“जेंव्हा एखादी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निरोगी, मनाने शांत आणि भावनिक दृष्ट्या स्थिर असेल तरच तिला संपूर्ण निरोगी म्हणता येईल,” श्री श्री रविशंकर-योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीसोबत सक्षम मन आणि भावनिक क्षमता प्राप्त होते.
कुटुंबाच्या आग्रहापोटी योगासाठी प्रवृत्त झाले
वडील हौशी खेळाडू असल्याने मी त्यांच्यासोबत टेनिस कोर्टवर जात असे. माझे वडील सतत बास्केट बॉल, टेनिस आणि बॉलिंगच्या स्पर्धा जिंकून चषके घरी घेऊन येत असत. त्यांच्या इच्छेप्रमाणे जरी मी व्यावसायिक टेनिसपटू बनले नसले तरी तंदुरुस्त बनण्याचे त्यांचे उदिष्ट्य त्यामुळे पूर्ण झाले. हे खेळ खेळणे, नृत्य शिकणे आणि योग आणि ध्यान शिकण्याने माझ्यातील उर्जेचा स्तर वाढत असे.
योगामुळे सर्व स्तरावरील आरोग्य वाढते
आरोग्य म्हणजे आपल्या जीवनातील बदल शांत मनाने हाताळण्याची क्षमता प्राप्त करणे. योग आपल्याला शरीर, श्वास आणि मन या विविध स्तरावर निरोगी ठेवतो. योगासनांमुळे सर्व शरीराला व्यायाम मिळतो, प्राणायाममुळे श्वसनाचे व्यायाम होऊन फुफ्फुसांची क्षमता वाढते. निव्वळ श्वासावर लक्ष ठेवणे, योगासने आणि ध्यान केल्याने मनातील भावनांचा प्रासंगिक चढ-उतार नाहीसा होऊन मन शांत बनते.
शांत-निर्मळ मनामुळे त्याची क्षमता वाढून चांगली निर्णयक्षमता आणि दीर्घ काळासाठी एकाग्रता प्राप्त होते.
जेंव्हा अपेक्षेप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही तेंव्हा आपली स्वाभाविक प्रतिक्रया काय- तर आपल्याला राग येतो आणि हा राग किती काळ टिकतो? श्री श्री रविशंकरजी यांच्या मतानुसार, ”तो राग पाण्यावर मारलेली रेषा जेवढा वेळ टिकते तेवढा वेळ असायला हवा. काही जण आदल्या दिवसाचा, काहीजण गेल्या महिन्यातील तर काहीजण दहा वर्षापूर्वीचा राग मनात धरून ठेवतात. हे मनाला सहन करावे लागते. यातून बाहेर पडायला ध्यान मदत करते. प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि योग हेच इलाज आहेत.
अधिक वाचा - आरोग्यदाई योगासने
योग आणि शरीर-श्वास-मन संबंध
फुलाचा सुगंध घेताना श्वासावर कधी लक्ष दिले पाहिजे? पॅरिस मध्ये वसंत ऋतूमध्ये फुलांनी लगडलेल्या बागा पाहून मी बागेच्या दारात स्तब्ध होऊन गेले. आनंदाने गुलाब आणि डॅफोडाईल्सचा सुगंध घेताना मी माझ्या श्वासाकडे लक्ष घेऊन गेले. माझा श्वास खोल आणि दीर्घ होता. माझे संपूर्ण शरीर त्या उर्जेने, ‘प्राण’ नामक सूक्ष्म जीवन ऊर्जेने भरून गेले. आणखी बळकट, सजग आणि आनंदी वाटले आणि कशालाही तोंड देण्यास सक्षम जाणवले.
माणूस झोप किंवा अन्नाशिवाय काही दिवस जिवंत राहू शकतो. परंतु श्वासाशिवाय ? योग आणि श्वास यांचा परस्पर संबंध आहे. श्वासावर लक्ष ठेऊन प्राणायाम केल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि योगासनांमुळे ऊर्जेचा स्तर वाढतो. शरीरात ऊर्जेचा स्तर उंचावलेला असेल तेंव्हा मन स्वच्छ आणि आनंदी असते.
जेंव्हा मला आळशी आणि निरुत्साही वाटते तेंव्हा प्राणशक्ती कमी असते. दररोज प्राणायाम केल्याने मी दिवसभर ऊर्जावान आणि ताजी तवानी असते. प्राणायाम, योगा करून देखील कधीकधी मला थकल्यासारखे वाटते तेंव्हा मला जाणवते की मी पूर्वीपेक्षा झटकन ताजीतवानी होते. तरुण आणि निरोगी राहण्यासाठी योग उत्कृष्ट साधन आहे. श्री श्री म्हणतात की, “प्राणायाम, ताजे अन्न, खोल विश्रांती आणि प्रसन्न ध्यानस्थ मनाद्वारे आपण प्राणशक्ती प्राप्त करू शकतो.”
योगाला दररोज प्रेमळ भेट द्या
योग करण्यासाठी फारसे काही लागत नाही. जिवलग मित्राला भेटण्यासारखे योगा तुमच्या दैनंदिन जीवनाचे अंग बनेल. सध्याच्या धावपळीच्या जीवनात योगासाठी एक हवेशीर जागा हवी. योगाभ्यास ही एक अमुल्य गुंतवणूक आहे. आणि योगी ‘प्रसन्न हास्य’ हे पारितोषिक जिंकतो.
(वरील मजकूर आणि छायाचित्रे मर्लिन गॅलन यांचे कडून. मेरिलीन ह्या एक हौशी योगाभ्यासक आहेत. त्यांना आपल्या लेख आणि कलाच्या माध्यमातून योगाभ्यास आणि अध्यात्म बद्दल प्रेरणादायी कार्य करण्यास आवडते.)