नवीन वर्ष सुरु होत असताना आपल्या मनात एकच प्रामाणिक इच्छा असते की आपले कुटुंबीय, मित्र मंडळी आणि सर्वांनाच सदा मन:शांती प्राप्त व्हावी. खरेतर शांती कोठे मिळेल हे माहित असल्याशिवायच लोक शांतीच्या शोधात असतात.
शांती प्राप्त करण्यासाठी समाजापासून दूर हिमालयात जाऊन एकांतवासात रहावे लागते कां? अजिबात नाही. शांती म्हणजे फक्त संघर्ष आणि हिंसा यांचा अभाव नव्हे. शांतीचे मूळ आपल्यातच आहे. शांती आपला मूळ स्वभाव आहे.
त्यासाठी काय करायला हवे तर आपल्या वृत्ती आणि आपल्या जीवनाबद्दलच्या दृष्टीकोनामध्ये बदल करायला हवा. मन:शांतीचा अभाव हेच आपल्या व्यक्तिगत जीवनातील आणि समाजातील अस्वस्थतेचे मूळ कारण आहे. या अति क्षुब्ध जगात मन:शांती मिळवण्याचे सात मार्ग हे आहेत.
१. जीवनाबद्दलचा दृष्टीकोन विशाल ठेवा !
जेंव्हा आपण विशाल दृष्टीकोनातून जीवनाकडे बघू लागतो तेंव्हाच आंतरिक सामर्थ्य,शांती आणि स्थैर्य प्राप्त होऊ लागते. जीवनाबद्दल आणखी जाणून घेणे, अस्तित्वाच्या विविध स्तरांच्या गमतीशीर लीला, मनाला नियंत्रित करणारे घटक, आपली आत्मोन्नती कशाने होते-हे जाणून घेतल्याने आपल्याला विविध प्रसंग, परिस्थिती आणि लोक यांना समर्थपणे हाताळण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
सजगतेने या सृष्टीकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे. यातील सौंदर्य, वैविध्य,त्यांच्यातील गोंधळ आणि कोप यांचीदेखील एक लय आणि एक उद्देश आहे. अनपेक्षितता आणि अनिश्चितता हा या सृष्टीचा भागच आहे आणि आपण जेंव्हा या अनिश्चिततेला गृहीत धरत नाही तेंव्हा आपली मनःशांती ढळते.
जीवनाबद्दल जाणून घेण्याच्या प्रक्रियेलाच मी ‘अध्यात्म’ म्हणतो.
अध्यात्मिक दृष्टिकोनामुळे हे जग आणखी चांगले करण्याची आशा, आवड आणि इच्छाशक्ती निर्माण होते.
२. आव्हाने स्विकारा !
जीवनातील विरीधी गोष्टींना सामोरे जा आणि येणाऱ्या जाणाऱ्या वादळांना खंबीरपणे सामोरे जा. हे आपणा सर्वांनाच थोड्याफार प्रमाणात माहिती असतेच परंतु त्यांची सजगतेने जोपासना होत नाही. खरेतर आपण आपल्या सभोवतीच्या गोंधळामध्ये आणि आव्हांनामध्ये भक्कमपणे टिकून राहण्यासाठी आणि हसतमुखाने त्यातून पार होण्यासाठी गरजेच्या आंतरिक सामर्थ्याची इच्छा धरायला हवी. आव्हाने आणि संघर्षाशिवाय आपले जीवन निरस बनेल आणि आपण आळशी आणि सामर्थ्यहीन बनू.हि आव्हाने आणि प्रसंग आपल्याला आपल्या आत्मसामर्थ्याची ओळख करून देतात आणि जीवनात प्रगतीस प्रवृत्त बनवतात.
३. मन भौतिकतेपेक्षा श्रेष्ठ आहे
आंतरिक शांती मिळवण्यातील एक महत्वाची पायरी म्हणजे मनाला प्रशिक्षित करणे. जेंव्हा मन शांत असते तेंव्हा आपल्या भावना सकारात्मक आणि हलक्या फुलक्या असतात आणि आपली वर्तणूक शांतीशी समरस राहते. ध्यान,योग आणि प्राणायाम हि आंतरिक शांती आणि स्थिरता यांची क्षमता वाढवणारी प्रभावी आयुधे आहेत. दररोज १५ ते २० मिनिटे ध्यान करणे गरजेचे आहे.
४. तणावग्रस्त मनाला व्यवस्थित हाताळा
अस्थिरता वाढत असलेल्या या जगात वाढत असलेला मानसिक ताण हा आपल्या शांतीच्या आड येतो. आपले विचार, आपल्या भावना आणि आपल्या वर्तणूकीवर या तणावाचा परिणाम होतो आणि आपणच तयार केलेल्या नकारात्मकतेच्या दुष्टचक्रात आपण अडकत जातो. तणाव रहित मन जास्त शांत, दयाळू आणि खुले असते.
तणावाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे आपणाकडे पुरेसा वेळ आणि ऊर्जा नसताना आपणास खूप काही करायचे असते. आपल्याला कामाचा भार कमी करणे किंवा वेळ वाढवणे हे अशक्य आहे. परंतु योग, ध्यान आणि आहाराच्या योग्य सवयींमुळे स्वत:ची ऊर्जा वाढवणे सहज शक्य आहे. ध्यानापासून आपल्याला जी ऊर्जा मिळते ती झोपेपेक्षा जास्त असते. नियमित ध्यानधारणा, प्राणायाम, आहार आणि झोप याप्रती सजग राहिल्याने आपल्यातील ऊर्जास्त्रोत जागऊन आपण तणावमुक्त होऊ शकतो.
५. सेवा करा आणि उपयोगी रहा
आंतरिक शांती अनुभवण्यासाठी आपण आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी उपयोगी पडण्यास बांधील राहिले पाहिजे. निस्वार्थी सेवेनेच संतुष्टी,समाधान मिळू शकते. आपण जेंव्हा दयाळू असतो तेंव्हाच आपल्याला प्रेम आणि शांतीचा अनुभव मिळतो जो आपला मूळ स्वभाव आहे. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची, गरजूंना मदत करण्याची आणि पीडितांचे दु:ख दूर करण्याची शपथ घेऊया.
६. योग्य प्राथमिकता लावा
जगात आपण जो संघर्ष बघतो आहोत त्याचे एक कारण म्हणजे आपणा सर्वांमध्ये जे सामाईक आहे त्याप्रती आपलेपणाचा अभाव. आपण सर्वजण प्रथम एका मानवी कुटुंबाचा भाग आहोत त्यानंतर लिंग, वर्ग, राष्ट्र, आणि धर्म यांचे ओळख सांगणारे मुद्दे येतात. जेंव्हा आपल्या ओळख असणाऱ्या मुद्यांच्या प्रथामिकतेमध्ये क्रम बदलतो तेंव्हा दु:ख आणि इतर सर्व चुकीच्या गोष्टी घडतात.
मन शांत असेल तेंव्हा या पृथ्वीबद्दल आणि सर्व लोकांबद्दल आपलेपणा वाटणे सहजशक्य आहे. मग आपल्या सभोवतालच्या लोकांवर विश्वास ठेवणे सोपे होते आणि एक आधार देणारी फळी तयार होते. जगात खूप चांगुलपणा आहे यावर विश्वास ठेवल्याने आपल्याला सामर्थ्य आणि मन:शांती मिळते. लोकांचा दृष्टीकोन विशाल झाला तर आपण आपल्यातील वैविध्य साजरे करू शकू आणि आपल्या एकमेकांच्या तत्वांसह आनंदी होऊ शकू.
७. सहृदयी व्हा
तंत्रज्ञानामुळे आपले जीवन जास्त उत्पादनक्षम झाले आहे मात्र त्यामुळे आपण संकुचित वृत्तीचे झालो आहोत. अगदी पलीकडच्या खोलीत असलेल्या व्यक्तीशीही आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपर्क साधतो. जीवन हे मेंदू आणि हृदय या दोन्हीचे मिश्रण आहे. खरी शांती मिळण्यासाठी जगाशी हृदयाचे हृदयाशी संपर्क जुळून येणे महत्वाचे आहे.
शांती म्हणजे निष्क्रिय होणे नव्हे.
बहुतेकजण आंतरिक शांतीला बाह्य संतुष्टी समजण्याची चूक करतात. शांतीची अवस्था म्हणजे कार्यक्षम नसणे तसेच खूपच आंदोलक असणे नव्हे. जीवनात जे हवे आहे ते मिळवण्यासाठी ‘शांत मनाने जोशपूर्ण क्रिया करणे’ हे उत्कृष्ट सूत्र आहे.
आंतरिक शांतीमुळेच बाह्य शांती मिळणे शक्य आहे. या नवीन वर्षी आपण आपल्या हृदयात शांती जागवूया आणि मग तीच शांती आपल्या सभोवतालच्या जगात पसरवूया.
- श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रवचनांतून संकलित