श्री श्री रविशंकर :
अर्जुनाला जेव्हा मार्गदर्शनाची नितांत गरज भासे तेव्हा श्रीकृष्ण त्याला प्रथम हे सांगत की, “हे अर्जुना, तु मला अत्यंत प्रिय आहेस.” आपल्याला या गोष्टीवर श्रद्धा ठेवली पाहिजे की देवाला आपण अत्यंत प्रिय आहोत. एकदा हा विचार मनात ठसला की मग बाकी काहीच करायला नको. जसे एखादे मूल कधीच काळजी करत नाही की आईने घरी स्वयंपाक केला असेल की नाही? तो घरी जातो तेव्हा जेवण तयार असतेच.असा विचार कधी मनात येतो कां, की घरी फोन करून विचारुया की तिने स्वयंपाक केला आहे की नाही, ती झोपली असेल की जागी असेल ? नाही. तसे होत नाही. घरी गेले की आई ताटात जेवण वाढतेच.आई बद्दल असलेला हा असा विश्वास देवाबाद्दलही वाटला पाहिजे की देव माझा आहे आणि त्याचे माझ्यावर प्रेम आहे.तो माझ्यावर सगळ्याचा वर्षाव करेल. हे सगळे जग त्याने माझ्यासाठी निर्माण केले आहे. अशी भावना कधी येईल तुमच्यात ? दहा वर्षाच्या साधनेनंतर? आयुष्याच्या शेवटी? कधी होईल हे तुमच्याकडून? मला सांगा, इतका विश्वास निर्माण व्हायला,अशी भावना मनात जागवायला तुम्ही किती वेळ घेणार आहात? हे आजपासूनच करायला लागा, या क्षणापासून.हे मिळवण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे ? गंगातीरी जायचं की हिमालयात जाऊन तपस्या करायची? काय करायला हवं ? तासन तास तपस्या करायची? कुणाबद्दल आपलेपणा वाटायला किती वेळ लागतो? तुम्ही एक आमंत्रण पत्रिका छापता, तुमच्या बहिणीचे किंवा भावाचे लग्न होते आणि एक भाऊजी किंवा वहिनी आपल्या घरात येते. कुणाला भाऊजी किंवा वहिनी मानायला कितीसा वेळ लागतो ? नाते जोडायला किती वेळ लागतो? नाते हे काळावर अवलंबून नाहिये. जर आपण आपल्या हृदयात देवाशी नाते जोडले तर मग आपल्या जीवनात चमत्कार घडायला कशी सुरवात होते ते बघतच राहाल.
श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य www.artofliving.org
Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri