जगभरातील अन्नपदार्थांच्या किंमती कमी झाल्या तेंव्हा भारतातील अन्नपदार्थांच्या किंमती मात्र वाढल्या. संपूर्ण जगात दर कमी झालेत, मात्र केवळ भारतात धान्यांचे दर वाढले आहेत. एके दिवशी अचानक कांद्यांचे भाव वाढतात आणि मग दोन-तीन दिवसानंतर ते एकदम तळ गाठतात. या दोन टोकांच्या मध्ये अडकतो तो शेतकरी. त्याच्या डोळ्यातून आसवे निघतात ती रक्ताच्या अश्रूंची! आणि अश्या परिस्थितीत आपण न बोलता गप्प कसे काय राहू शकतो?
लोक म्हणतात, ‘गुरुदेव, तुमचे काम केवळ अध्यात्मावर बोलणे आणि लोकांना दिलासा देणे इतकेच आहे; भ्रष्टाचार आणि सामाजिक प्रश्नांवर तुम्ही बोलू नये. त्याचा काहीजणांवर परिणाम होईल, म्हणून याबद्दल काहीही न बोलावे हेच ठीक.’
मी म्हणतो, ‘नाही ! इतर कोणी काय विचार करते, कोणावर काय परिणाम होईल, याचा मी विचार करीत नाही. सत्य हे दगडावरच्या रेषेप्रमाणे असते. लोकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आपण लोकांना जागरूक केले पाहिजे.’
जेथे आपुलकीची भावना संपते तिथे भ्रष्टाचाराला सुरुवात होते.
दुर्दैवाने, ज्या देशाचा सर्वोत्कृष्ठ पायंडा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि राजाजी यासारख्या लोकांनी घालून दिला तिथे सत्तेतील काही राजकारण्यांनी लोकांच्या विश्वासाचा गैर फायदा घेतला आणि १.२ अरब लोकसंख्या असलेल्या देशाचा कारभार अंधाधुंदीने करून लोकांना मूर्ख बनविले. म्हणून आपण या अन्यायाविरुद्ध उभे ठाकले पाहिजे, असे तुम्हाला वाटत नाही कां? आणि ती वेळ आत्ताच आहे.
आता जेंव्हा मतदान करण्याची वेळ येईल तेंव्हा तुम्ही, ‘मी या भ्रष्ट लोकांना पुन्हा कधीही मत देणार नाही, असे ठरवून टाका.
संसेदेतील एक तृतीयांश सभासद जे भ्रष्ट आणि गुन्हेगार आहेत केवळ त्यांच्या विरुद्ध आमचा लढा आहे. कोणत्याही निरुत्साहाशिवाय निवडणुकांद्वारे अशा भ्रष्ट आणि गुन्हेगार राजकारण्यांना बाहेर काढले पाहिजे. समजून घ्या की आपण जे काही करू शकतो ते केवळ निवडणुकी दरम्यानच. आपल्याकडे जी मतदानाची शक्ती आहे ती कोणती जात किंवा समुदायामुळे आहे असे समजू नका. आपल्या मतदानाद्वारे जे भ्रष्ट आणि गुन्हेगार आहेत त्यांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे.
त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बोधप्रद आणि नैतिकतेचे सर्व धडे काढून टाकले आहेत, याच्याच विरुद्ध महात्मा गांधी होते.
महात्म गांधी दररोज सत्संग करीत असत. त्यांनी दररोज बोधप्रद आणि नैतिक मुल्यांची शिकवण दिली. परंतु हल्ली आपल्या देशात गेल्या काही वर्षात मद्य प्राशनाचे प्रमाण तिप्पटीने अधिक वाढले आहे. म्हणूनच स्त्रिया सुरक्षित नाही आहेत.
तुम्ही दररोज स्त्रियांवर होण्याऱ्या अत्याचारांच्या बातम्या वाचता. परंतु ५-१० वर्षांपूर्वी असे नव्हते. त्याकाळात कोणी स्त्रियांवरील अत्याचारांबद्दल कधी काही ऐकले होते कां? आणि याचे मुख्य कारण आहे मद्य.
मला वाटते की आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांनी जागे होण्याची वेळ आलेली आहे.