“योग कर्मसू कौशल्यम्”

योगसाधनेमुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्य प्राप्त होऊन आपल्यातील

जन्मजात कौशल्यांमध्ये वृद्धी होऊन जीवन आनंददायी बनते, हे आता सिद्ध झाले आहे. म्हणूनच निरोगी

जीवन, मानसिक शांती आणि उत्साही दिनचर्येसाठी दररोज काही मिनिटांची ‘योगसाधना’ करण्याचे महत्व

जगभरात सर्वांनाच पटलेले आहे. योगसाधनेमध्ये योगासने, प्रभावी श्वसन प्रक्रिया आणि शेवटी अल्पकाळाची

गाढ विश्रांती (ध्यान) यांचा अंतर्भाव आहे.

योगसाधनेला ५००० वर्षांची परंपरा प्राप्त आहे. योगसाधनेमुळे संपूर्ण शरीर, स्नायुगट, श्वसनसंस्था,

पचनसंस्था, सांधे, अंतरइंद्रिये, अंतर्स्त्राव ग्रंथी आणि मेंदू यांना व्यायाम, प्राणवायू आणि प्राणशक्ती मिळून ती

निरोगी आणि कार्यक्षम बनतात. मन शांत, स्थिर, एकाग्र बनून स्मरणशक्ती, आकलनशक्ती आणि सकारात्मक

विचारसरणी प्राप्त होते.

प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिन

आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी म्हणतात, “निरोगी शरीर, कंपणरहीत श्वास, संभ्रममुक्त

बुद्धी आणि तणावमुक्त मन हा मानवाचा अधिकार आहे, याच्या प्राप्तीसाठी योगसाधने शिवाय पर्याय नाही,”

योगसाधनेचा प्रचार आणि प्रसार जगभरात व्हावा या उद्देशाने इतर संस्थांसह आर्ट ऑफ लिव्हींगने, संयुक्त राष्ट्र

संघ यांच्या विद्यमाने गत वर्षापासून २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यास

सुरवात केलेली आहे. खुद्द श्री श्री रविशंकरजींनी संयुक्त राष्ट्र संघ आणि लिंकन कॉर्नर, टाईम्स स्क्वेअर -

न्यूयॉर्क येथे त्यावेळी योगसाधनेचे धडे दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच योगदिनाच्या दिवशी मागील

वर्षी इंडिया गेटसमोर योगसाधना केल्याचे आपण दूरदर्शनवर पाहिलेच आहे. त्यावेळी ६ खंडामधील १३२

देशांमधील सुमारे ५० कोटी नागरिकांनी यामध्ये सामील होऊन आदर्श प्रस्थापित केला आहे.

 

यावर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी ‘आयुष मंत्रालय, भारत सरकारसह इतर संस्था,

शैक्षणिक संस्था, कारागृहे आणि प्रत्येक गावातील प्रमुख स्थळांवर नागरीकांसह आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशिक्षक

आणि स्वयंसेवक योगसाधना करणार आहेत. याची पूर्व तयारी म्हणून विविध ठिकाणी १ जून २०१६ पासून

सामुदायिक योगसाधना सुरु झाली आहे. हे सहभागी साधक ‘योग-दान’ या प्रकल्पाद्वारे अनेक ठिकाणी

प्रात्यक्षिक करत आहेत.

यामध्ये १४ वर्षावरील वयाची मुले आणि नागरिक नागरिक सहभागी होऊ शकतात. हा कार्यक्रम

सर्वांसाठी पूर्णतः मोफत आहे. आपण देखील आपल्या नजीकच्या आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशिक्षक/स्वयंसेवक

यांना संपर्क साधून आजच आपल्या सोयीच्या वेळेनुसार योगदान प्रकल्पात सामील व्हा, शास्त्रीय योगसाधनेचे

प्रशिक्षण मिळवा आणि निरोगी रहा.