त्या म्हणतात “ज्यावेळी बाळ जन्माला येते त्याचवेळी मातेचाही जन्म होतो”. श्रद्धा शर्मा ह्यांच्याशी बातचीत करताना मेघना कल्ता यांनी ही भावना व्यक्त केली. तारिणी नावाच्या एक वर्षीय मुलीची ”नवजात आई" असण्याचा हा अनुभव:
तारिणीच्या डोळ्यात एक असा काही निरागसपणा, अशी एक आशा दिसत होती की माझा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं. जणू काही माझी मुलगी हे माझेच प्रतिबिंब आहे. मातृत्व हा एका स्त्रीच्या जीवनाला सर्वात परिपूर्णत्व देणारा सुंदर अनुभव असतो.
अचानक झालेला बदल:
तारिणीच्या जन्मानंतर सर्वकाही एकाएकी बदललं आणि तेही ३६० अंशाने. माझी मी राहिलेच नाही.
तारिणी सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली होती. सगळ्यांचे लक्ष माझ्यावरून हटून तिच्यावर राहू लागलं.
सुरुवातीचे ४० दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू लागला.
माझ्या बाळाला मिळत असलेलं प्रेम मलाही मिळावं असं वाटू लागलं. आयुष्याच्या ह्या टप्प्यात काही स्त्रिया मानसिक रित्या खचतात, चिडचिड्या बनतात. त्याचं कारण त्याना शारीरिक स्तरावर पीडा सहन केल्यामुळे व शरीरात होणारे बदल स्वीकारताना त्रास होतो.
योगाभ्यासामुळे शीघ्र स्वास्थ्याची पुनर्प्राप्ती होऊ शकते:
माझी प्रसूती c-type ची झाली. वेदना होत असल्या तरी मी त्यांना शांतपणे सामोर जाऊ शकले. कारण मी नियमितपणे योगाभ्यास व ध्यान करते. भावनांवर नियंत्रण ठेवणे मला शक्य झाले ते योगाभ्यासामुळे. परिणामी मला माझी व बाळाची काळजी घेण्याकरिता बळ मिळाले. प्रसूती नंतर ६ महिने योगाभ्यास न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. म्हणून थोडा वेळ बसण्याचा सराव होताच मी ध्यान करू लागले. झोपून थोडा वेळ ध्यान व योगनिद्रा करू लागले. प्रसूती नंतर ६ महिने नाडी शोधन व मुद्रा प्राणायाम चालू ठेवले. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास याचा खूप उपयोग झाला. ६ महिने झाल्यानंतर सोपी सोपी आसनं करू लागले आणि काही वेळाने पद्मसाधना व सूर्य नमस्कार करू लागले.
योगाभ्यास केल्याने नवं आणि जुनं ह्यांचा समतोल राखता येतो:
मातृत्व म्हणजे खरेतर एका नव्या आयुष्याची सुरुवात. बऱ्याच स्त्रिया म्हणतात की मूल झाल्यावर त्यांना स्वत:साठी वेळ मिळत नाही आणि पूर्वीचा काळ हवाहवासा वाटतो. पण माझं असं मत आहे की बरेच काही बदलले तरी आपण आधी सारखी परिस्थिती राखू शकतो. योग हे त्यामागचे गुपित आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की योग करायला आणखी वेळ कुठून मिळणार? माझा अनुभव असा की योग केल्याने मला इतर गोष्टींसाठी वेळ मिळू लागला. आता मी माझं काम, घर आणि तारिणी ह्या तिन्ही गोष्टी लीलया सांभाळते व योग करायला देखील वेळ मिळतो. तारीणीच्या मागे घरभर धावताना माझ्या व्यायामाची सुरुवात होते. ती झोपलेली असताना सूर्यनमस्कार व पद्मसाधना आटपते. कधीकधी हा क्रम चुकतोही पण त्याचं फारसं दुःख नाही वाटत. प्रत्येत दिवस वेगळा असतो पण शक्य असेल तेंव्हा हे सगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो.
एक गोष्ट जी मी कधीच चुकवत नाही ती म्हणजे सुदर्शन क्रिया. तारिणी झोपलेली असताना मला ती करावी लागते. कारण त्याला फक्त २० मिनिटे लागतात. पूर्ण योगसाधना करायला १ तास वेळ मिळत नसला तरी जेंव्हा वेळ मिळेल तेव्हा मी साधना करते. योगाभ्यास आणि ध्यान केल्याने आरोग्य चांगले राहते आणि मन शांत राहते.
प्रसुतीनंतर वजन वाढण्याच्या समस्येवर योगाभ्यासाद्वारे सहज मात करता येते:
वजन-वाढ, स्नायू सैल पडणे, सांधेदुखी, पाठदुखी, थकवा जाणवणे, संप्रेरकांचा असमतोल, उच्च रक्तदाब आणि थकवा येणे या सूतीनंतरच्या सामान्य समस्या आहेत. मलाही त्यांना सामोरं जाव लागले. पोटाभोवती साठलेल्या अतिरिक्त मेदामुळे पायांवर भार येऊ लागला. गरोदर राहण्याच्या काही वेळ आधी पासूनच मी योगाभ्यासाला सुरुवात केली होती आणि प्रसूतीनंतर ६ महिन्यांनी मी पद्मासाधना व सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली. ज्यामुळे वजन घटवण्यास फारसा त्रास झाला नाही. C- section प्रकारची प्रसूती झाल्यानंतरही माझं जगणं ब-यापैकी सुकर होतं.
माझं बालपण मला परत मिळालं:
मातृत्वाचा आनंद लुटण्यासाठी आई होणे हि अतिशय सुंदर अनुभूती देते. पण त्याचा आनंद तेंव्हाच घेता येतो जेंव्हा आपण पूर्णपणे वर्तमानात असतो, मन शांत आणि शरीर निरोगी असते. योगाभ्यास आणि ध्यानधारणा जर आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला तर आपण आपल्याच शरीराप्रती व बाळाच्या गरजांप्रती जास्त जागरूक बनतो. तारिणीला केंव्हा आणि कशाची गरज आहे, हे मला अचूकपणे हेरता येते. तिचे हावभाव, हालचाली आणि खट॒याळपणा मला अत्यंत सुखकारक वाटतात. प्रत्येक आईचा हा अनुभव असतो पण ध्यानधारणा केल्याने हा अनुभव कितीतरी पटीने वाढतो. तुम्ही अक्षरशः स्वत:मधील निरागसपणा व मृदुपणा अनुभवू शकता. आपलं बालपण अनुभवू शकता. हा अनुभव आपल्या बाळाबरोबर मोठं होण्यासारखाच असतो.