सीना शुद्धीकरण (Art of Living to rejuvenate Sina river in Marathi)

लोकमत, अहमदनगर मेन

२३ फेब्रुवारी २०१८

संपादकीय

 

नदी ही गावची जीवन वाहिनी असते. गावाची ओळख असते. बहुतांश कथांत नदीकाठच्या गावाचा उल्लेख असतो. मानवाने जेव्हा वस्ती करून रहायला सुरवात केली तेव्हा त्याने बदिकाथ निवडला. पुरातत्व विभाग जे उत्खनन करतो ते नदीकाठीच करतो. कारण नदीकाठी हमखास काहीतरी इतिहास दडलेला आढळतो. अहमदनगर या ऐतिहासिक शहरालाही नदीचा काठ लाभला आहे. मात्र आपल्या शहरातून नदी वाहते याचा या नगरीला पुरता विसर पडला आहे. शहरांनी आपली ही ओळखच पुसून टाकली आहे. बिल्डरांनी, खासगी व्यावसायिकांनी, वीटभट्टी चालकांनी पात्रात अतिक्रमणे करून ही नदीच गिळंकृत केली आहे. महापालिकेनेही शहराचे दैनंदिन सांडपाणी या नदीत सोडून सिनेचा जीव घेतला. ‘सीना बचाव’चे अनेक नारे उठले पण या नदीचे पुनर्वैभव तिला परत मिळू शकले नाही. हरित लवादात प्रकरणे गेली. पण सिनेचा श्वास अजून मोकळा झालेला नाही. नगर तालुक्यातील सासेवाडी ते कर्जत तालुक्यातील गांगर्डा असा सिनेचा प्रवास होतो. निमगाव गांगर्डा येथील सीना नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेतीसाठी केला जातो. मात्र, नगर शहरात ही नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित होत असताना त्याचे सोयर सूतक कोणालाही नाही. प्रशासन, राजकारणी सगळेच याकडे डोळेझाक करून आहेत. सिनेवर भाजीपाला पिकतो. या भाजीपाल्याच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे. जनावरे पाणी पितात. त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न आहे. हे पाणी शेतीसाठी वापरले जाते. रसायनमिश्रित पाणी असल्याने जमिनीचा पोथी खराब होतो. मात्र इतक्या साऱ्या गंभीर समस्या असतानाही दाखल काहीच नाही.सिनेकाठ्ची गावे दुषित झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेने मांडली आहे. पण त्यातूनही ठोस काही घडले नाही.

आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने आता सीना पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. लोकसहभागातून नदीला तीचे वैभव परत मिळवून देण्याचा तिचा प्रयत्न आहे. या उपक्रमाचे स्वागत व्हायला हवे. त्यांना बळी मिळायला हवे. लोकप्रतिनिधींनी ठरवले तर या नदीचा कायापालट शक्य आहे. भाजप व मोदींनी ‘नमामि गंगे’चा नारा दिला आहे. हे भूषण भाजपचे नेते मिरवतात. गंगा शुद्धीकरणाचा विडा उचलला असताना स्थानिक भागाला संजीवनी देणाऱ्या इतर नद्यांचे काय ? अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप चे खासदार आहेत. पालक मंत्रीही याच पक्षाचे आहेत. त्यामुळे या सर्वांनी ‘नमामि सिने’चा नारा द्यायला हवा. नगर महापालिकेने सिने च्या पात्रातील अडथळे दूर करण्याच्या नावाखाली आजवर कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. प्रत्यक्षात हे अडथळे कमी होण्याऐवजी वाढत आहेत. त्यामुळे शिवसेनेलाही संकृती रक्षण करायचे असेल तर, त्यांनीही अगोदर सीना वाचवायला हवी.