आपण ध्यानासाठी कसे तयार व्हाल? अगदी सहजपणे, नैसर्गिकपणे. जर तुम्ही औपचारिक व्हाल तर ध्यान करू शकणार नाही.. ध्यान लागण्यासाठी सहज आणि नैसर्गिक असणे गरजेचे आहे.
ध्यान करणे का गरजेचे आहे? ‘आपण यशस्वीरीत्या ध्यान कसे लाऊ शकतो?’ आणि ध्यानाचे विविध प्रकार आज जाणून घेऊया.
निर्व्याज्य आनंद प्राप्त करणे आणि नकारात्मक भावनांमध्ये रूपांतरित न होणारे प्रेम प्राप्त करणे, ही प्रत्येक मानवाची मूळ प्रवृत्ती आहे, म्हणून प्रत्येकाने ध्यान करणे गरजेचे आहे.
ध्यान आपल्यासाठी नवीन आहे का? अजिबात नाही. जन्माला येण्याआधी काही महिन्यांपासून आपण ध्यान करत असतो. आईच्या गर्भामध्ये आपण ‘काहीही करत नसतो’. अगदी अन्न देखील चावायची गरज नसते, ते आपसूक आपल्या पोटात पोहोचत असते. आपण अगदी आरामात गर्भ जलामध्ये तरंगत असतो, लोळत असतो, इकडे-तिकडे पाय झाडत असतो. हे ध्यान असते. ‘काहीही न करणे’. सगळे आपल्यासाठी केले जात असते - म्हणून संपूर्ण आराम प्राप्त करणे हीच प्रत्येक मानवाची, प्रत्येक आत्म्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.
तुम्हाला माहित आहे की तुम्हाला आरामाची का गरज आहे? कारण आपण कधी न कधी आरामात, निवांत असतो, कधी न कधी आपण तो निवांतपणा अनुभवलेला असतो, हेच ध्यान होय. संपूर्ण विश्राम म्हणजेच ध्यान. म्हणून या धांदलीच्या, धकाधकीच्या जीवनातून त्या निवांतपणाकडे परतणे, जो पूर्वी तुम्ही अनुभवलाय, सहज आहे. कारण ‘जग गोल आहे’, प्रत्येक गोष्ट त्याच्या उगम-स्थानाकडे परत जाऊ इच्छिते. ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे.
पान गळतीच्या ऋतूमध्ये झाडांची पाने गळून जमिनीवर पडतात, निसर्ग त्यांना त्याच्या पद्धतीने पुन: वापरत असतो. दैनंदिन आयुष्य जगताना तुमच्यावर झालेल्या परिणामांपासून, परत ज्या स्थितीमध्ये जन्मापूर्वी तुम्ही होता, त्या स्थितीमध्ये वारंवार परतण्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे ‘ध्यान’. टवटवीत आणि ताजेतवाने होणे म्हणजे ध्यान. मूळ स्वभावातील त्या शांतीमध्ये, प्रसन्नतेमध्ये परतणे म्हणजे ध्यान. निखळ आनंद म्हणजे ध्यान.
उत्तेजन रहित आनंद म्हणजे ध्यान, चिंतामुक्त आनंद म्हणजे ध्यान, द्वेषविरहित प्रेम म्हणजे ध्यान. ‘ध्यान’ आपल्या आत्म्यासाठी ‘खाद्य’ आहे. आहार ही मानवाची नैसर्गिक गरज आहे. जेव्हा भुकेले असता स्वाभाविकपणे काहीतरी खाता, तहानलेले असताना पाणी पिता. तद्वत प्रत्येकाचा आत्मा ध्यानासाठी हपापलेला, भुकेलेला असतो.
या पृथ्वीतलावरील प्रत्येकजण ‘साधक’ आहे, ध्यानासाठी आसुसलेला आहे. मात्र त्यांना त्याची जाण नाही. ते आपले खाद्य जेथे नाही तिथे शोधत आहेत, ही खरी समस्या आहे.
श्रीश्री रविशंकरजी यांनी २० एप्रिल,२०१२ रोजी कॅलीफोर्निया येथे दिलेल्या ‘ सिक्रेट्स ऑफ मेडीटेशन’ मधील सलगच्या प्रवचनांची ही ज्ञान पत्रिका बनवलेली आहे.