

जर तुमचा अमेरिकेतील योग संस्कृतीशी संपर्क आला असेल तर तुम्हाला एक व्यक्ती हवाई बेटावरील पर्वतासमोर भीती वाटावी इतके सुंदर शीर्षासन करतानाचा फोटो दिसला असेल. आणि मग तुमच्या मनात हाच विचार येईल की, ‘योग आपला प्रांत नव्हे.’ तथापि ‘योग’ हा सुंदर आसने आणि लवचिक, सुडौल आणि देखणी शरीरयष्टीपेक्षा आणखी काहीतरी वेगळा विषय आहे. त्तुमच्यावर जर असलं काही दडपण असेल तर तुम्ही यावर पुनर्विचार करावा आणि खाली दिलेल्या सोप्या सोप्या सूचनांचा वापर करत योगाभ्यास सुरु करावा यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो.

१. मी योगासाठी योग्य आहे कां? योग म्हणजे शरीराला पीळ देत करायची कष्टदायी आसने असावीत आणि ताठ उभे राहून पायांच्या बोटांना स्पर्श करणे हे न झेपणारे काम असे समजून योग आपल्यासाठी नाहीच असा तुमचा ग्रह झाला असेल. योग म्हणजे पायांच्या बोटांना स्पर्श करणे किंवा शरीराला ९८ अंशात पिळ देणे असले काहीही नाही. ही आपले शरीर, मन आणि श्वास यांना एकत्र आणण्याची, आपल्या ‘स्व’ ला पुन्हा जोडण्याची, एकरूप करण्याची प्रक्रिया आहे. योग अगदी सहज सोपा, विनासायास आणि कल्पना रहित आहे. तुमचे शरीर तेवढे लवचिक नसले, वयाच्या साठाव्या वर्षी योगाभ्यास सुरु करत असाल, तुमचे शरीर लाडावलेले असले तरी हरकत नाही, हि सारी बंधने सोडा. बस, सुरुवात करा आणि पुढील प्रवासाचा आनंद घ्या.

२.एक मार्ग अनुसरा. पहायला गेले तर योग साधनेच्या बऱ्याच परंपरा आहेत. काही हजारो वर्षांपासून चालत आल्या आहेत तर काही अगदी अलीकडच्या आहेत. तुम्ही स्वतः एकवेळ शोध घ्या आणि त्यातील काय अस्सल आणि आपल्यासाठी सर्वात योग्य आहे ते निवडा. एकदा निवड झाली कि जी परंपरा पाळायची आहे त्याचीच सखोल साधना करा, उगाच वेगवेगळ्या परंपरा अनुसरण्यापेक्षा एकच साधना सुरु ठेवणे योग्य.

३. मार्गदर्शनाखाली सराव करा. प्रशिक्षित योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाने योग शिकणे योग्य आहे. ते तुमच्याकडून योगाची प्रत्येक प्रक्रिया आदर्शपणे करवून घेतील. ज्यामुळे योगाचा मुळ पाया असलेले शारीरिक व मानसिक समत्व साधण्यास मदत होईल आणि ते करताना कसलीही इजा होणार नाही. योग शिकताना त्यातील काही माहिती आणि प्रक्रिया तुमच्यासाठी पूर्णतः नवीन असू शकतात. म्हणून आपणास उत्तम अनुभव प्राप्त होण्यासाठी या नवीन नवीन गोष्टी शिकायला तयार राहा.

४. तुमचे डॉक्टर आणि योगप्रशिक्षक सदैव मदतीला तत्पर आहेत. जर तुमच्या काही शारीरिक तक्रारी असतील तर तुमच्या योगप्रशिक्षकांना प्रशिक्षण सुरु करण्यापूर्वीच त्याची कल्पना द्या. त्यामुळे काही योगासनांमध्ये तुमच्यासाठी अनुकूल बदल करणे त्यांना सोयीचे जाईल.

५.साधी वस्त्रे - उच्च विचार. योगाभ्यास करताना तुमचे सारे लक्ष तुम्ही कसे दिसता यावर नको तर तुमच्या सरावावर हवे. योगाच्या क्लासला जाताना किंवा घरी सराव करताना अगदी आरामदायक कपडे घाला. तसेच बेल्ट किंवा अवांतर दागिने घालणे टाळा. कारण योगाभ्यासामध्ये त्यांच्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो.

६. कोकिळेच्या कुहूकुहूने जागे व्हा. पहाटेची वेळ योगाभ्यासासाठी आदर्श वेळ आहे. आहे. पण ‘पहाटे जमत नाही’ हे योगाभ्यास न करण्याचे ते कारण असू नये. योगाचा सराव दिवसभरात कधीही करू शकता. फक्त तुमचे पोट रिकामे असायला हवे.

७. हलक्या पोटाने योगाभ्यास उत्तम होतो. जेवणानंतर कमीत कमी दोन तीन तासांनी, रिकाम्या पोटी योगाभ्यास करणे ही आदर्श पद्धत आहे. भरपूर पाणी पिण्याकडे लक्ष द्या. ती सुद्धा चांगली सवय आहे. योगाचा एक वेगळा फायदा हा आहे की त्याने शरीरातील विषतत्वे बाहेर निघण्यास मदत होते. आणि रोज तीन ते चार लिटर पाणी पिल्याने ती विषतत्वे शरीराबाहेर जाण्यास मदत होते.

८. सुरुवात करण्यापूर्वी तयार व्हा. योगाभ्यासापूर्वी हलका फुलका, शरीराला ताण देणारा व्यायाम केल्याने शरीर सैल होऊन ते योगाभ्यासासाठी तयार होते. एक तासाचा योगाभ्यास आपल्याला दिवसभर ताजेतवाने ठेवतो.

९. संथ आणि स्थिर रहा - शर्यत जिंका. योगाचा प्राचीन ग्रंथ, ‘पतंजली योग सूत्र’ अनुसार योगासनाची व्याख्या आहे, “स्थिरम् सुखम् आसनम्”. ह्याचा अर्थ आहे, “स्थिर आणि सुखदायी वाटेल अशी स्थिती”. तुम्ही जेवढे सहजपणे करू शकता तेवढेच करा आणि मग शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी थोडे अधिक ताणा. यासाठी तुमच्या श्वासाची मदत घ्या. श्वास हलका आणि दीर्घ असताना स्नायू विश्राम करत असतात. पण श्वास जलद आणि अनियमित होऊ लागला तर तुमच्यावर जास्त ताण येतोय हे समजावे. आपल्या सहज क्षमतेच्या थोडे पलीकडे जाल तेंव्हाच योगाभ्यास मनोरंजक होईल आणि जसजशी प्रगती करीत तुम्ही नवी आसने करू लागता, तसे ते आणखी आव्हानात्मक वाटू लागेल. तुम्ही आपल्या आसनात जसे स्थिर होऊ लागता तसे तुम्हाला आंतरिक स्थिरतेचा अनुभव येऊ लागेल जे योगाभ्यासाचे ध्येय आहे.

१०. तुमचे स्मित - तुमची प्रगती. तुम्ही स्वतःतील फरक बघा. चेहऱ्यावरील स्मितहास्य आपले शरीर आणि मन शिथिल करते आणि योगासनाचा आनंद द्विगुणीत करते. श्वासाप्रमाणेच आपल्या स्मितावरून आपला योगाभ्यास किती सहजपणे सुरु आहे हे पडताळून पाहता येईल.

११. प्रत्येक योगासन तुमच्या प्रमाणेच अद्वितीय आहे. योगाभ्यास सुरु करताना हे लक्षात ठेवा की प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी आहे आणि वेगवेगळे लोक कुशलतेच्या वेगवेगळ्या पातळीवर असतात. योगा क्लास मध्ये आपली तुलना इतर साधकांशी करू नका. आणि योगासनाच्या ज्या स्थितीत तुम्ही आहात तीच स्थिती तुमच्यासाठी योग्य आहे हे लक्षात असू द्या. कुणी एखादे आसन अगदी सहजपणे करत असेल तर इतरांना त्यासाठी ज्यादा वेळ व सरावाची गरज पडू शकते. म्हणून स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका.

१२. रुपांतरीत ऊर्जा! योगासने आटोपताच लगेच उठून आपली दैनंदिन कामे सुरु करणे योग्य नाही. थोडा वेळ निवांत पडून विश्रांती घेणे गरजेचे असते. या विश्रांतीमुळे शरीर विश्राम करून योगासनातून निर्माण झालेली ऊर्जा संग्रहित केली जाते. नियमितपणे काही महिने योगाभ्यास केल्याने त्याचे सूक्ष्म आणि गहिरे फायदे प्राप्त होतात. योगाभ्यासमध्ये योगासने, प्राचीन शाश्वत ज्ञान, प्राणायाम आणि ध्यान हे सारे अंतर्भूत आहे ज्यामुळे आपणास शारीरिक स्तरापलीकडील गहिऱ्या अध्यात्मिक अनुभव येतात.

१३. योग - जीवन जगण्याची शैली. आसन, प्राणायाम, ध्यान, सजगता, पौष्टिक आहार आणि आपली जीवनशैली हे सारे एकमेकांना पूरक आहेत. या सर्व घटकांचा एकत्रित अंगीकार केल्यास आपल्याला योगाचा आदर्श अनुभव येईल आणि त्याचे गहरे फायदे लाभतील.

१४.योगाभ्यासाबध्दल आदर बाळगा. आपली योग मॅट शक्यतो इतर कारणासाठी वापरू नका तसेच इतरांना वापरायला देऊ नका. स्वच्छ, शांत आणि शक्यतो एकच जागा असुद्या. आरामदायक, स्वच्छ, सैल कपडे, एक उद्दिष्ट्य, सातत्य आणि चिकाटी असणे गरजेचे आहे. धीम्या गतीने सुरुवात करा, आठवड्यातून दोनदा तीनदा साधना करण्याचा संकल्प ठेवा आणि मग नियमित रहा. योगाभ्यासाबध्दलचा आदर त्याला अधिक गहिरा करतो.

चला - सुरुवात करा योगाभ्यासाला वेळ द्या आणि संयम ठेवा. नियमित सरावाचे फळ तुम्ही कल्पनाही केली नसेल इतक्या विविध प्रकारे तुम्हास लाभेल. योग्यांना योगाभ्यासाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखिकेविषयी दोन शब्द: सेजल ह्या गेल्या वीस वर्षांपासून योगाची जीवनशैली अनुसरत आहेत आणि त्यांना योग शिकविण्याचा सहा हजाराहून अधिक तासांचा अनुभव आहे. ओडीसातील श्री श्री युनिव्हर्सिटी मध्ये ‘योग अॅकाडेमिक कौन्सिल’च्या त्या सभासद आहेत. त्या आर्ट ऑफ लिविंगच्या ‘हॅपिनेस प्रोग्राम’ आणि ‘श्री श्री योगा’ शिबिराच्या प्रशिक्षिका आहेत. त्याच बरोबर विविध केंद्रामध्ये योगाचे वर्गही त्या घेतात. त्यांनी ‘स्पिरीट ऑफ योगा’(२००९) हे पुस्तक संकलित केले आहे, तसेच त्यांनी विविध भारतीय वर्तमानपत्रात व वेबसाईटवर योगाशी संबंधित असंख्य लेख लिहिले आहेत.