माँटेरीयल, कॅनडा
आज बुद्ध पौर्णिमा. बुद्धांचा जन्म दिवस, आजच त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि आजच्या दिवशीच त्यांना देवाज्ञा मिळाली.
आज इतर पौर्णिमांपेक्षा चंद्र २०% मोठा असतो. आजच्या दिवशीचा चंद्र खूप मोठा दिसतो म्हणून आजचा चंद्रोदय जरूर पहा.
आपल्या प्रत्येकामध्ये सिद्धार्थच्या रूपाने छोटा बुद्ध आहे.
सिद्धार्थ कोण? तुम्हाला माहित आहे? बुद्ध हे ‘बुद्ध’ होण्याआधी सिद्धार्थ होते. ते भटकत होते, हरवले देखील. खूप प्रयत्न केला पण प्राप्त काहीही झाले नाही. पण ते ज्ञानपिपासू होते.
ते म्हणायचे, ’जग हे दुःखाने भरलेले आहे आणि मला दुःखापासून मुक्त व्हायचे आहे.’ सर्वकाही दुःख आहे हे त्यांनी जाणले होते परंतु त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता.
म्हणून प्रत्येकामध्ये जो छोटा बुद्ध आहे त्याला जागे करायचे आहे.
बुद्धांनी अतोनात प्रयत्न केले, जमीन आसमान एक केले, सारे दरवाजे ठोठावले. विविध प्रक्रिया मागून प्रक्रिया करून पहिल्या. सारे निरर्थक झाले. कारण हे सर्व करत असताना त्यांचे मन सतत बाहेर धावायचे. मग ते दमले भागले-सारे सोडून दिले. आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले.
विविध प्रयत्न करून जेव्हा ते थकले आणि मग त्यांनी विचार केले की, ‘ठीक आहे, आता मी सर्व काही सोडून देत आहे. मला जरा विश्राम करू द्या,’ त्यांनी सर्व काही सोडून दिले आणि त्यांचे मन अंतर्मुख झाले आणि ते ‘बुद्ध’ बनले.
म्हणून मन अंतर्मुख करा.
दुर्दैवाने बुद्धांना त्याकाळी गुरु लाभले नाहीत. पण आदि शंकराचार्यांना गुरु होते, गुरु लाभले आणि मार्ग अधिक सोपा आणि सुखकर बनला. त्यांना बसता क्षणी समाधी प्राप्त व्हायची. पण बुद्धांना ध्यान आणि समाधी प्राप्त करणे सहज शक्य नव्हते. त्यांच्यासाठी ते कठीण होते. त्यांना कोणी सांगितले उपवास करा, त्यांनी उपवास केला. ते राजघराण्यातील असल्यामुळे ते समर्पण, भक्ती आणि त्यागाबद्धल काहीही जाणत नव्हते. काहीतरी करावे लागते, काहीतरी केले पाहिजे एवढेच त्यांना ऐकून माहित होते. आणि जे ऐकले ते करत गेले. जेवढे करणे तेवढा कर्ताभाव तेवढा अहंकार. या सर्वामुळे बराच कालावधी ते धावतच राहिले.
शेवटी त्यांनी सर्व ‘सोडून दिले ’ आणि त्यांना ज्ञान प्राप्त झाले. अशी कथा आहे.
आपल्या प्रत्येकामधील ‘छोटे मन’ आपणास समर्पण आणि त्याग करू देत नाही. ते सतत मला हे करायचे आहे, मला ते करायचे आहे असे भटकतच असते. मी हे मिळवेन आणि मी ते मिळवेन.
असे काय आहे जे मिळवायचे आहे, याबद्धल सजग झाल्यावर तुम्ही त्याग कराल, समर्पण घडेल आणि ध्यान लागू लागेल. हे म्हणजे आयुर्वेदिक मसाज करून घेण्यासारखे आहे. तुम्हाला फक्त मसाज टेबलवर झोपायचे असते. बाकी काहीही करावे लागत नाही. सारे काही केले जाते. तसेच ध्यान सुद्धा केले जाईल. तुम्ही फक्त ध्यानाला बसा आणि ध्यान घडेल.