सामान्यतः योगाकडे पाहण्याचा कल ताणणे, शांत आणि शिथिल होण्याकरिता श्वसन तंत्रे याचे मिश्रण आहे, असे समजले जाते. एक सामान्य योगा वर्ग हा योगाच्या सरावाची ओळख करून देतो आणि एकीकडे तर या तंत्रांनी आपल्याला फायदा होत असतो परंतु योगाची गहनता आणि खरी समज ही मात्र हरवून बसते.
संपूर्ण शरीर प्रणालीवर परिणाम करणारी ही आसने आणि शरीर आणि मन यांच्यामधील नात्याबाबत जागरूकता आणणारी श्वसन तंत्रे इतक्या बुद्धिमानतेने योजली गेली आहेत की त्यावरून लक्षात येते की योग हा फारच गहन आहे.
जसजसे आपण योगाबद्दल अधिकाधिक शोध घेऊ लागतो तसतसे आपल्याला त्याच्या सरावाचे महत्त्व पटते. आणि शरीर, मन आणि चैतन्य यावर होणाऱ्या त्याच्या तरल परिणामांना आपण अनुभवण्यास सुरुवात करतो.
कमी माहित असलेली, सूक्ष्म अशी एक योगाची स्वतंत्र शाखा आहे ‘योगा तत्व मुद्रा विज्ञान’... योग मुद्रा
संपूर्णपणे भिन्न असणारे आणि आयुर्वेदाच्या तत्वावर आधारित असणाऱ्या योग मुद्रांना एक रोगनिवारक पद्धती म्हणून समजले जाते. मुद्रा या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे हावभाव किंवा शरीरस्थिती. एखादी मुद्रा करताना संपूर्ण शरीराचा वापर करावा लागू शकतो किंवा केवळ साध्या हाताच्या ठेवणीचा. मुद्रांचा वापर हा योगाचे श्वसन व्यायाम यांच्या संयोगाने केला जातो. जेणे करून श्वसनाद्वारे शरीरातील विविध भागांना उद्दीपित केले जाते ते प्राणाचा शरीरात संचार व्हावा म्हणून. मज्जातंतूबरोबर थेट नाते असणाऱ्या मुद्रा या मेंदूच्या स्वाभाविक आकृतीबंधासोबत सूक्ष्म जोडणी निर्माण करते. त्यामुळे अचेतन प्रतिक्षिप्त क्रियांवर परिणाम होतो. यामुळे आंतरिक ऊर्जेचे संतुलन साधते आणि ती ऊर्जा संवेदी इंद्रिये, ग्रंथींच्या नसा आणि स्नायूबंध यांच्यात परिणामकारक बदल घडवून आणण्याकरिता पुनर्निर्देशित केल्या जातात.
यामुळे योगाच्या अनुभवला एक निराळेच परिमाण प्राप्त होते.
मुद्रा या अनेक व निरनिराळ्या प्रकारच्या असून काही अनाकलनीय आहेत तर काही स्वभावाने समकालीन आहेत.
हठ योग प्रदीपिका आणि घेरंद संहिता हे मुद्रांसंबंधित असणारे मुख्य प्राचीन ग्रंथ होय. हठ योग प्रदीपिका १० तर घेरंद संहिता २५ मुद्रांचे वर्णन करते.
काही योग मुद्रा आपल्यामध्ये निसर्गतःच असतात, केवळ आपला हात आपल्या बोटांना स्पर्श करून आपण आपल्या अभिवृत्तीमध्ये आणि आपल्या आकलनामध्ये फरक आणू शकतो आणि अंगीभूत असणारी ऊर्जेची शक्ती शरीराला निरोगी ठेवते.
मुद्रा आणि शरीरातील पाच तत्त्वे यांचा परस्परांशी थेट संबंध आहे.
आयुर्वेदानुसार शरीरातील पाच तत्त्वांपैकी कोणत्याही एकाची अतिवाढ किंवा कमतरता असण्याने शरीरात असंतुलन निर्माण होते त्यामुळे आपण आजारी पडतो. आपली बोटे ही या तत्त्वांची अभिलाक्षणिक आहेत आणि आपल्या शरीरात या पाचपैकी प्रत्येक तत्त्व हे ठराविक आणि महत्त्वाचे कार्य करते. बोटे ही मुलतः विद्युत मंडल आहेत. मुद्रांच्या सरावामुळे ऊर्जेचा ओघ वायू, तेज, आप, पृथ्वी आणि आकाश यांच्या संतुलनासाठी अनुकूल बनवते आणि ते उपचारक ठरते.
बोटांच्या ठेवणीचे अनेक अन्वयार्थ लावले गेले आहेत, की ते स्वयंच्या पैलूंचे किंवा गुणांमधील अंगभूत तीन ऊर्जेचे, वा मनाचे, बुद्धीचे, अहंचे, मोहजालाचे किंवा कर्माचे प्रतिनिधित्व करतात हे एक रहस्यच आहे. मुद्रा या बिगर बौद्धिक संवेदनक्षमतेची ओळख करून देतात हा मुख्य मुद्दा आहे.
खाली दिलेल्या काही मुलभूत मुद्रा आहेत ज्यांचा तुम्ही सुरक्षितपणे सराव करू शकता आणि त्यांच्या परिणामांचा अनुभव घेऊ शकता.
योग मुद्रांचा सराव करायला साधी मांडी घालून, वज्रासनात, किंवा पद्मासनात बसू शकता आणि ते शक्य नसल्यास अगदी खुर्चीवर बसले तरी चालेल. सरावापासून लक्ष विचलित होईल अश्या प्रकारे शरीराला कष्टप्रद स्थितीत असण्याची गरज नाही. साध्या मुद्रांसोबत उज्जयी श्वसन करणे आदर्श आहे.
चिन मुद्रा
अंगठा आणि तर्जनी या दोघांना हलके एकत्र धरा आणि इतर तीन बोटे ताठ ठेवा की ही झाली चिन मुद्रा. अंगठा आणि तर्जनी यांना हलका एकत्र स्पर्श होऊ द्या, कोणताही दबाव देऊ नका आणि इतर तीन बोटांना जितके शक्य होईल तितके ताठ ठेवा. तळवे वरच्या दिशेला ठेवून हात मांडीवर ठेवू शकता आणि श्वसनाचा समताल स्थापित केला जातो.
चिन्मय मुद्रा
या मुद्रेमध्ये, अंगठा आणि तर्जनी यांचे वर्तुळ बनते आणि इतर तीन बोटे हाताच्या तळव्यात वलयाकार बंद केली जातात. पुन्हा तळवे वरच्या दिशेला ठेवून हात मांडीवर ठेवले जातात आणि खोल आरामशीर उज्जयी श्वास घ्यावेत. पुन्हा एकदा श्वासाचा ओघ आणि त्याचा परिणाम याचे निरीक्षण करा.
आदी मुद्रा
आदि मुद्रेमध्ये अंगठ्याला करंगळीच्या तळापाशी ठेवावे आणि इतर बोटे अश्या प्रकारे बंद करावी जेणेकरून हलकी मुठ्ठी बनेल. पुन्हा तळवे वरच्या दिशेला ठेवून हात मांडीवर ठेवले जातात आणि श्वसनाची पुनरावृत्ती करावी.
ब्रम्ह मुद्रा
यामध्ये प्रथम दोन्ही हातांची आदि मुद्रा करावी आणि नंतर बोटांच्या मागच्या सांध्यांची हाडे एकत्र आणावीत व हात वरच्या दिशेला राहतील अश्या प्रकारे नाभी परिसरात ठेवावे आणि श्वासाचा ओघ सुरूच ठेवावा.
प्रत्येक योग मुद्रेमध्ये किमान बारा श्वास घ्यावेत आणि प्राणाच्या ओघावर बारीक लक्ष ठेवावे. श्वास कोठे वाहतो आहे आणि मनाला हळुवारपणे उर्जित करतो आहे याची जाणीव होऊ द्या.