एकीकडे जगभर गोड्या पाण्याचा प्रश्न युद्धपातळीवर येऊन ठेपला आहे तर, एकीकडे आटलेल्या नद्या, नाले आणि तलाव यांना गाळमुक्त करून त्यांचे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत पुनरुज्जीवीत करून दुष्काळी भागामध्ये जल क्रांती होताना दिसते. जल जागृती अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये ही क्रांती सुरु केली आहे, ३६ वर्षीय श्री.मकरंद जाधव यांनी.
पेशाने सिव्हील इंजिनिअर असलेल्या या युवकाने श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने सन २०१३ मध्ये ३, सन २०१४ मध्ये १२ आणि सन २०१५ मध्ये २५ गावातील नद्या, नाले आणि तलावावर हे अभियान राबवले, तर नजीकच्या काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक दुष्काळी गावामध्ये, नदीवर राबविण्याचा संकल्प आहे. या प्रायोगिक प्रकल्पांच्या आधारे असेच प्रकल्प कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या विविध नद्यांवर सुरु आहेत.
सध्या युवा नेतृत्व प्रशिक्षण प्रकल्पाचे राज्य समन्वयक, हॅपिनेस प्रोग्रॅम, रूरल हॅपिनेस प्रोग्रॅम, वाय.एल.टी.पी. आणि प्री टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅमचे प्रशिक्षक, लातूरचे श्री मकरंदजी धर्मवीर जाधव बोलत होते -
“लहानपणापासूनच मी लाजाळू, एकलकोंडा होतो, अभ्यासात जेमतेम परंतु कोणत्याही सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये, उत्सवांमध्ये मात्र सतत रमत असे. वडील एल.एल.बी. वकील तर कॉलेजमध्ये मी ‘एल.एल.बी.’ (लॉर्डस ऑफ दि लास्ट बेंच) नेहमी शेवटच्या बाकावर बसलेला, न्युनगंडाने ग्रस्त, घशाला सतत अॅलर्जीने त्रस्त. या अॅलर्जीसाठी सगळ्या ‘पॅथी’, उपचार पद्धती निष्क्रिय ठरल्या होत्या. इंजिनिअरिंगची पहिली तिन्ही वर्षे सेकंड क्लास मध्ये कसाबसा उत्तीर्ण होत होतो.”
घशाची अॅलर्जी आणि न्यूनगंड नाहीसा झाला
“माझ्या प्रोफेसरांच्या सांगण्यावरून ५ एप्रिल २००१ मध्ये नेहा दीदी पेंडसेंचा आर्ट ऑफ लिव्हींगचा बेसिक कोर्स केला. कोर्स मध्ये दुसरी सुदर्शन क्रिया केली आणि मला जाणवले की, वर्षानुवर्षे ज्या घशाच्या अॅलर्जीने मी हैराण होतो तो त्रास समूळ निघून गेला होता. सुदर्शन क्रिया आणि शिबिरातील ज्ञान चर्चांमुळे माझ्यात अमुलाग्र बदल जाणवत होता. मलाच आश्चर्य वाटले की, शिबिराच्या शेवटच्या दिवशी मी जिल्हा बार कौन्सिल मध्ये शिबिराबद्दल परिचयात्मक चर्चासत्र आयोजीत केले आणि तेथे चर्चा सत्र पूर्ण करून आलोदेखील. माझ्या सारख्या शामळू, लाजाळू, न्युनगंडाने ग्रस्त युवकांसाठी ही फार मोठी प्राप्ती होती.”
सुदर्शनक्रियेच्या सततच्या सरावाने मकरंदजींचा आत्मविश्वास वाढला, एकाग्रता वाढू लागली. इंजिनीअरिंगच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत झाले. शेवटचे वर्ष ते प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. बेसिक कोर्स तसेच इतर शिबिरांमुळे ‘मी काहीही करू शकतो.’ हा आत्मविश्वास त्यांना प्राप्त झाला.
जीवनाला दिशा प्राप्त झाली
मकरंदजींना आर्ट ऑफ लिव्हींग मधील त्यांच्या जीवनातील सर्व घडामोडी तारीखवार/ तपशीलवार लक्षात आहेत. ते सांगतात, “१ सप्टेंबर २००१ रोजी बेंगलोर आश्रमामध्ये गुरुजींची भेट झाली. त्यांच्या ज्ञान चर्चेमधून सेवेचे महत्त्व समजले, सेवेला आणि जीवनाला दिशा मिळाली. माझ्या जीवनातील सकारात्मक बदल आणि आनंद, ऊर्जा इतरांना देण्यासाठी मी गुरुजींचे माध्यम बनायचे ठरवले.
सरपंच परिषद -२०१३
फेब्रुवारी २०१३ ला सरपंच परिषदेसाठी बेंगलोर आश्रमामध्ये आजूबाजूच्या सर्व खेड्यातून २२५० सरपंच जमले होते. तेथे सर्वांना मार्गदर्शन करताना गुरुजींनी ‘आदर्श गाव’ संकल्पना मांडली होती. त्यामध्ये युवा नेतृत्व प्रशिक्षणांतर्गत खेडोपाडी शिबिरे घेऊन, युवाचार्य निर्माण करून, प्रत्येक गावाची गरज जाणून घेऊन तेथे जल जागृती अभियान, सेंद्रीय शेती, व्यसन मुक्ती, ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत स्थानिक स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून महिला सशक्तीकरण इ. प्रकल्पांबाबतीत मार्गदर्शन केले होते. मकरंदजी तेथून प्रेरणा घेऊन हे सर्व प्रकल्प आपले सहकारी प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांच्या द्वारा गावागावांमध्ये राबवत आहेत. पुढे ते म्हणाले की,
जल जागृती अभियान
"या परिषदेमध्ये गुरुजींनी मराठवाडा आणि विदर्भातील घटते जलस्त्रोत, वाढता दुष्काळ आणि त्यांच्या विपरीत परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यावर त्यांनी उपायदेखील सुचवला ‘जल जागृती अभियान.’ यामध्ये आटत्या जल स्त्रोतांचे दुष्परिणाम, त्यावरील उपाय योजना, सामाजिक प्रबोधन आणि प्रत्यक्ष कृती याबाबत सखोल मार्गदर्शन केले. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमी मधील या जलक्रांती बाबतीत मी खूपच प्रेरित झालो. मी आश्रमातून परतल्यावर प्रत्यक्ष कृतीला प्रारंभ केला.” मकरंदजी सांगत होते.
गावोगावी जाऊन मकरंदजीनी ग्रामस्थांना ‘जल जागृती अभियान’ ही काळाची गरज आहे हे समजाविले आणि प्रत्यक्ष कृती आराखडा आखून जनतेला तन, मन आणि धनाच्या रूपाने सहभागी होण्याचे आवाहन केले आणि याच्या वस्तुनिष्ठ परिणामांबद्दल जनतेला प्रशिक्षित करू लागले. सर्व ठिकाणी स्थानिक जनता, शासकीय अधिकारी आणि लोक प्रतिनिधी यांचा या उपक्रमात सहभाग वाढू लागला, मोठा समूह बनत गेला आणि ‘गुरुजींचे जल जागृती अभियान’ उपक्रम यशस्वी होवू लागले.
याबाबतीत मकरंदजी म्हणतात, “२०१३ मध्ये तीन नद्यांवर सुरु झालेले हे अभियान तीनच वर्षात आसपासच्या राज्यांसह देशभर यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहे. या सेवेमुळे मी स्वतः मध्ये देखील अमुलाग्र सुधारणा होताना पहातोय, समाजात तर सुधारणा होऊ लागलीच आहे. या सुधारणा पाहून या सेवा उपक्रमा मध्ये माझ्या सहभागाबद्दल अभिमान वाटतो आणि जीवन सार्थक झाले असे वाटते. परंतु अद्याप खूप काही करणे बाकी आहे.
१०८ गावांची गुरुजीना ‘भेट’
“महाराष्ट्रातील आर्ट ऑफ लिव्हींगचे पहिले वहिले व्यसनमुक्ती केंद्र, पहिले श्री श्री रविशंकर ग्रामीण विकास केंद्र आणि पहिले वाय.एल.टी.पी. केंद्र वाटूर, जि.जालना येथे आम्ही करत आहोत. या विकासाला गती मिळावी म्हणून आम्ही ‘रूरल मॅनेजर ट्रेनिंग प्रोग्रॅम’ सुरु केला आहे. आश्रमातील प्रशिक्षण केंद्रातून गरजू व्यक्तींना सुतारकाम, विद्युतप्रशिक्षण, शिवणकाम, मेणबत्त्या बनवणे, सॅनिटरी नॅपकीन बनवणे इ.चे प्रशिक्षण देणे सुरु आहे.
मार्च २०१६ मध्ये दिल्लीमध्ये आर्ट ऑफ लिव्हींगच्या ३५ व्या आणि गुरुजींच्या ६५ व्या वाढदिवसा- दिवशी वर्ल्ड कल्चर प्रोग्रॅमला अशा प्रकल्पांनी स्वयंपूर्ण १०८ खेड्यांची भेट आम्ही गुरुजींना द्यायचा संकल्प आहे.” ते सांगत होते.
मकरंदजींच्या या ‘आम्ही आम्ही’ या शब्दांमध्ये त्यांचे विविध समन्वयक जसे, डॉ. पुरुषोत्तमजी वायाळ, डॉ. जितेंद्र, व्यंकटेश मंगलम, अरुण बोबडे, राजेंद्र राऊत, तुकाराम जावळे, सुधाकर टोके, महादेव जगदाळे, महेंद्र मालवीय तसेच सहकारी प्रशिक्षक, स्वयंसेवक, युवाचार्य ज्ञात-अज्ञात सामावले आहेत. यांचा मकरंदजी सतत उल्लेख करत होते. ते नमूद करतात की,
“या सर्वांच्या प्रतिबद्धतेशिवाय, सहकार्याशिवाय हे शक्य नाही. येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक गाव-खेड्यामध्ये गुरुजींचा वाय.एल.टी.पी होत असणार आहे,” हे नमूद करताना ते अत्यंत विनम्र होतात. परंतु गुरुजींनी त्यांना सेवा करणे सुलभ होण्यासाठी ‘बलेरो दिली आहे’ हे सांगताना त्यांचा ऊर अभिमानाने, भक्तीने भरून येतो.
वेदिक गणित
“ ५००० वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी संशोधन करून ही गणित पद्धती विकसीत केली आहे, ज्या मध्ये तुम्ही कितीही अंकी संख्येवर कितीही अंकी संख्येची प्रक्रिया करून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, धन, वर्गमूळ, घनमूळ काढू शकता. या प्रक्रिया करताना आपल्या मेंदूच्या दोन्ही बाजूचा विकास होऊन एकाग्रता, मेंदूची क्षमता आणि सृजनशीलता वाढीस लागते. विविध पातळीवर यामध्ये अंकगणित, त्रिकोणामिती इ. गणिताच्या प्रगत शाखांचा वापर होतो. ही गणित पद्धती माझी अत्यंत प्रिय आहे आणि याची शिबिरे घेताना मला स्वतःलाच याचा खूप लाभ होतो. ही पद्धती आता निव्वळ आर्ट ऑफ लिव्हींग मध्येच शिकवली जाते. या नष्ट होत असलेल्या वेदिक गणिताबद्दल काहीतरी भरीव करायला हवे,” अशी चिंता मकरंदजींच्या बोलण्यातून जाणवत होती.
“मानव जन्मामध्ये सेवा करण्याची इच्छा होणे, सेवेचे आत्मिक सुख अनुभवायला मिळणे आणि हाती घेतलेल्या सेवा प्रकल्पांना अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त होणे, यासाठी गुरूची आणि गुरुकृपेची गरज असते. हे सर्व मला गुरुजींच्या मुळेच प्राप्त होत आहे.” असे मकरंदजी समारोप करताना बोलले.
सध्या मकरंदजी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, औरंगाबाद, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सक्रीय आहेत.
मकरंद जाधव
संपर्क क्रमांक : ०८२७५००५४९१
ईमेल : vvkilatur@gmail.com