श्री श्री रविशंकर :
प्रत्येक सजीवाला आनंदी व्हायचे असते. पैसा असो,अधिकार असो किंवा कामवासना, हे सगळे तुम्हाला आनंद मिळवण्यासाठीच हवे असते.काही लोक दु:खात सुद्धा मजेत असतात कारण त्यांना त्यातूनआनंद मिळत असतो.
आनंद मिळवण्यासाठी आपण ज्याच्या शोधात असतो ते मिळाल्यानंतरसुद्धा आपण आनंदी नसतो.एखाद्या शाळकरी मुलाला वाटते की तो कॉलेजमध्ये गेला की त्याला जास्त स्वातंत्र्य, मोकळीक मिळेल आणि मग तो आनंदी होईल. तुम्ही जर एखाद्या कॉलेजला जाणाऱ्या मुलाला तुम्ही विचारले की तो आनंदी आहे कां तर त्याला वाटते की त्याला नोकरी मिळाली की तो आनंदी होईल. नोकरी व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या एखाद्या माणसाशी बोललात तर तुम्हाला माहित आहे ते काय म्हणतील ? त्यांना त्यांच्या आयुष्यात एक चांगला जोडीदार मिळाला की ते आनंदी होतील. त्याला त्याचा जोडीदार मिळतो, आता त्याला आनंदी होण्यासाठी एक मूल हवे असते. ज्यांना मुले आहेत त्यांना विचारा, ते आनंदी आहेत कां ? मुले चांगले शिक्षण घेऊन मोठी होऊन आपल्या पायावर उभी राहिल्याशिवाय आनंदी कसे होता येईल ? जे निवृत्त झाले आहेत त्यांना विचारा, ते आनंदी आहेत कां ? त्यांना त्यांचे तरुणपणीचेच दिवस सुखाचे वाटत असतात.
सगळं आयुष्य भविष्यात कधीतरी मिळणाऱ्या आनंदाची तयारी करण्यातच निघून जाते. हे म्हणजे असे झाले की सगळी रात्र अंथरून नीट घालण्यातच गेली आणि झोपायला वेळच नाही झाला.आतून आनंदी असण्याचे किती मिनिटे, किती तास,किती दिवस तुम्ही घालवले आहेत? तेवढेच क्षण तुम्ही खरे आयुष्य जगला आहात.
आयुष्याकडे बघण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे "काहीतरी विशिष्ठ ध्येय साध्य केल्यानंतर मी आनंदी होईन.” आणि दुसरे म्हणजे असे म्हणणे की, “काहीही झाले तरी मी आनंदीच आहे.” तुम्हाला कोणत्या प्रकारचे आयुष्य जगायचे आहे?
आयुष्यात ८०% आनंद आणि २०% दु:ख असते.पण आपण २० % लाच धरून बसतो आणि त्याचे २०० % करतो.असे मुद्दाम करत नाही, ते आपोआप होते. या जगात सगळे काही नेहमीच अगदी अचूक असू शकत नाही.अगदी उदात्त भावनेने,उत्तम,श्रेष्ठ अशा कृतीत सुद्धा काही त्रुटी असतात. ते अगदी साहजिक आहे. दुर्दैवाने आपल्या मनाची वृत्ती अशी असते की त्या त्रुटींनाच पकडायचे आणि घट्ट धरून ठेवायचे.आणि या सगळ्यात आपले मन:स्वास्थ्य बिघडते.
आपल्या भावनांना कसे हाताळायचे? मोठीच समस्या आहे.आपण शरीराने वाढलो तरी बरेचदा आपण भावनिक दृष्टीने मोठे होत नाही. भावनिक परिपक्वतेचा अभाव हा नेहमी तुमच्या भावनांची काळजी करत असतो. जणू काही तुम्ही स्वत:च्याच भावनांना बळी पडला आहात. “ओह, मला असं वाटतं,मला तसं वाटतं ! काय करणार?” पण तुमच्या वाटण्याचे काय मोठेसे ? मी तुम्हाला सांगतो त्या भावनांचं एक गाठोड बांधा आणि टाकून द्या समुद्रात. एकदा का तुम्ही तुमच्या भावनांपासून मुक्त झालात की तुम्ही आनंदी व्हाल.
तुमचे मन:स्वास्थ्य कां बिघडते याचा जरा विचार करा. बहुतेक वेळा तुम्हाला कुणीतरी काहीतरी मूर्खासारखे बोलते. ते असे मूर्खासारखे कां बोलले? कारण त्यांच्या मनात काहीतरी कचरा साठला होता आणि तो त्यांना बाहेर टाकायचा होता आणि तुम्ही तिथेच होतात तो पकडायला आणि एकदा तुम्ही तो कचरा पकडला की तो अगदी प्रेमाने पकडून ठेवता. जागे व्हा ! तुमचे हसू कुणालाही हिरावून घेऊ देऊ नका.
कोणालाही सतत चांगले किंवा वाईट वाटू शकत नाही. चांगल्या किंवा वाईट भावना लाटांसारख्या येतात.उसळून आलेली लाट तुम्ही थांबवू शकत नाही तसेच तुम्ही लाट निर्माणही करू शकत नाही. जशा लाटा येतात आणि जातात, ढग येतात आणि जातात. तशाच भावना येतात आणि जातात. तऱ्हेतऱ्हेच्या भावनांच्या लाटा येतात आणि नाहीशा होतात. पण आपण त्याचा इतका मोठा बाऊ करतो आणि की ते आपल्या मनावर घाव घालत रहाते. हा भावनिक कचरा बेकार आहे आणि अपरिपक्वतेचे लक्षणही आहे.
आपले जीवन एखाद्या नदीसारखे आहे. नदीला वाहण्यासाठी दोन किनारे लागतात. पूर आणि वहाती नदी यात फरक हा आहे की नदीमध्ये पाणी पद्धतशीरपणे, ठराविक दिशेने वाहात असते. आणि पुराच्या वेळी पाणी गढूळ आणि दिशाहीन असते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील ऊर्जेलाही वाहण्यासाठी एका ठराविक दिशेची गरज असते. जर तुम्ही दिशा दाखवली नाही तर सगळा गोंधळ होतो. आज बहुतेक लोक गोंधळलेले असतात कारण त्यांना आयुष्याची योग्य दिशा मिळालेली नसते. जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा तुमच्यात केवढी तरी चैतन्य शक्ती असते. पण जेंव्हा या चैतन्याला कुठे जायचे, कसे जायचे ते माहित नसते तेव्हा ते अडकून बसते. आणि जेंव्हा ते साठून रहाते तेव्हा ते खराब होते. जसे पाणी वाहते रहायला हवे तसे जीवनही पुढे जात रहायला हवे.
या ऊर्जेला एका विशिष्ठ दिशेने जाण्यासाठी निश्चयाची,बांधिलकीची गरज आहे. जीवन निश्चयावर,बांधिलकीवर चालते. जीवनात अगदी छोटी गोष्ट असो वा मोठी ती बांधिलकीमुळेच पुढे जात असते. विद्यार्थी शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतो ते निश्चय करूनच. तुम्ही डॉक्टरकडे जाता ते निश्चय करूनच की डॉक्टर जे काही सांगतील ते मी ऐकेन, औषधे नीट घेईन. बँकाही अशा बांधिलकीवर चालतात. सरकार बांधिलकीवर चालते. सांगायची गरज नाही पण कुटुंब बांधिलकीवर चालते. आई मुलाशी बांधील असते. मूल पालकांशी बांधील असते. नवरा बायकोशी बांधील असतो आणि बायको नवऱ्याशी बांधील असते. प्रेम असो, व्यवसाय असो , मैत्री असो वा कार्यालय असो, बांधिलकी ही असतेच.
ज्याच्यात बांधिलकी नसते त्याला तुम्ही सहन करू शकत नाही. पण हे बघा की तुम्ही तुमच्या आयुष्यात किती बांधिलकी स्वीकारली आहे? अर्थात आपल्याकडे अधिकार, क्षमता, पात्रता किती आहे यावर बांधिलकी अवलंबून असते. तुम्ही जर तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायला बांधील असाल तर तुम्ही तेवढी पात्रता, अधिकार तुम्ही कमावता. जर तुमची बांधिलकी समाजासाठी असेल तर तुम्हाला तेवढी शक्ती, आनंद आणि तेवढा अधिकार मिळेल. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही योग्य प्रकारे वापरले तर तुम्हाला आणखी दिले जाईल ! हा निसर्गाचा नियम आहे. जर तुम्ही तुमच्या कोत्या मनातच अडकून राहिला असाल तर निसर्ग तुम्हाला आणखी कां देईल ?
आणखी जास्त मिळवण्याची वृत्ती तुमच्यात असतेच, तुम्ही फक्त त्याला एक वळण द्यायला हवे. “मला आणखी जास्त काय मिळेल ?” असे म्हणण्याच्या ऐवजी, “ मी आणखी जास्त काय करू शकतो ?” मग तुम्हाला कळेल की त्यातच आनंद आहे. तुम्ही जितकी जास्त जबाबदारी घ्याल तितके तुम्ही जास्त अधिकार मिळवाल.
तुम्ही जितकी जास्त बांधिलकी स्वत:कडे घ्याल तितके ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे जास्त अधिकार येतील. जितकी जास्त मोठी बांधिलकी तितक्या गोष्टी सोप्या होतील. जितकी बांधिलकी लहान तितके तुम्हाला घुसमटल्या सारखे होईल. लहान सहान बांधिलकीने तुम्ही घुसमटता कारण तुमची क्षमता जास्त आहे. पण तुम्ही तर लहानशा गोष्टीत अडकलेले असता !
सहसा आपल्याला असे वाटते की आपल्याकडे साधन सामुग्री असायला हव्यात मग आपण जबाबदारी घेऊ. पण तुम्ही जितकी जास्त जबाबदारी घ्याल तितकी साधन सामुग्री तुमच्याकडे आपसूकच चालत येईल.तुम्हाला विचार करत बसायची गरज नाही की साधन सामुग्री कोठून येईल. जर काही करण्याची खरी जिद्द तुमच्यात असेल तर साधन सामुग्री जेव्हा हवी तेव्हा, जितकी हवी तेवढी ती सहज मिळत जाते.
श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य www.artofliving.org
Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri