तृष्णा हीच दैवी आहे. भौतिक गोष्टींची तृष्णा तुम्हाला अक्रिय बनवते. अनंताची तृष्णा तुम्हाला जिवंत बनवते. जेव्हा तृष्णा संपते तेव्हा तुम्ही निष्क्रिय बनता. पण तृष्णा एक प्रकारची वेदना सुद्धा घेऊन येते. या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तृष्णेला दूर करता. ही वेदना सहन करत पुढे वाटचाल करत राहणे यातच कुशलता आहे. तृष्णेपासून सुटण्यासाठी कोणताही सोपा मार्ग नाही. तृष्णेपासून लवकर मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न करू नका, ती तशीच राहू द्या.
खऱ्या तृष्णेमध्येच परमानंदाची मुळे आहेत. त्यामुळेच पुराणकाळी भजन आणि किर्तनातून तृष्णेला जागृत ठेवले जाई. जेव्हा ही तृष्णा नातेसंबंधाच्या पलीकडे जाते तेव्हा ईर्षा, पारख आणि इतर नकारात्मक भावना गळून पडतात. केवळ बुद्धी आणि आत्मज्ञान या द्वारे नातेसंबंधाच्या पलीकडे जाऊ शकता. लोकांना बरेचदा असे वाटते की ज्ञान असेल तर तृष्णा संपेल, पण असे ज्ञान कोरडे असते. खऱ्या ज्ञानातून येणारी तृष्णा आयुष्य मजेदार बनवते. तृष्णा तुम्हाला दुसऱ्यांना आशिर्वाद देण्याची शक्ती देते. संपूर्ण सृष्टीला आशीर्वाद द्या. तुमच्यातील तृष्णा ही दैवरूप आहे.