“ प्रेम, आनंद आणि ज्ञान जितक्या लोकांना द्याल, तितके ते तुमच्यामध्ये वाढेल” - श्री श्री रविशंकरजी.
उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा,बिहार, महाराष्ट्र असे भारतभर तसेच युरोप, रशिया, नेपाळ आणि विविध देशांमध्ये सेवारत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ प्रशिक्षक स्वामी वैशंपायनजी, पूर्वाश्रमीचे आनंद वैशंपायन स्वानुभव कथन करत होते.. श्री श्री रविशंकरजींच्या वरील वाक्यानुसार जीवन व्यतीत करणारे स्वामीजी सन २००० सालापासून आर्ट ऑफ लिव्हींगशी जोडले गेले आहेत. मुंबईमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून, तेविसाव्या वर्षी कॉम्प्यूटर अँनालीसीस अँड सिस्टीम मॅनेजमेंट तसेच मास्टर इन कॉस्टिंग या पदवी त्यांनी प्राप्त केल्या. नाशिक स्थित आर्ट ऑफ लिव्हींगचे हे ज्येष्ठ स्वामीजी कॉलेज जीवनामध्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळपटू विजेते (आंतरराष्ट्रीय) होते. त्याकाळी त्यांनी स्वतःची बुद्धिबळ प्रशिक्षण संस्था स्थापन केली होती.
ते पुढे म्हणाले, “भरपूर भौतिक सुख साधने असून जीवनामध्ये समाधान, पूर्णत्व नव्हते, कशाचा तरी शोध सुरु होता. मित्राच्या सांगण्यावरून फेब्रुवारी २००० मध्ये मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे पहिले शिबीर केले. शिबिरानंतर, सुदर्शन क्रियेनंतर खूपच चैतन्यदायी वाटू लागले. बुद्धिबळ स्पर्धेसाठी आवश्यक मनाची एकाग्रता आणि स्पष्ट स्मरणशक्ती प्राप्त झाली. तसेच जीवनाच्या सर्वच स्तरावर प्रगती अनुभवायला लागलो.”
परंतू, ही ऊर्जा आणि सकारात्मक बदल टिकवायचा कसा? हा प्रश्न त्यांना पडायचा. एकदा गुरुदेवांच्या ज्ञान चर्चेतून याचे रहस्य त्यांना समजले . गुरुदेव बोलत होते, “प्रेम, आनंद आणि ज्ञान स्वतःपुरता मर्यादित ठेवलात तर कमी होईल. जितक्या जास्त लोकांना याचा अनुभव द्याल, जितके वाटाल तितके ते वाढेल.” एकदा हे रहस्य समजल्यावर स्वामीजींनी विविध प्रशिक्षकांची विविध शिबिरे आयोजित केली आणि त्यांना त्यामध्ये मदत केली. स्वतःही पुढची सर्व शिबिरे करून आर्ट ऑफ लिव्हींग प्रशिक्षक बनले आणि जीवनातील प्रेम आणि आनंद द्विगुणीत होऊ लागला.
ज्ञानाबाबतीत अनौपचारिक बोला
तिहार जेलमध्ये आर्ट ऑफ लिविंग ची विविध शिबीरे सतत होत असतात. तेथे होणाऱ्या शिबिरामुळे , सुदर्शन क्रियेमुळे तेथील कैद्यांचे जीवन त्वरित बदलून जाते . त्यांच्यामधील पश्चातापाची , सूडाची भावना निघून जाते, जीवन तणावमुक्त बनते . त्यांच्या उर्जेचा वापर सृजनशीलतेसाठी होतो हे माहीत आहेच. पण एका शिबीरातून गुरुदेवाना अपेक्षित सत्संग काय आहे, हे स्वामीजींना उमगले. ते म्हणाले,
“मी आणि स्वामी प्रबुद्धानंदजी अतिरेक्यांचे शिबीर घेत होतो, परंतू बरेच अतिरेकी शिबिरा दरम्यान बॅंरेकच्या बाहेर भटकायचे. ही गोष्ट गुरुदेवांना बोलल्यावर गुरुदेव म्हणाले, ”तुमच्यापैकी एकाने भटकणाऱ्या अतिरेक्यांच्या सोबत बाहेर वेळ घालवा, त्यांच्यासोबत ज्ञानाच्या अनौपचारिक गप्पा मारा.” हे केले आणि काय आश्चर्य. त्या भटकणाऱ्या अतिरेक्यांनी देखील शिबीर पूर्ण केले. शिबीर संपल्यानंतर त्या अतिरेक्यांचे सुंदर सुंदर अनुभव ऐकताना मला जाणवले की गुरुदेवाच्या सुदर्शन क्रियेची , या ज्ञानाची समाजातील सर्व थरातील व्यक्तींना खूप गरज आहे.
जीवन परिवर्तनाचे साक्षीदार
“पूर्वी बुद्धिबळ स्पर्धांसाठी तणावग्रस्त होऊन देशभर फिरणारा मी आता देश आणि विदेशामध्ये आर्ट ऑफ लिव्हींगचे योगा, सुदर्शन क्रिया, ध्यान, ज्ञानप्रसारासाठी फिरत असतो. जगभरातील लाखो लोकांचे जीवन यांच्या माध्यमातून आठवडेभरात बदलतानाचा मी साक्षीदार आहे." इतक्या धावपळ आणि प्रवासामध्ये देखील स्वामीजी सतत हसतमुख आणि तेजस्वी असतात.
“गुरुदेवांच्या आशीर्वादाने आणि आदेशाप्रमाणे मी अॅडव्हांस कोर्स, श्री श्री योगा, प्राणायाम-ध्यान शिबीर, हॅपिनेस प्रोग्रॅम, शक्ती क्रिया ही शिबिरे घेतो. परंतू माझे पहिले प्रेम युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबीर आहे. गुरुदेव देखील म्हणतात की, " ग्रामीण भागातील युवा परावलंबी दिसतो. “ कोणीतरी येईल, काहीतरी करेल “ अशीच त्यांची जीवनशैली झालेली आहे . या शिबिराच्या द्वारे त्यांच्यामध्ये आपण स्वावलंबन , नेतृत्वगुण जागृत करु शकतो."
गुरुदेवांनी २००१ साली पूर्ण वेळ प्रशिक्षक आणि युवा नेतृत्व प्रशिक्षण प्रकल्पाचे प्रमुख बनवले. वाय एल टी पी च्या माध्यमातून स्वामीजींनी उत्तरप्रदेश, महाराष्ट्रमधील ग्रामीण भागात पाच वर्षे सेवा केली. गुरुदेवांच्या या प्रकल्पामध्ये शेकडो खेड्यांमध्ये साधना, ज्ञान, सेवा आणि सत्संगचा प्रभाव होऊन तेथे हजारो ‘युवाचार्य’ निर्माण झाले. त्याद्वारे तेथे आजही व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकारण, पर्यावरण रक्षण इ. प्रकल्प सुरु आहेत.
आनंदाची लहर
“गुरुदेवांनी एकदा मला बोलावून म्हणाले, ‘हां....,आपको हंगेरी जाना हैI’ ( तुम्हाला हंगेरी ला जायचे आहे).. आणि मी माझी सुटकेस भरून हंगेरीला पोहचलो. माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय कालावधी होता. गुरुदेवानी योगाच्या द्वारे परदेशात अध्यात्म पोहोचवले आहे. तेव्हा तेथे भाषा हा अडसर असू शकत नाही. जेंव्हा तुम्ही तणावरहित असता , आतून आनंदी असता तेंव्हाच तुम्ही आनंद पसरवू शकता." या आनंद प्रसारासाठी त्यावेळी उचललेली सुटकेस अद्याप खाली ठेवलेली नाही. स्वामीजींनी बुडापेस्ट, हंगेरी इथे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला आहे.
खरा कर्मयोग
तरुणपणा पासूनच भगवद गीता वाचत होतो. गीतेमधील कर्मयोग आणि अकर्मयोग याबाबतीत मनामध्ये भरपूर गोंधळ होता. काही ठिकाणी तर अव्यवहार्यही वाटायचे, कधी कोणाला काही विचारले तर समाधान व्हायचे नाही. मग एकदा असेच आम्हास गुरुजींनी विचारले, गुरुजी म्हणाले, “ जे पण तुम्ही आत्ता काम करत आहात त्यामागे उद्देश काय आहे? म्हणजेच कुटुंब आहे, त्यासाठी काही करत आहात पण मग ते कशासाठी ? “ आमच्याकडून अलगदच उत्तर आले, “आनंदासाठी.” “ रडता?” कशाला? मोकळे होण्यासाठी. म्हणजेच ते सुद्धा आनंदासाठीच की हो !”
पुढे गुरुदेव म्हणाले, “ जे तुम्ही जीवनात करत आहात ते खुश होण्यासाठी करत आहात, परंतू तुम्ही खुश होऊन करा, खुश होण्यासाठी करू नका.” येथेच आतमध्ये लख्खकन वीजच चमकली. ते स्मितहास्य करत म्हणाले, ‘खुश होण्यासाठी करता तो अकर्मयोग झाला. खुश होण्यासाठी करू नका. खुश होऊन तुम्ही जे काय करता तो कर्मयोग आहे.’ येथेच खरा कर्मयोग कळला. जीवनाचा उद्देशही गवसला.
पूजा - होम यामागील विज्ञान
स्वामीजीना जाणवत होते की, ज्ञान, विज्ञानाबरोबरच पूजा, होम यामध्येही काहीतरी नक्कीच तथ्य आहे. कारण त्यांनी स्वतः गुरुजींबरोबर अनेक रुद्र्पुजा, देवीपूजा अनुभवल्या, त्या मंत्राद्वारे लोकांमध्ये बदल झालेले अनुभवले आहे. त्यांच्या मनात असलेली श्रद्धा, शांत झालेले मन, भक्तीने भरलेले व भारलेले सत्संगही स्वामीजींनी सहभागी होऊन अनुभवले. गुरूदेवांनी स्वामीजींना, पूजा, होम त्यामागील पुरावे, मंत्रोच्चार, आहुती त्यांचा मानवी जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम यासंबंधी ज्ञान दिले. आणि स्वामीजींना जाणवले की, यामागील विज्ञान किती उच्च कोटीचे आहे. येथे सत्याची वृद्धी होते, कार्यसिद्धीस जाताना अनुभवता येते.
खरोखरीच - “ ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाची वेणुनाद शोभत असे ।।“
स्वामीजी म्हणतात, ”आर्ट ऑफ लिव्हींग सर्व जाती, धर्म, पंथ, वर्ण, लिंग आणि सामाजिक स्तरांच्या पलीकडे जाऊन जगभर प्रेम, आनंद आणि ज्ञान पसरवत आहे आणि हे करताना अनेक सामाजिक उपक्रमांनी सामाजिक बदल घडवून आणत आहे.” पुढे जाऊन ते रहस्य सांगतात, “हे आपल्या आयुष्यात टिकवण्यासाठी आणि ‘जीवन सुंदर उत्सव आहे’ याची प्रचीती येण्यासाठी सर्वांना गुरुदेवांच्या मार्गावर घेऊन या. शिबीर करायला लावा..”
अशा उत्साहपूर्ण, उद्यमशील आणि सहज आनंदी व्यक्तिमत्वाशी बोलताना खरोखरीच वाटत होते -