हस-या चेहऱ्यासाठी योग (Facial yoga in Marathi)

एक हसरा चेहरा वातावरण हलकेफुलके आणि तणावमुक्त करतो. एका संशोधनानुसार एक बाळ दिवसभरात  ४०० वेळा हसते तर एक प्रौढ व्यक्ती जेमतेम ८ वेळा. ह्याचे मुख्य कारण म्हणजे तणाव!! तणावामुळेच प्रौढ स्वतःचा मूळ स्वभाव आणि हास्यसुद्धा विसरतो आणि हे आगदी उघड आहे. निरनिराळ्या कारणांमुळे तणाव निर्माण होतो आणि नकळत ते आपल्या चेहऱ्यावर दिसून येते. या तणावामुळे अकाली वृद्धत्व येते, चेहऱ्यावरचे तेज हरपते आणि चेहरा कायम थकलेला दिसतो.  योग करणे हा या ताण-तणावावर मात करण्याचा आणि चेहऱ्याचा तजेला परत आणण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे.

सूक्ष्म योग म्हणजे तरल किंवा हलका योग. ही अतिशय शक्तिशाली योगाची पद्धत आहे. व्यायामाचा अभाव आणि तणाव ह्यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात. चेहऱ्याचा योग हे तुम्हाला काही मिनिटातच ताजेतवाने आणि टवटवीत करतो. हा स्नायूंना आणि शिरांनासुद्धा मोकळे करतो. तर, चला, मग काही सोपे आणि परिणामकारक योगासने करूया:

डोळ्याच्या भोवती!

अंगठा सरळ ठेवून हाताच्या मुठी बंद करा. आता तुमचे डोळे बंद करा आणि उजवा अंगठा उजव्या डोळ्यावर आणि डावा अंगठा डाव्या डोळ्यावर हलका फिरवण्यास सुरुवात करा. डोळ्याभोवती वर्तुळ करण्याकरिता अंगठ्याने किंचित दाब द्या. हा व्यायाम २ ते ३  मिनिटे करा.

हे कसे काय काम करते? हे डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे घालवण्यास मदत करते आणि डोळ्याच्या सभोवतीच्या स्नायूंना मोकळे करते.

आश्चर्यचकित झाल्यासारखे डोळे विस्फारा!

डोळे एवढे विस्फारा की डोळ्यातील पांढरा भाग जास्तीत जास्त उघडा होईल. नंतर डोळे एकदम घट्ट बंद करा. पुन्हा एकदम विस्फारा आणि पुन्हा घट्ट बंद करा. डोळ्यातून पाणी येईपर्यंत हे असे वेगाने करीत राहा. आता डोळे बंद करा आणि आराम करा. हा व्यायम ३ ते ४ मिनिटे करा.

हे कसे काय काम करते? हा अविर्भाव केल्यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या आणि कपाळाच्या भोवतालच्या स्नायूंना व्यायाम देत आहात. याने दृष्टीमध्ये सुधारणा होते आणि दिर्घकाळ सराव केल्यास लागलेला चष्मा निघून जातो.

गुलाबी गाल!

तोंडाने श्वास घ्या आणि काही सेकंदांकरिता तुमचे दोन्ही गाल फुगवा. आता तोंडाने श्वास सोडून द्या आणि हे असे ८-१० वेळा पुनःपुन्हा करा.

हे कसे काय काम करते? हा व्यायाम तुमच्या गालाच्या स्नायूंना मजबूत करतो आणि त्यांना बारीक होणे आणि पोकळ दिसणे यापासून प्रतिबंध करतो. जर तुम्ही सॅक्सोफोन (एक वायुवाद्य) वादकांना बघितले तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचे गाल नेहमीच टणक असतात. जेव्हा तुम्ही एखादा स्नायू एका विशिष्ठ पद्धतीने वापरता तेव्हा त्याने चेहऱ्याचे दिसणे एकदम पालटून जाते. म्हणून कमनीय आणि फुगऱ्या गालांसाठी हा व्यायाम करा.

चुंबन घ्या!

रुंद हास्य करा आणि ते आणखी जास्तीत जास्त रुंदवा. आता दोन्ही ओठांना एकमेकांवर दाबा आणि चुंबन घ्या! हा व्यायाम २०-२५ वेळा करा.

हे कसे काय काम करते? ओठ आणि गालांचे स्नायू या व्यायामामुळे शिथिल होतात आणि हा व्यायाम केल्याने चेहरासुद्धा उजळतो. गुलाबी गाल आणि कधीही लोप न पावणारे हास्य हे या सुंदर आणि सोप्या योगाचे परिणाम आहेत. आणि हसताना एवढे लक्षात ठेवा – खरे जमेपर्यंत खोटे हास्य चालू ठेवा.

हनुवटी

हनुवटीला दोन्ही हातांमध्ये अशा पद्धतीने धरा की हाताचे दोन्ही अंगठे हनुवटीच्या खाली येतील. केवळ अंगठ्यांच्या सहाय्याने हनुवटीला खालच्या बाजूने दाबत दाबत वरच्या दिशेने या. असे २-३ मिनिटे करा.

हे कसे काय काम करते? या तंत्रामुळे मलावरोधापासून सुटका मिळते आणि पचनक्रिया सुधारते. तसेच अपचनाच्या त्रासापासून ही सुटका होते.

आपलेच कान धरा!

आपल्या कानाच्या पाळ्या पकडा आणि त्यांना खालच्या दिशेने ३० सेकंदे ओढून धरा. पुढची ३० सेकंदे त्यांना वरच्या दिशेने ओढा. कानाच्या पाळ्या धरून त्यांना उलट आणि सुलट ३० सेकंदे गोल फिरवा.

हे कसे काय काम करते? या व्यायामामुळे जागरूकता येते आणि चेहऱ्याच्या स्नायूंमधील तणावाला हे दूर करते.

भुवयांना बाहेर ओढा!

तुमच्या बोटांनी तुमच्या भुवयांना अशा प्रकारे पकडा की तुम्ही भुवयांना मध्यापासून शेवटपर्यंत ओढू शकाल. असे ३-४ वेळा करा.

हे कसे काय काम करते? या व्यायामाने तुम्हाला आराम मिळतो कारण हा व्यायाम भुवयांची मालिश करतो आणि तणावाला भुवयांच्या सभोवती जमा होऊ देत नाही.

 

हे सोपे व्यायाम कधी आणि कुठेही करता येतात. या व्यायामांच्या नियमित सरावाने तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. मग तुम्ही मुलाखतीकरिता जात असाल किंवा काही सादरीकरण करीत असाल तर केवळ काही मिनिटांचे हे चेहऱ्याचे व्यायाम तुमचा चेहरा खुलवून टाकेल. आत्मविश्वास आणि एक प्रकारची शांतता तुमच्या चेहऱ्यावर तळपेल, आणि याने तुमची चांगली छाप इतरांवर पडेल. ध्यान साधना करण्याच्या आधी जर हे व्यायाम केले तर ध्यानात खोल वर जाण्यास मदत होईल.

 

नियमित सरावाने शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि सोबत आरोग्याचा लाभ होतो पण हे औषधाला पर्यायी नाही.  श्री श्री योग प्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग शिकणे व त्याचा सराव करणे हे अतिशय महत्वाचे आहे. वैद्यकीय समस्या असल्यास, योगाचा सराव करायच्या आधी डॉक्टर आणि श्री श्री योग शिक्षक यांचा  सल्ला घ्यावा. तुमच्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग शिबिराचा शोध घ्या. तुम्हाला शिबिरांसंदर्भात माहिती हवी आहे का किंवा तुम्हाला तुमचा प्रतिक्रिया नोंदवायची आहे का? आम्हाला info@srisriyoga.in इथे लिहा