कार्यालयात योगाचा सराव करण्यात एक गंमत आहे. ही नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणण्यामुळे त्याचे दूरगामी चांगले परिणाम अनुभवता येतात. असा योगा केल्यामुळे आराम मिळतो. बराचवेळ कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे मान, खांदे, पाठीचे स्नायू यावर ताण पडतो ते ताठर बनतात. त्यावर वेळीच उपाय योजना केली नाही किंवा त्यांच्याकडे नीट लक्ष दिले नाही तर कार्यालयात किंवा कामावर त्याचा परिणाम होतो. तुमची कार्यतत्परता कमी होते, तुमच्या जीवनाचा स्तर बिघडतो, कार्यालयात करण्याचे योगाचे प्रकार तुम्ही टेबलावर बसल्या बसल्या दिवस भरात कधीही करू शकता.
तुमच्या दिनचर्येचा एक भाग म्हणून कार्यालयात तुम्ही नियमित योगा करायला लागलात तर त्यामुळे आश्चर्यकारक बदल घडून येतात. तुमचा शारीरिक थकवा, ताण तणाव, दुखणी कुठच्या कुठे पळून जातात. स्नायूंची ताकद वाढते, ते जास्त कार्यक्षम होतात, त्यांच्यात लवचिकता येते, तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते, तुमच्यात नवचैतन्य सळसळायला लागते. या व्यायाम प्रकारांना फारसा वेळ लागत नाही, ते दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. आणि ते केल्याने तुमच्यावर होणारे दूरगामी वाईट परिणाम तुम्ही थांबवू शकता.
सूचना: तुम्ही जर घट्ट बूट घातले असतील तर हे योगाचे प्रकार करण्याआधी ते काढा. त्याच प्रमाणे गळ्यात बांधलेला टाय आणि कंबरेचा पट्टा सैल करा.
कार्यालयात सहज करता येण्यासारखे योगाचे पाच प्रकार पुढे दिलेले आहेत, सुरुवातीला त्याचा सराव तुम्ही करू शकता.
मान चक्राकार गोल फिरविणे
१. डोळे बंद करा.
२. हनुवटी छातीवर टेकवा.
३. मान चक्राकार फिरवायला सावकाश सुरुवात करा. प्रथम उजवा कान उजव्या खांद्यावरून फिरवत डोके मागे न्या. आणि नंतर डावा कान डाव्या खांद्यावरून गोल पुढे नेत, मान परत पहिल्या ठिकाणी आणा.
४. खांदे मोकळे आणि सैल ठेवा.
५. अशी तीन ते पाच आवर्तने झाल्यावर विरुद्ध दिशेने तितकीच आवर्तने करा.
गाई सारखा ताण
१. पाय जमिनीवर ठेवा..
२. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.
३. श्वास आत घेताना पाठ मागे करत, डोके वर करून छताकडे बघा.
४. श्वास सोडताना पाठ पुढे घ्या आणि डोके पुढे झुकवा.
५. अशी ३ ते ५ आवर्तने करा.
बसल्या जागी पुढे झुका.
१. टेबला पासून खुर्ची मागे घ्या.
२. बसल्या जागीच पाय जमिनीवर घट्ट दाबून ठेवा.
३. दोन्ही हात कमरेच्या मागच्या बाजूला न्या. हाताची बोटे एकमेकात गुंतवा, पाठ सरळ ठेवा.
४. कमरेतून पुढच्या बाजूला झुका आणि एकमेकात गुंफवलेले हात जितके वर नेता येतील तितके वर न्या.
५. छाती मांड्यांवर विसावेल इतकी खाली आणा, मान मात्र मोकळी ठेवा.
गरुडासन
१. शरीरा समोर दोन्ही हात जमिनीला समांतर ठेवा. तळवे आकाशाकडे तोंड करून असू देत.
२. उजव्या हाताने डाव्या हाताला विळखा घाला. (जरूर पडल्यास कोपऱ्यात हात थोडासा वाकवा) नमस्कार केल्या प्रमाणे दोन्ही तळवे एकमेकांना जोडा.
३. दोन्ही कोपरे वरती उचला, खांदे मागच्या बाजूला झुकू द्यात.
४. हाच व्यायाम प्रकार परत डावा हात, उजव्या हातावर ठेऊन करा.
बसल्या जागी पाठीचा कणा पिळविणे
१. खुर्चीच्या एका बाजूला तोंड करून बसा.
२. पाय जमिनीवर घट्ट रोखून ठेवा.
३. दोन्ही हातांनी खुर्चीची पाठ पकडून कंबरेला जितका पीळ देता येईल तितका द्या.
४. असाच पीळ कंबरेला विरुद्ध दिशेने द्या ह्या व्यायाम प्रकाराची आवर्तने आणखीन काहीवेळा करा.
कानशिले घासणे.
१. दोन्ही हाताची कोपरे टेबलावर ठेवा. हाताचे पंजे कानशिलांवर ठेवा.
२. दोन्ही हाताच्या पंज्यांनी कानशिलांवर हलकासा दाब देऊन घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने चक्राकार फिरवा आणि नंतर घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चक्राकार फिरवा.
३. १० ते १५ वेळा खोलवर श्र्वासोच्छ्वास घेत असे करत राहा.
योगाच्या सरावामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारत असले तरी औषधांना पर्याय म्हणून त्याचा वापर करता येत नाही. श्री श्री योगाच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने शिकणे आणि त्याचा सराव करणे हे अतिशय महत्वाचे आहे. कधी तुम्ही आजारी पडलात आणि औषधे घेण्याची वेळ तुमच्यावर आली तर डॉक्टर आणि श्री श्री योगाचे शिक्षक यांच्या सल्ल्याशिवाय योगासने करू नका. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या केंद्रामध्ये जाऊन श्री श्री योगाच्या कोर्स कधी आहे याची चौकशी करा. कोर्सेस बद्दल काहीही माहिती तुम्हाला हवी असेल किंवा तुमचे अनुभव तुम्हाला कळवायचे असतील तर info@srisriyoga.in या साईटवर अवश्य कळवा.
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.