श्री श्री रविशंकर
बुद्धिमान व्यक्तीकडे आंतर्बाह्य चार तंत्र असतात. ती म्हणजे साम, दान, भेद आणि दंड . जगात लोकांबरोबर व्यवहार करण्यासाठी आणि हुशारीने जीवन जगण्यासाठी ‘साम’ हे पहिले तंत्र आहे. हा शांती आणि समजूतदारपणाचा मार्ग आहे. जर या तंत्राचा उपयोग झाला नाही तर ‘दान’ हे दुसरे तंत्र वापरावे. याचा अर्थ आहे जसे आहे तसे होऊ देणे, क्षमा करणे, असू देणे. जर लोकांना तुमच्या मनाचा मोठेपणा समजला नाही तर मग तिसऱ्या म्हणजे ‘भेद’ या तंत्राचा उपयोग होतो. याचा अर्थ आहे अलग करणे, दूरी निर्माण करणे. जर कुणी तुमच्यावर त्रासलेला आसेल तर आधी तुम्ही त्यांच्याशी बोला. जर त्याने काम नाही झाले तर तर प्रेमाने त्याच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना स्वत:लाच समजून घ्यायला वेळ द्या. तुमच्या मनाच्या मोठेपणाने आणि दुर्लक्ष करण्याने त्यांना त्यांची चूक समजेल. पण तरीही त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्ही ‘भेद’ करा, त्यांना दूर करा. जर तिथे संबंधित दोघे जण असतील तर दुसऱ्याशी जराशी जवळीक करा. असे करण्याने त्याला ते जाणवेल आणि त्याची चूक उमजेल. जर यानेही काम झाले नाही तर मग शेवटी आहे ‘दंडा’.
याच चार पद्धती तुम्ही तुमच्या स्वत:च्या बाबतीतही वापराव्या. मात्र आंतरिक जीवनासाठी त्या एकानंतर एक अशाप्रकारे वापरायच्या नाहीत. साम – मनाचा समतोल राखणे. सुखाचे क्षण आले तर त्याकडे नुसते बघा. दु:खद क्षण आले तर त्याकडेही असेच बघा. आपल्या मनाचा समतोल राखा. दान – म्हणजे सोडून देणे. ज्याच्यामुळे विघ्न येते आहे त्या गोष्टी सोडून देणे. असे विचार जे तुम्हाला संतुलनाच्या राज सिंहासनावर आरूढ होऊ देत नाहीयेत असे विचार सोडून देणे. याचा अर्थ असा की तुमच्या मनाला दु:ख देणाऱ्या गोष्टी, सर्व समस्या आणि मनस्ताप देणाऱ्या गोष्टी समर्पित करून टाकणे.
मन जेव्हा स्वत:ला म्हणते की, “अरे वा, हे तू चांगलं केलंस” तेव्हा तुम्ही आनंदाने उड्या मारू लागता आणि जेव्हा मन म्हणते की, “हे काम तू चुकीचे केलेस” तेव्हा खचून खाली बसता. नकारात्मक कामाने तुम्हाला त्रास होतो पण ही नकारात्मकता काही सारखी रहात नाही. चांगले काम केल्याने तुम्हाला सुखद अनुभव येतो पण काही वेळाने तोही नाहीसा होतो. प्रत्येक कार्य आणि त्याचे फळ संपते. ते काही कायमचे रहात नाही.
दान म्हणजे देणे. यात क्षमेचाही अंतर्भाव आहे. जेव्हा तुमचे मन इकडे तिकडे जाऊ लागते तेव्हा त्याला जाऊ द्या. त्याला पकडून ठेऊ नका. त्याच्यामागे जाऊन त्याला परत आणा. असं म्हणू नका की, “मी खूप वैतागून गेलो आहे. थकून गेलो आहे.” आपल्या मनाबद्दल घृणा बाळगू नका. आपल्या मनाला क्षमा करुन टाका. असं म्हणा की, “ अज्ञानामुळे माझें मन अशा मूर्ख विषयांच्यामागे धावते आहे.” म्हणजे मग मनाबरोबर चालू असलेला झगडा संपून जाईल.
आता आपण ‘भेद’ म्हणजे काय ते बघू. भेद करणे म्हणजे तुलना करून फरक समजून घेणे. उपयोगी गोष्टीची निरुपयोगी गोष्टीशी तुलना करणे. हे शरिर अगदी पोकळ आणि रिक्त आहे. त्यात कधी सुखद तर कधी दु:खद तरंग निर्माण होतात. आणि तुम्ही त्याकडे लक्ष दिलेत की ते नाहीसे होतात. तुमच्या कणा कणातून ऊर्जा निर्माण होऊ लागते. आणि तुम्ही त्या ऊर्जेकडे लक्ष दिलेत की ती समप्रमाणात वाहू लागते. संतुलन निर्माण करते आणि तुम्हाला जाणवू लागते की तुम्ही म्हणजे हे शरीर किंवा हे स्पंदन नाही आहात.
श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य www.artofliving.org
Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri