- श्री श्री रविशंकर
प्रेम ही गोष्ट आहे की त्याचा सर्वात जास्त शोध घेतला जातो परंतु सर्वात कमी व्यक्त केली जाणारी जीवनातील अनाकलनीय गोष्ट आहे. आपण प्रेम इतक्या अनेक प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो तरीपण ते एक रहस्यच राहते. आणि प्रेम त्याच्या संपूर्णतेने, त्याच्या समग्रतेने व्यक्त केले गेले असे क्वचितच घडते.
येशू आणि प्रेम हे समानार्थी आहेत. जर तुम्ही प्रेम म्हणता तर तुम्हाला येशू म्हणण्याची गरज नाही आणि जर तुम्ही येशू म्हणत आहात तर त्याचा अर्थ होतो प्रेम. येशू एकदा म्हणाला, “जर तुम्ही देवाला माझ्या नावाने बोलावले तर तुम्ही जे काही मागणी कराल ते तुम्हाला मिळेल. कारण देव हा प्रेम आहे.” प्रेमाचे असे संपूर्ण व्यक्त होणे तुम्हाला येशूमध्ये सापडते. तुम्हाला इथे तिथे जी काही थोडीफार झलक मिळते ती संपूर्णत्व दर्शवते, अव्यक्ताची ती परम अभिव्यक्ती जिला सतत व्यक्त करण्याकरिता जीवनाची धडपड चाललेली आहे.
प्रेम तुम्हाला दुर्बल बनवते, परंतु तुम्हाला स्वर्गाचे राज्य घेऊन येते. तुम्ही कितीही भक्कम असलात तरीही तुम्ही प्रेमात पडल्यावर अशक्त होता. तरीसुद्धा प्रेम ही या विश्वातली सर्वात प्रभावशाली शक्ती आहे. प्रेम तुम्हाला दुर्बल बनवते म्हणून ते भीतीदायकसुद्धा आहे. हजारोंमध्ये केवळ काही थोड्यांनी येशूचे अनुसरण केले. अनेकांनी ऐकले पण केवळ काहीजणच आले. अनेक चमत्कारांचे दर्शन घडवूनसुद्धा केवळ मुठभर लोकांनी त्याला मान्य केले.
येशू म्हणाला, “मी आलो आहे ते माणसाला माणसाच्या, वडिलांना मुलाच्या, मुलीला आईच्या विरुद्ध ठेवायला.” खूप थोडे लोक आहेत ज्यांना याचा अर्थ काय आहे ते खरोखर समजले आहे. ज्यांचा तुम्ही मित्र म्हणून विचार करता ते खरे तुमचे मित्र नाहीत कारण ते तुमची त्या विषयावरील श्रद्धा दृढ करतात आणि आत्म्याला अशक्त करतात. “मी आलो आहे ते एकमेकांच्या विरुद्ध ठेवायला, मी आग लावायला आलो आहे, शांती निर्माण करायला नाही.” येशू हे म्हणाला कारण त्याला झोपेची खोली माहित होती. जेव्हा तुम्ही काहीतरी छान, शांत वाटणारे बोलता तेव्हा सगळे झोपी जातात आणि जेव्हा काहीतरी सनसनाटी असेल तर लोक जागे होतात आणि ऐकतात. मानवी मन असेच कार्य करते. आणि येशूने लोकांनी या मनाला ओलांडून आत्म्याकडे, जीवनाच्या स्रोताकडे, स्वयंकडे वळावे म्हणून सर्वप्रकारचे प्रयत्न केले. तुम्ही या मर्यादित अस्मितेला तोडा आणि तुमच्यात असलेल्या दिव्यत्वाला ओळखा. तुम्ही केवळ एक मानव असण्यापेक्षा कितीतरी जास्त आहात; तुम्ही दिव्यत्वाचा एक भाग आहात. तुम्हाला वारसाहक्काने हे राज्य मिळणार आणि ते राज्य आता इथे आहे, तुमच्या आतमध्ये.
प्रेमाला नांव नाही, आकार नाही. प्रेम अमूर्त आहे आणि तरीसुद्धा ते ठोस आहे. त्याला नांव नाही किंवा आकार नाही परंतु ते प्रत्येक नांव आणि प्रत्येक आकारामध्ये प्रगट होते. हे निर्मितीचे रहस्य आहे.या सृष्टीमध्ये तुम्हाला सगळीकडे प्रेमच प्रेम दिसेल जर केवळ तुमच्याकडे ते पाहण्याची दृष्टी असेल तर. फक्त एका पक्षिणीला आणि घरट्यातील छोट्याशा पिलाला पहा. पक्षीण येते आणि तिच्या त्या लहानश्या पिलाला कशी भरवते. पहा ते छोटेसे पिल्लू कशी आपल्या आईची घरट्यात परतण्याची वाट पाहते. यामध्ये प्रेम आहे. पाण्यातील माश्यांमध्ये प्रेम आहे. आकाशात प्रेम आहे. पाण्याच्या खाली प्रेम आहे. जमिनीवर प्रेम आहे. आणि अवकाशामध्ये प्रेम आहे.
प्रत्येक आकार हा प्रेमाने युक्त आहे आणि प्रत्येक नांव हे प्रेमाचे प्रतिनिधित्व करते. आणि अश्याप्रकारे येशू आणि पिता एकच आहे. पिता हा त्याच्या निर्मितीसोबत एक आहे. भारतामध्ये निर्माता आणि निर्मिती यांची तुलना ही नृत्य आणि नर्तक यांच्याबरोबर केली जाते. नर्तक असेल तरच नृत्य शक्य आहे. नृत्याच्या प्रत्येक हालचालीमध्ये नर्तक आहे. निर्माता हा निर्मितीच्या प्रत्येक अणुरेणूत आहे. हेच तर आहे सर्वव्यापी, सर्वशक्तिमान असणे. जर देव सर्वव्यापी आहे म्हणजेच तो सगळीकडे उपस्थित आहे, हो ना? निर्माता जर निर्मितीपेक्षा निराळा आहे तर मग तो निर्मितीमध्ये उपस्थित असू शकत नाही. याचा अर्थ असा झाला की तो सर्वव्यापी नाही. मग तर देवाच्या संपूर्ण व्याख्येला काहीच अर्थ उरला नाही.
प्रेम सगळीकडे उपस्थित आहे, परंतु कोठेतरी त्याची संपूर्ण अभिव्यक्ती मिळते. आणि स्वयंचे ज्ञान तुम्हाला प्रेमाच्या परिपूर्ण अभिव्यक्तीकडे, प्रेमामध्ये बहरण्याकडे घेऊन जाते. ते तुमची दृष्टी सर्व बारीकसारीक गोष्टींवरून वर उचलते. एक देव सर्वांची काळजी घेतो आहे. ना अजगर नोकरीवर जातो ना पक्षी परिश्रम घेतो. सगळ्यांची काळजी घेतली जाते आहे. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते आहे.
येशू म्हणाला, “एकमेकांवर इतके प्रेम करा जितके मी तुमच्यावर प्रेम करतो.” ते मूर्तिमंत प्रेम तुम्हाला आणखी बघण्याची काय गरज?