“नवरात्रोत्सव” चैत्र आणि अश्विन महिन्यामध्ये श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जातो.हा कालावधी आपल्या मूळ स्त्रोताकडे परतण्याचा आणि स्वतःच्या प्रगतीचा असतो.कारण निसर्ग देखील या कालावाधीमध्ये जुनी मरगळ टाकून नवीन पालवी धारण करत असतो.संपूर्ण चराचरांना परत वसंताची नवसंजीवनी प्राप्त होत असते.
वैदिक शास्त्रानुसार “नव निर्माण” होण्यासाठी पूर्व पिढीला आपल्या मूळ स्त्रोतामध्ये पुन्हा पुन्हा परतणे गरजेचे आहे. निर्मिती ही मंडलाकार आहे,निसर्ग प्रत्येक घटकामधून सतत काही ना काही बनवत रहातो,नवनिर्माणाची प्रक्रिया सतत सुरु आहे.मानवी मन देखील या नवनिर्माणाला अपवाद नाही.नवरात्र आपल्याला आपल्या मनाला मूळ स्त्रोताकडे परत नेण्याची संधी आहे.
दैवी शक्ती,आपली चेतना निव्वळ बुद्धी म्हणूनच नाही तर भ्रांती (गोंधळ) म्हणून देखील प्रकट होत असते.समृदधी म्हणून तसेच क्षुधा,तृष्णा म्हणून ओळखली जाते.समस्त विश्वामधील चेतनेच्या या गुणधर्माला जाणल्याने आपण लवकर मानसिकदृष्ट्या शांत,स्थिर होऊ शकतो.हा गुणधर्म पुरातन पाश्चिमात्य धार्मिक वाद संपुष्टात आणतो.ज्ञान,भक्ती आणि निष्काम कर्म.यामुळेच आपण अद्वैत भाव प्राप्त करू शकतो.
“काली” हे निसर्गाचे अत्यंत भयानक प्रकट रूप आहे.निसर्ग-खरे तर सौंदर्याचे प्रतिक असला तरी त्याला भयानक रूप देखील असते.हा विरोधाभास मान्य केल्यानेच मन शांत आणि सहज होऊन जाते.
नवरात्र म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय नव्हे, खरा संघर्ष चांगला आणि वाईटा मध्ये नाही आहे.वैदिक दृष्ट्या उघड द्वैतभावावर निखळ वस्तुस्थितीचा तो विजय आहे.अष्टावक्र यांच्या म्हणण्यानुसार “बिचाऱ्या लाटेने सागरापासून आपले स्वतःचे अस्तित्व भिन्न राखण्याचा तो अयशस्वी प्रयत्न आहे.”
या भव्य विश्वाला कार्यरत राखणारे अनादी असे तीन गुण आहेत.नवरात्रीमध्ये त्या दैवी शक्तीची आराधना केल्याने या त्रिगुणांमध्ये समतोल प्राप्त होऊन आसपासच्या वातावरणामध्ये सत्व वृद्धी होते.
आपला अंतर्मुख प्रवास आपली नकारात्मक कर्मे नाहीसे करतो.नवरात्र हा आपल्या आत्म्याचा,प्राणशक्तीचा,चेतनेचा विजयोत्सव आहे,ज्या कालावधीत निव्वळ आपली उर्जित प्राणशक्तीनेच महिषासुर(आळस,जडता), शुंभ-निशुंभ(गर्व आणि आत्मग्लानी) आणि मधु-कैटभ(पराकोटीचा लोभ आणि तिरस्कार) यांचा नायनाट करू शकतो.हे विरोधी दिसत असले तरी परस्परपूरक आहेत.आळस सर्व नकारात्मक भावनांचे मूळ आहे.रक्तबिजासुर(भ्रामक कल्पना),चंड-मुंड(तर्क आणि वितर्क),धुम्रलोचन(गैरसमज)आपण यांच्यावर मात आपली प्राणशक्ती,उर्जा वाढवूनच करू शकतो.
साधक आपल्या मूळ स्त्रोताकडे उपवास, प्रार्थना-जप, मौन आणि ध्यानामुळे परतू शकतो.रात्र पुन्हा नवचैतन्य प्राप्त करण्यासाठी असते.ती आपल्याला शारीरिक,सूक्ष्म आणि क्रियाशील अशा तिन्ही स्तरावर विश्रांती मिळवून देते. उपवासामुळे शरीर शुद्ध होते,मौनामुळे चंचल मन स्थिर होवून वाणी शुद्ध होते आणि ध्यान आपल्याला मूळ स्त्रोताकडे नेते.
ज्यांच्यामधून या विश्वाची निर्मिती झाली अशा अनादी त्रिगुणांचा उत्सव साजरा करण्याची संधी म्हणजे “नवरात्र”.आपल्या जीवनावर या त्रिगुणांचा पगडा असतो परंतु आपण यापासून अनभिज्ञ असतो.पहिले तीन दिवस तमो गुण,नंतरचे तीन दिवस रजो गुण आणि शेवटचे तीन दिवस सत्व गुणधर्मांचे असतात.आपली चेतना तमोगुण आणि रजोगुणातून पार होत शेवटच्या तीन दिवसात सत्वगुणामध्ये बहरते.या ज्ञानाचा सन्मान म्हणून दहाव्या दिवशी “विजयादशमी” साजरी केली जाते.
खरेतर विशालामध्येच सूक्ष्म सामावलेले असते.परंतु सुक्ष्माने स्वतःला विशालापासून अलग मानणे हेच संघर्षाचे,तणावाचे कारण होय.बालकाप्रमाणे समस्त विश्वाला सजीव,एकसंघ मानणे हेच “ज्ञानी”चे लक्षण आहे.एका दैवी शक्तीने,शुद्ध चेतनेनेच ही विविध रूपे आणि नांवे धारण केली आहेत.प्रत्येक आकार आणि नामामध्ये एकाच चेतनाशक्तीच्या अस्तित्वाला जाणणे म्हणजेच नवरात्र.म्हणून शेवटच्या तीन दिवसांमध्ये निसर्ग आणि जीवनाच्या विविध पैलूंचा सन्मान करण्यासाठी विशिष्ट पूजा,होम केले जातात.
श्री श्री रविशंकरजी नवरात्र उत्सवामधील यज्ञ,पूजा यांचे महत्व विषद करतात:
“आपल्या अस्तित्वाचे तीन स्तर आहेत-बाह्य जगत,विविध उर्जांनी युक्त सूक्ष्म जगत आणि दिव्यत्व/ईश्वर.येथे केलेल्या होमांचा उद्देशच आपल्या भौतिक आणि अध्यात्मिक स्तरावर प्रगती साध्य करणे हा आहे.जो सर्वांचा मूळ स्त्रोत आहे, त्यात स्थिर होण्यामुळे आपणास गाढ शांती अनुभवण्यास मिळते.ज्यावेळी तुम्ही खोल ध्यानात उतरता तेंव्हाच हे मंत्रोच्चार आपल्यावर परिणाम करतात.हे मंत्र खूपच सामर्थ्यशाली,सुंदर आणि आपल्या सूक्ष्म अस्तित्वाला समृद्ध बनवणारे आहेत.आपण भाग्यवान आहोत की आपल्याला यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
सर्व वेदांमधील पारंगत पंडित येथे मंत्रोच्चार करतील.हे हजारो वर्षांपासून सुरु आहे.समस्त विश्वाच्या कल्याणासाठी हे केले जाते.येथे जे घडतेय त्याच्याशी एकरूप होऊन आपण एकच शरीर,मन आणि आत्मा बनून जातो.येथे जे चालते त्याचा अर्थ नाही समजला तरी आम्हाला खात्री आहे की ते आपल्या जीवनाच्या सूक्ष्म स्तराचे तसेच समस्त मानवजातीचे कल्याण करणारे आहे.
आपल्या बुद्धीला कदाचित हे अनाकलनीय असेल परंतु आपल्या सूक्ष्म स्तराला याची अनुभूती मिळेल.या मंत्रांमुळे निर्माण होणारे तरंग आपल्या सूक्ष्म अस्तित्वासाठी लाभदायी आहेत.या ऊर्जेमुळे आपले वाईट कर्म निघून जातात, इच्छा पूर्ण होतात तसेच वैश्विक स्तरावरील ऊर्जेमध्ये समतोल प्राप्त होऊन सर्व मानव जातीला ते कल्याणकारी आहे. जेंव्हा आपण आंतरिक दृष्टया सक्षम असतो तेंव्हाच इच्छा पूर्ण होतात,साक्षात्कार होतात आपण यशस्वी होतो.
अंतिम सत्य जाणल्याने,सत्यामध्ये शरीर आणि मन स्थिर झाल्याने आपल्या भौतिक गरजा तर पूर्ण होतात तसेच आपणास गाढ विश्रांती प्राप्त होते.येथे जे काही केले जात आहे ते तुमच्या साठी कल्याणकारी आणि उत्कृष्ट असणार आहे - त्याप्रती प्रेम आणि भक्ती बाळगूया.जेंव्हा मक्याला थोडी उष्णता दिली जाते तेंव्हाच त्याच्या लाह्या बनतात.तद्वत आपली चेतना ईश्वरी अंशच आहे.मंत्रोच्चारामुळे ती खुलते आणि प्रकट होऊ लागते.आपली चेतना खुलवण्याची ही उत्कृष्ट संधी आहे.
ओम शांती.”
आपला अभिप्राय येथे कळवा: webteam.india@artofliving.org
नवरात्र संदर्भात अधिक लेख वाचा:
नवरात्रीतील उपवास करण्यात मदत होईल अशा काही पूर्वसूचना
नवरात्र : आपल्या मूळ स्त्रोताकडे परतणे