तुम्हाला केस विंचरण्याची कल्पना नकोशी वाटते का? खाली नमूद केलेली योगासने करून पहा, नक्की लाभ होईल. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की, केस गळतीवर उपचार करण्यापेक्षा ती सुरु होण्याआधीच खबरदारी घेतलेली जास्त उपयुक्त ठरते. केस गळतीवर प्राचीन उपचार पद्धतींबद्दल अधिक माहितसाठी पुढे वाचा:
एका सुप्रसिद्ध मासिकाची पाने चाळताना हा लेख मला दिसला. मला खात्री आहे की या आवृत्तीच्या प्रति शिल्लक राहिल्या नसतील कारण सर्वजण सध्या एकाच अडचणीवर विविध उपचार शोधत आहेत आणि तो म्हणजे केस गळणे. तुमच्या सोयीसाठी मी त्यातला काही भाग इथे प्रसिद्ध करत आहे.
खरं म्हणजे आपले केसांचे आरोग्य आपल्या एकूण आरोग्याचे द्योतक आहे. सुंदर केस हे तुमच्याकडे असलेला आरोग्याचा अनमोल ठेवाच होय.
केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे: मानसिक तणाव, खाण्य-पिण्याच्या सवयी, व्याधी, आमली पदार्थांचे सेवन, हेअर डायचा वापर, आनुवंशिक विकार आणि धूम्रपान.
योग आणि ध्यान केल्याने फक्त केसांची समस्याच दूर होईल असे नाही तर पूर्ण शरीरालाच त्याचा लाभ होऊ शकतो. शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यही ह्यामुळे सुधारेल. योगा केल्याने टाळूच्या त्वचेमध्ये रक्ताभिसरण वाढते, पचनप्रक्रिया सुधारते आणि ताणतणाव कमी होतो.
केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त आसने:
पुढे वाकून केलेली सर्व आसने डोक्यातील व टाळू कडील भागातील रक्ताभिसरण वाढवतात. ह्या मुळे केसांच्या मुळांना पुष्टी मिळते. हा परिणाम काही दिवसातच लक्षात येईल.
१.अधोमुख श्वानासन
हे आसन केल्याने मस्तकात व्यवस्थित रक्ताभिससरण होते. ज्यामुळे सायनसचा व सर्दीचा त्रास कमी होतो. मानसिक थकवा, तणाव आणि निद्रानाश ह्या लक्षणांवार मात करण्यासाठी देखील हे आसन उत्तम आहे.
२. उत्थानासन:
थकवा व शीण घालवण्यासाठी हे आसन उत्तम समजले जाते. रजोनिवृत्ति काळात ह्या आसनाचा खूप लाभ होतो, पचन शक्तीची वृद्धी होते.
३. वज्रासन
हे एकमेव असे आसन आहे जे जेवल्यानंतर लगेच करता येते. मूत्र यंत्रणेचे विकार, वजन कमी होणे, मंदाग्नी ह्यांच्यावर परिणामकारक असे हे आसन आहे. पोटातील निर्माण झालेला वायू कमी करण्यासाठीही वज्रासन उत्तम समजले जाते.
४. अपानासन:
अपान म्हणजेच आपल्या पचन यंत्रणेतील गरळाचे शुद्धीकरणास जबाबदार असलेली ऊर्जा. हे आसन केल्याने .मनाला स्थैर्य येते, बद्धकोष्ठतेवर मात करता येते.
५ .पवनमुक्तासन:
पवनमुक्तासन केल्याने शरीरातील वायूवर नियंत्रण येते व पचन सुधारते. पाठीच्या खालच्या भागातील स्नायू मजबूत होतात. पोट व नितंबावरील मेद (चरबी) कमी होते.
६. सर्वांगासन:
हे आसन थायरॉईड ग्रंथींना पुष्टी देते ज्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, प्रजननसंस्था या कार्यरत राहतात.
केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त प्राणायाम:
१. कपालभाती प्राणायाम:
हा प्राणायाम केल्याने मेंदूला अधिक प्राणवायूचा पुरवठा होतो ज्यामुळे मज्जासंस्था अधिक कार्यरत राहते, विषद्रव्यांचा निचरा नीट प्रकारे होते. स्थूलपणा व मधुमेहावरही अत्यंत प्रभावी आहे.
२. भस्त्रिका प्राणायाम:
ह्यामुळे शरीरातील अतिरिक्त वात, कफ आणि पित्ताचा समतोल राहतो. मज्जासंस्थेचे शुद्धीकरण होते ज्यामुळे शरीर स्वस्थ राहते.
३. नाडी शोधन प्राणायाम:
हे हृदयाच्या समस्या, तसेच दमा आणि संधिवात, नैराश्य व डोळे आणि कानाच्या समस्या दूर ठेवते.
लक्षात ठेवण्यासारख्या आणखी काही गोष्टी:
- आसनांबरोबरच आपला आहार नियंत्रित ठेवणे खूप आवश्यक आहे. आहार संतुलित असावा ज्या मध्ये ताजी फळे, पालेभाज्या, डाळी, मोड आलेली कडधान्ये आणि दुधापासून बनलेली उत्पादने ह्यांचा समावेश असावा. हे केस वाढीसाठी महत्त्वाचे पोषक देतात. अशा आहाराने केसांचे व्यवस्थित पोषण होते.
- कडुलिंबाच्या पाण्याने केस धुतल्याने, आठवड्यातून २-३ वेळा धुवून स्वछ ठेवल्याने, नारळाच्या तेलाने मालिश केल्याने केसांची वाढ उत्तम प्रकारे होते.
- केसांवर कोणतीही उग्र रसायने किंवा केस सजवण्याची बाजारू भंपक उत्पादने वापरणे टाळा.
एक गोष्ट मात्र समजून घेतली पाहिजे की केस गळती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केस गाळण्याच्या प्रक्रियेची गती कमी करणे शक्य आहे पण गेलेले केस परत येणे सोपे नाही.