चेन्नई मध्ये आलेल्या पुरा नंतर लोक आपला द्वेष विसरून एकत्रित आले आहेत. लोकांना एकत्र आणण्याचा निसर्गाचा आपला एक अद्भुत मार्ग आहे. पूर ग्रस्तांसाठी आलेल्या ५०० टन सामानाचे वाटप आपले स्वयंसेवक खूप मेहनतीने करत आहेत, मी याचे मनापासून कौतुक करत आहे.
-श्री श्री
चेन्नई आणितामिळनाडूच्या इतर भागात झालेल्या जोदार पावसामुळे सामान्य जनजीवनावर परिणाम झाला आणि अनेक भागात महापूर आला. अतिवृष्टीमुळे रस्त्यावरील वाहतूक, हवाई वाहतूक आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली. अन्न आणि वीजपुरवठा विना लोक त्यांच्या घरांमध्ये अडकून पडले. अति प्रमाणात पाणी साचल्यामुळे लोक त्यांच्या घराच्या बाहेर पडू शकत नव्हते.
नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या मुसळदार पावसामुळे चेन्नई आणि आसपासचा परिसर पूरग्रस्त झाला होता. तेथे मदत कार्यात उत्स्फूर्त सेवा करण्यात दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक हे सर्वात अग्रभागी होते. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक लोक बेघर झाले होते आणि इतर अनेक त्यांच्या घरात अडकून पडले होते, त्यांचा अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यापासून संपर्क तुटलेला होता. दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी ताजे शिजवलेले अन्न, ताजे पाव, बिस्किटे, तांदूळ आणि डाळ यासारखे अत्यावश्यक पदार्थ, कपडे, घोंगड्या आणि औषधे यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्याचे काम सेवावृत्तीने केले.
आयसिएफ पेरम्बुर, कोत्तुरपूरम टीएनएचबि झोपडपट्टी, पश्चिम सईदापेठ, तिरुवान्मियुर, नंगानाल्लूर, मेदावक्कम, शोल्लीन्गनाल्लूर, रामापूरम, नंदम्बक्कमआणि चेन्नईमधील अनेक भागात दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी बचाव कार्यात पूरग्रस्तांची मदत केली.
कमरेपेक्षा अधिक पाणी साचलेले असतानासुद्धा अनेक स्वयंसेवक हे त्या भागात मदत करण्याकरिता जाऊन पोचले. मलनिःसारणाचे पाणी आणि पावसाचे पाणी एकत्रित वाहत होते अशा जागीसुद्धा लोकांचा बचाव करण्यासाठी ते जाऊन पोचले आणि अन्न, कपडे आणि घोंगड्या यांचे वाटप केले. काही भागात वाटप केल्या जाणाऱ्या मदत संचामध्ये एक लुंगी, एक साडी, टॉवेल, चादर आणि मुलांकरिता बिस्किटे यांचा समावेश होता.
आयसिएफ पेरम्बुर येथील दि आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रातील स्वयंसेवकांनी १००० लोकांकरिता स्वयंपाक केला, चादरी, लुंग्या आणि साड्या यांचे वाटप १०० पेक्षा अधिक कुटुंबांना केले. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे संपूर्णपणे अंधारात असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये जवळजवळ ४० स्वयंसेवक जाऊन पोचले. आणि ते तशा परिस्थितीत तरीसुद्धा झोपडपट्टीतील प्रत्येक घरात पोचले.
नंगानाल्लूर केंद्रानेसुद्धा तांदूळ, डाळ, कपडे, चादरी, मेणबत्त्या इत्यादी अत्यावश्यक वस्तूंचे वाटप झोपडपट्टी भागात केले. रामापुरम केंद्राच्या टीमनेसुद्धा नंदम्बक्कम भाग आणि त्याच्या आसपासच्या भागातील १००० पूरग्रस्त लोकांना ताजा शिजवलेला भात आणि भाजी यांचे वाटप केले.
पश्चिम सईदापेठ येथे लोक त्यांच्या घरात अडकून पडले होते. स्थानिक लोकांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांच्या एका टीमने घरोघरी जाऊन अन्नाच्या पॅकेट्सचे वाटप केले. त्यांनी ३ तासांपेक्षा अधिक काळ चिखलयुक्त पाण्यात घालवला अन्नाची २५० पॅकेट्स वाटण्यात. आणि हे त्यांचे मदत कार्य सुरु असताना पाण्याची पातळी हनुवटीपर्यंत वाढली होती.
विविध केंद्रांमधून भरपूर कार्यकर्त्यांनी मदत कार्याला हातभार लावला आहे.