‘सेवेला वाहून घेणे आणि उत्साहाचे मूर्तिमंत रूप म्हणजे नेहा दीदी.
आर्ट ऑफ लिव्हींगचे खुपसे ‘प्रशिक्षक’ ज्यांनी बनवले अशा प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिराच्या त्या ज्येष्ठ प्रशिक्षिका आहेत. तसेच त्या हॅपिनेस प्रोग्रॅम, दिव्य समाज निर्माण, अॅडव्हान्स कोर्स, सहज समाधी ध्यान या शिबिरांच्या प्रशिक्षिका आहेत. शिबिरांवर खूपच ‘कडक शिस्तीच्या’ म्हणून नावाजलेल्या नेहा दीदींना त्यांच्या सान्निध्यातील व्यक्ती जाणतात. ते प्रेमळ, मोकळ्या स्वभावाच्या, दिल खुलास हसणारे व्यक्तिमत्व आहे.
सेवेचे बीजारोपण
नेहाजी २० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून विविध प्रकल्पांवर गुरुजींच्यासोबत कार्यरत आहेत. हजारो लोकांचे जीवन गुरुजींच्या सान्निध्यामुळे बदलताना त्यांनी पाहिले आहे. स्वत:च्या जीवनातील विविध टप्प्यांवर झालेल्या सकारात्मक बदलांच्या बाबतीत त्या बोलत होत्या.
“माझा जन्म वलसाड, गुजरात येथे अत्यंत सधन कुटुंबात झाला. वडील खूप कडक शिस्तीचे, परंतु इतरांना ते सतत मदत करायचे. त्यामुळे माझ्यामध्ये देखील सामाजिक सेवेचे बीजारोपण पप्पांनी बालपणीच केले होते. मी मैदांनी खेळांमध्ये अग्रभागी असे. माझे बी.एस्स.सी, होमसायन्स मुंबईमध्ये झाले. आणि तेथेही विविध कार्यक्रमांमध्ये अग्रभाग कायम राहिला”
जुलै १९९७ मध्ये आर्ट ऑफ लिव्हींग चा बेसिक कोर्स (हॅपिनेस प्रोग्राम) त्यांनीच भरवला आणि केला. त्याचा अनुभव सांगताना नेहाजी म्हणतात की“ मी बेसिक कोर्स केला आणि मी गुरुजी आणि सुदर्शन क्रियेची ‘फॅन’ (चाहती) बनले. निव्वळ वीस दिवसातच मी अॅडव्हान्स मेडीटेशन कोर्स केला. साधना आणि शिबिरे भरवण्याची सेवा सातत्याने सुरु होती. प्रत्येक शिबिरागणिक माझ्यामध्ये ‘कुशल संघटक’ बनण्यासाठी लागणारे गुण, नेतृत्व गुण आपोआप वाढीस लागले होते. ‘दिव्य समाज निर्माण’ शिबीर केले आणि सेवेचे महत्व कळले. या शिबिरांमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तींच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता, शांती बघून या समाजाला या सुदर्शन क्रियेची, गुरुजींच्या ज्ञानाची किती गरज आहे जाणवू लागले. सेवेची गोडी लागली. सेवा करता करता माझा अंगी अजून धीटपणा आला.”
नेहाजी आर्ट ऑफ लिव्हींगच्या सर्व प्रशिक्षकांच्या चेहऱ्यावरील साधनेची चमक आणि अढळ हास्य पहायच्या आणि त्यांना वाटायचे की, निव्वळ पुण्यवान व्यक्तीच प्रशिक्षक बनू शकतात. पण बेंगलोर आश्रमामध्ये गुरूजींना भेटल्या आणि गुरुजींनी त्यांना सांगितले ‘तुम्हे टीचर बनना है I’
पंधरा दिवसात जादू
नेहाजी ‘युवा नेतृत्व प्रशिक्षण प्रशिक्षक शिबिर’ साठी दीड महिन्यासाठी आश्रमात पोहोचल्या. त्या तेथील अनुभव सांगत होत्या की, “या शिबिरासाठी संपूर्ण भारतातून, ग्रामीण–आदिवासी भागातून शिबिरार्थीं आले होते. इतर भागातून आलेल्या काही तरुण, अति उत्साही शिबिरार्थी मध्ये अजिबात शिस्त नव्हती. शिबिराला येण्याच्या वेळा, जेवण, रहाणे, वागणे सगळे सगळे बेशिस्त. पण शेवटच्या पंधरा दिवसांसाठी गुरुजी आश्रमात आले आणि मग त्यांच्या सोबत दररोज ज्ञान चर्चा, प्रक्रिया, ध्यान व्हायचे. आणि काय आश्चर्य ! बेशिस्त शिबिरार्थीं मध्ये अमुलाग्र बदल झाला. त्यांचे वागणे, भाषा सर्व काही सभ्य बनले. सर्वजण प्रशिक्षक बनले. माझा गुरुजींची शिबिरे, ज्ञान, प्रक्रिया आणि ध्यान यांच्या बद्दलचा आदर आणखी वाढला. आज या प्रशिक्षकांना झोकून देऊन सेवा करताना पाहते. त्यांचे जीवन सर्वार्थाने समृद्ध झाल्याचे पहाते आणि मलाच आश्चर्य, अभिमान आणि कृतकृत्य वाटते.” नेहाजी पुढे म्हणाल्या-
“मी समजत होते की, पुण्यवान व्यक्तीच प्रशिक्षक बनू शकतात. पण येथे प्रशिक्षक बनणारी व्यक्ती पुण्यवान बनते !!”
अगाध क्षमतांची ओळख
ऑगस्ट १९९९ ला नेहाजी ‘प्रशिक्षक’ बनल्या आणि दुसऱ्या दिवसापासून शिबिरे-सेवा सुरु झाली. शहरे, गांव, खेडी येथे प्रवास सुरु झाला. घरच्या संपन्नतेमुळे कधीही आपल्या कक्षेच्या बाहेर जाता आले नाही पण प्रशिक्षक बनल्यावर व्यक्तिमत्वाचा विकास होत गेला आणि या विरोधाभासातही मन शांत राहू लागले. गावाकडे जाणाऱ्या बसेस मध्ये प्रवास करतांना आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव झाली. त्या म्हणाल्या, “ज्या समाधानाने मी एसी ने प्रवास करत होते त्यापेक्षा जास्त समाधानाने आज मी कोणत्याही वाहनाने प्रवास करू शकते. कारण या प्रवासामुळेच मी जीवनाची दुसरी बाजू, वस्तुस्थिती समजू शकले. प्रशिक्षक बनल्यावर आलेल्या विविध अनुभवांतून मी माझ्या भावनांवर नियंत्रण प्राप्त करू शकले. सगळ्या सीमा गळून पडल्या. जीवन समतोल बनले. खऱ्या सामर्थ्याची, क्षमतांची ओळख होऊ लागली.”
युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिराच्या तसेच विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नेहाजी, शेकडो गाव-खेड्यामध्ये प्रवास करत आहेत. नेहाजींचा प्रवास अद्याप अव्याहत सुरु आहे. विविध शिबिरे, सेवा प्रकल्प आणि गुरुजींचे ‘महासत्संग’ इ.च्या माध्यमातून त्या संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगढ, बिहारभर शेकडो गाव-खेड्यांमध्ये प्रवास करत आहेत. हजारो लोकांचे जीवन आनंदी बनवत आहेत. हा श्री श्रीं च्या कोर्स मार्फत आनंद वाटतांना नेहजींच्या सान्निध्यातही आनंदाची अनुभूती होत असते. म्हणूनच म्हणावेसे वाटते.
आनंदाचे डोही आनंद तरंग ।।
महिला सबलीकरण
नेहाजींचे विशेष लक्ष सतत ‘महिला सबलीकरण’ वर असते. प्रत्येक प्रकल्पामध्ये ते कसे साधता येईल याची दक्षता घेतात. वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी मुंबईस्थित त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘ब्युटीपार्लर’ मध्ये कित्येक गरजू, गरीब, त्यागलेल्या मुली महिलांना ब्युटीपार्लर, संगणक आणि शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण देऊन कित्येकींना स्वावलंबी बनवले आहे. आश्रमातील महिला प्रशिक्षण शिबिरामध्ये त्यांचे खुपसे शिबिरार्थी असतात. हे फार कमी लोकांना माहित आहे.
अशा व्यक्तिमत्वाची, सेवेची नोंद घेऊन नेहाजींचा गौरव विविध संस्थांनी केला आहे. मराठवाडा–सेलू मधील सुभद्रा प्रतिष्ठानने “मातृगौरव पुरस्कार”, तसेच एंजल ऑफ पीस चा ‘विशालाक्षी पुरस्कार’ हे काही निवडक पुरस्कार. नेहाजींनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या व्यवस्थापकीय स्तरावर राज्यभर केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
“नेहादीदी- पुढे काय सेवा करू?’..शिबिर घ्यायचे आहे...? प्रकल्पांबाबतीत मार्गदर्शन हवे आहे...?महिला सबलीकरणासाठी तज्ञ मार्गदर्शन हवे आहे?"..अशा विविध आशयांच्या प्रश्नांसाठी -
संपर्क साधा : webteam.india@artofliving.org