अभावाकडून….समृद्धीकडे !! - स्वामी प्रणवानंदजी

स्वामी प्रणवानंदजीं बरोबर काही वेळ घालविला की जाणवतो तो दुर्दम्य उत्साह, जोश आणि सेवे साठी असलेली तत्परता. "येन केन प्रकारेण " लोकांचे भले करून दिवस कसा सत्कारणी लावायचा हे खरच शिकण्यासारखे आहे. एकेकाळचे संतोष कापडणे सर, आत्ताचे महाराष्ट्राचे आर्ट ऑफ लिविंग ब्युरो कम्युनिकेशनचे समन्वयक,अॅडव्हान्स मेडिटेशन प्रोग्रॅम, प्राणायाम ध्यान शिबीर, श्री श्री योग, युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबीर, मिडीया, अॅपेक्स आणि सहज समाधी ध्यान इत्यादी शिबिरे शिकवण्यासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरातसह सर्व महाराष्ट्रभर प्रवास करणारे स्वामी प्रणवानंद जी आपल्या जीवनातील स्थित्यंतरे सांगत होते. २०१३ पासून महाराष्ट्र राज्यात सुरु झालेल्या जल जागृती अभियानाचे स्वामीजी समन्वयक आहेत. या जलजागृती अभियाना द्वारे आत्तापर्यंत २८ नद्यांचे पुनर्जीवन झालेले आहे.

“कोर्स करण्याआधी क्रोध, अहंकार आणि जीवनातील अनियमितता यांनी त्रस्त होतो. बुद्धिबळाचे क्लासेस शिकवून खूप पैसे कमाऊन देखील पैसे पुरत नव्हते.” जानेवारी २००० मध्ये बुद्धिबळाच्या स्पर्धेवेळी रश्मिन पुळेकर (सध्याचे पूर्ण वेळ प्रशिक्षक) यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिराबद्दल सांगितले. फेब्रुवारी २००० ला मी आणि आनंद वैशंपायन (सध्याचे स्वामी वैशंपायन जी) यांनी मिळून नाशिक मध्ये दोघांनी शिबीर केले.

क्लीन बोल्ड

ते पुढे म्हणाले, “मला सगळे येते, समजते- कोणीही मला काहीही शिकऊ शकत नाही, या मनोभूमिकेत मी शिबिराच्या आधी होतो. माझा दाढीवाल्या बाबांच्यावर बिलकुल विश्वास नव्हता. हे सगळे फसवे असतात, असे माझे मत होते. शिबीर देखील मित्राच्या आग्रहाने आणि एका उत्सुकतेपोटी केले. परंतू शिबिराच्या दुसऱ्या दिवशी, सुदर्शन क्रिया केल्यावर मी क्लीन बोल्डच झालो.”

“सुदर्शन क्रिया आणि शिबिरातील विविध प्रक्रिया केल्याने माझी चिडचिड कमी झाली. दररोज तीस चाळीस कप चहाचे व्यसन सुटले, लवकर उठण्याची सवय लागली, नेहमी धावत रहाणारे मन पूर्णपणे शांत झाले. तापट स्वभावात मृदुता आली. बुद्धिबळ खेळताना, शिकवताना मन एकाग्र होऊ लागले.” असे शिबिराचा तात्कालीन अनुभव सांगताना संतोषजी सांगत होते. त्यानंतर लोकांना शिबिरासाठी पाठवणे, शिबिरामध्ये सहाय्य करणे सुरूच होते. परंतू शिबीर केलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शांती आणि आनंद पाहून त्यांना गुरुदेव आणि साधना, सेवा, सत्संग यामधील गोडी वाढायला लागली. हे सर्व करूनही बुद्धिबळ खेळल्यामुळे त्यांचा सर्व गोष्टींसाठी खूप सावध पवित्रा होता.

दर्शन

या सुदर्शन क्रियेचा जनक कोण ? आणि हा काही जादु टोणा तर नाही ना हे नीट समजावून घेण्यासाठी आणि पुढील शिबीर करण्यासाठी ऋषिकेशला गेल्यावर गुरुदेवांचे ‘दर्शन’ झाले. अतिशय साधे, हसरे व्यक्तिमत्त्व, सर्वांना ‘आप खुश हो ना’ हा प्रश्न विचारूनआशीर्वाद आणि प्रसाद देणारे व्यक्तिमत्त्व. माझे सर्व गैरसमज एका दर्शनाने गळून पडले. मनातील प्रश्न आणि संदेह गंगेच्या पाण्यात वाहून गेले. त्यांच्या सहवासात मन एकदम स्थिर झाले. पुनःपुन्हा असेच भेटत राहावे असे वाटू लागले. क्षणात आयुष्य बदलून टाकणारे ते दर्शन होते. गुरुजी मात्र अत्यंत साधेपणाने आणि उत्साहाने प्रत्येकाला भेटतच होते. "

जणूकाही - कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥

आपल्याला जो अनुभव, जो आनंद प्राप्त झाला तो जास्तीत जास्त लोकांना मिळावा या उद्देश्याने स्वामी प्रणवानंद जी आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशिक्षक बनले. पूर्वी कधीही धार्मिक, अध्यात्मिक कार्यास थोडासाही वेळ न देणारे आणि यात काही रस नाही म्हणणारे स्वामी प्रणवानंद जी या सेवा कार्यात वेळ देऊ लागले आणि त्यातून त्यांना मिळणारा आनंद दृढ होवू लागला.

समृद्ध जीवन

“गुरुदेवांच्या सेवेचा वसा जसजसा पुढे पुढे नेत होतो तसतशी समृद्धी वाढत गेली. गुरुदेवांनी न मागताच सर्व काही दिले. स्वामीजी सेवा आणि परोपकाराचे महत्व सांगताना त्यांच्याच आयुष्यातील एक किस्सा सांगतात की, ज्ञानप्रसार आणि लोकसेवेसाठी ते जेंव्हा उत्तर भारताच्या प्रवासासाठी बाहेर पडले तेंव्हा त्यांच्या जवळ ४०० रुपये होते. त्यानंतरचा प्रवास, राहणे, सेवा इ. सर्व खर्च कसा झाला हे त्यांना कळालेच नाही. प्रवास संपवून आलेतरी त्यांच्याकडे ४०० रुपये शिल्लकच होते. हे पाहून त्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. ‘जेंव्हा आपण सेवा आणि परोपकार करतो तेंव्हा आपली काळजी ईश्वरी शक्ती घेत असते’, हे स्वामीजींना प्रणवानंद ना अनुभवायला मिळाले आणि याचेच प्रत्यंतर आयुष्यात बऱ्याच वेळी येऊ लागले.

६ जून २०१७ मध्ये स्वामी प्रणवानंद हे नाव देऊन गुरुदेवांनी त्यांना स्वामी बनविले - जणू त्यांच्या सेवेची पावतीच दिली. आत्तापर्यंत या सेवाकार्यासाठी ज्ञान प्रचार-प्रसारासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरातसह सर्व महाराष्ट्रभर प्रवास करणारे स्वामीजी आता रुद्रपूजा, पदयात्रा करू लागले. सेवेच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग होऊ लागला.

स्वामी प्रणवानंदजी समृद्धतेचे गुपित सांगत म्हणाले, “जीवनात गुरुच्या आगमनामुळे जीवन सर्वार्थाने समृद्ध बनले जणूकाही गुरुजींनी माझ्या जीवनाला परीसस्पर्श केला. स्वतःसाठी तर सगळेच जगतात. आपण लोकांसाठी जगायला हवे, त्यांना मदत करायला हवी. त्यासाठी एकमेव मार्ग आहे ‘आर्ट ऑफ लिविंग.’

अमृताचीं फळें अमृताची वेली । तेचि पुढें चाली बीजाची ही ॥