आपुलकी, उद्यमशीलता आणि स्थितप्रज्ञता यांचा अनुपम संगम म्हणजे रोहिणी दीदी.
समाजसेवा हीच देवपूजा असे मानून जीवन जगणाऱ्या, वडिलांच्या कडून समाज सेवेचा वारसा मिळालेल्या आर्ट ऑफ लिव्हींगच्या ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका, एंजेल ऑफ पीस चा "विशालाक्षी पुरस्कार" विजेत्या रोहिणीजी ओक सर्वांनाच परिचित आहेत. हॅपिनेस प्रोग्रॅम, पार्ट-२, दिव्य समाज निर्माण, सहज समाधी ध्यान, ब्लेसिंग कोर्स, पूर्व आणि प्रशिक्षक प्रशिक्षण शिबीर, युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर आणि आर्ट ऑफ लिव्हींग योगा-१ या शिबीरांसाठी आणि विविध सेवां प्रकल्पांसाठी त्या भारतात - महाराष्ट्र, ओरिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक तसेच बाहेरील देशांत - भूतान, चीन, केनिया, अर्जेंटिना, उरुग्वे, ब्राझील, चिली, सुरीनाम, त्रिनिनाद आणि सेनेगल या परदेशामध्ये भ्रमंती करत असतात.
अशा सदा हसतमुख आणि नवनवीन ठिकाणांतील नवनवीन लोकांना त्वरित आपलेसे करणाऱ्या रोहीणीजी त्यांनी केलेल्या आर्ट ऑफ लिव्हींगच्या पहिल्या कोर्सबाबत बोलत होत्या -
“कॉमर्सची पदवीधर आणि योगाची डिप्लोमा प्राप्त असलेली मी, मुंबईतच नोकरीसाठी लोकलने प्रवास करताना आमची एक ग्रुप मेंबर आम्हाला खूपच उत्साही, ताजी तवानी दिसू लागल्याने तिला विचारताना तिने बेसिक कोर्स /हप्पिनेस प्रोग्राम आणि सुदर्शन क्रियेबाबत सांगितले. आर्ट ऑफ लिवींग च्या या शिबीराबध्दल माझ्या बहीणीने सांगितले होते परंतु प्रत्यक्षात मैत्रिणीमधील बदल पाहून, सुदर्शन क्रियेच्या उत्सुकतेपोटी १ फेब्रुवारी,१९९४ ला बेसिक कोर्स केला.”
आणि कलाटणी मिळाली….
“शिबीर संपतानाच मला दुर्दम्य उत्साह आणि आंतरिक शांतीची अनुभूती झाली. पूर्वी बाहेरचे ताण तणाव घरी यायचे, ‘ऑफीस सोडले की आपल्या डोक्यातून ऑफिस बंद’ व्हायला पाहीजे, ते होत नव्हते ते शिबीरानंतर होऊ लागले. सुदर्शन क्रियेच्या सरावाने मनाला सहजगत्या हाताळणे सोपे झाले, वैचारिक पातळी अधिक सखोल झाली आणि मी पंधरा दिवसातच गुरुजींच्या सोबतच्या अॅड्व्हांस कोर्सला पोहोचले. माझ्यातील त्या पंधरवड्यातील सकारात्मक बदल पाहून मी भारावून गेले.” अॅड्व्हांस कोर्सला गुरुजी यायचे – ज्ञानचर्चा करायचे, ध्यान घ्यायचे. कोर्स संपताच एक वेगळी उर्जा अनुभवास येत होती. गुरुजींच्या सानिध्यात एक शांती, स्थिरता आणि असीम सकारात्मक उर्जा हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आणि त्याक्षणी गुरुजींसोबत मी जोडली गेले.”
समस्त चराचराची, सृष्टीची काळजी..
रोहिणी जी म्हणतात, ”गुरुजींच्या सानिध्यात मला एक गोष्ट जाणवली की, त्यांनी फक्त मानव जातीचीच नाहीतर झाडे-झुडपे, पर्यावरण, समस्त सृष्टी, ब्रम्हांडाचीच जबाबदारी त्यांनी घेतली आहे असे दिसत होते. विविध सेवा प्रकल्प, जल जागृती योजना, सेंद्रिय शेती, पर्यावरण रक्षणासाठीचे प्रकल्प हे निव्वळ सेवा प्रकल्प नाहीत तर ते प्रेम ,काळजी आणि जबाबदारीचाच भाग आहे.
माझ्या जीवनाला दिशा मिळाली, मी आर्ट ऑफ लिव्हींग प्रशिक्षिका व्हायचे ठरवले. १९९७ साली प्रशिक्षिका झाले. १९९९ साली पूर्ण वेळ प्रशिक्षिका बनले.
मी सर्व काही करीन
अखंड प्रवास आणि निरंतर सेवा असून देखील स्वतःचा अनुभव सांगताना रोहिणीजी नम्रपणे नमूद करत होत्या की, “हे अफाट कार्य गुरुजींचेच आहे. मी त्यांची एक माध्यम आहे, साधन आहे, निमित्त मात्र आहे. वेगवेगळी मोठी मोठी शिबिरे शिकवताना गुरुजींचे महा-सत्संग ‘उमरगा’ सारख्या ग्रामीण भागात आयोजित करताना, कोणतेही सेवा प्रकल्प राबवताना देश विदेशामध्ये अपेक्षेपेक्षा घवघवीत यश मिळवताना मला नेहमी गुरुजींच्या एका वाक्याचा क्षणोक्षणी प्रत्यय यायचा."
"तुम्ही फक्त जा, मी सर्व काही करीन.”
रोहीणीजी यांनी आर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रशासकीय स्तरावर देखील भरीव कार्य केले आहे.
रोहिणीजीच्या सोबत शिबीर केलेल्यांच्या प्रतिक्रिया...
" माझ्या पहिल्या प्रशिक्षिका रोहिणी दिदींचा मी कृतज्ञ आहे , त्यांनी मला या सुंदर मार्गाचा परिचय करुन दिला. यामुळे माझ्या आध्यात्मिक प्रगती सोबत व्यावसायिक बढती आणि प्रगती विनासायास होत आहे . दोन वर्षापासून ची पाठदूखी नाहीशी झाली. माझी आणि माझ्या कुटुंबीयाची काळजी घेण्यासाठी कोणीतरी आहे या जाणिवेमुळे जीवनातील भीती नाहीशी झाली. धन्यवाद गुरुजी आणि रोहिणी दिदी." मुरली सर्मा ,प्रेसिडेंट, जेनेटिक्स & हेड मिशन मालादियाल्प्का लॅब्स लि..
आन्ता थीआम , जुनियर प्लानिंग इंजिनिअर , आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट , सेनेगाल.. " या शिबीरात मला जाणवले की वायफळ गप्पा , टीव्ही, वर्तमानपत्र. स्मार्टफोन, इंटरनेट मध्ये आपली खूप ऊर्जा नष्ट होते. झोप, विश्रांती देखील नीट होत नाही. ती विश्रांती मला इथे मिळाली. बोलण्यामुळे नाहीतर मौनामध्येच संभाषण साधता येते हे उमगले. माझे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन समृद्ध बनले. सुदर्शन क्रिये मुळे मला लाजाळूपणा आणि तणावातून जलद बाहेर येण्यास मदत झाली. "
पाणी नाही कृपा
वर्ष २०१२, दुष्काळग्रस्त सांगली जिल्हा, खेड्यांमध्ये, वाड्यांमध्ये टँकरने पाणी वितरणाची जबाबदारी आर्ट ऑफ लिव्हींगकडे आली. रोहीणीजी हिरीरीने पुढे आल्या. एरवी पाणी वितरण म्हणजे भरलेला टँकर विहीरीत, हौदात ओतायचा आणि परत यायचे. परंतु रोहिणीजीनी योजना बनवली. त्यांच्या मते, हे माझ्यासाठी पाणी नाही आहे तर ‘कृपा’ आहे, आणि मी ती जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवणार.” तेंव्हा गुरुजींची शिकवण उपयोगी आली. गुरुजी म्हणतात.
“लोकांमध्ये जबाबदारीची, आपलेपणाची भावना वाढीस लावा. ते स्वतःच त्यांचे जीवन समृद्ध बनवतील.”
आमचा टँकर छोट्या छोट्या वाड्यापर्यंत पोहोचून घागरी-बदलीमध्ये आम्ही पाणी पोहोचवले. लोक आमच्या टँकरची वाट पहात असायचे. कारण त्यांचे अनुभव असे होते की, या टँकरच्या पाण्याच्या वापरामुळे कोणाचा आजार कमी झाला, कोणाचा त्वचा रोग कमी झाला. मग ही कृपा नाही तर काय आहे.?” यामध्ये आम्ही १६ खेड्यातून २०००० लोकांना पाणी पुरवत असू.
जिल्हा-तालुका-गावे-खेडी-वाड्या
आर्ट ऑफ लिव्हींगचच्या व्याप्ती बद्दल बोलताना गुरुजी नेहमी म्हणतात की, ‘आपण जिल्ह्यापासून-तालुका-गावे-खेडी आणि छोट्या छोट्या वाड्यापर्यंत हे ज्ञान, ही सुदर्शन क्रिया पोहोचवणे गरजेचे आहे.’ रोहिणीजी नमूद करतात की "अगदी या मार्गानेच माझा प्रशिक्षिकेचा प्रवास सुरु आहे. मुंबईपासून ते कर्नाटकातील, छोट्या छोट्या वाड्यांपर्यंत, अगदी ट्रक, टेंपो, बैलगाडीने, चालत जाऊन मी शिबिरे घेतली आहेत. पण शिबीर पूर्ण झाल्यावर, सुदर्शन क्रियेनंतर लोकांच्या जीवनातील सकारात्मक बदल, शांती, आनंद पाहून माझा या प्रवासाचा शीण निघून जायचा. विषम परिस्थितीचा त्रास निघून जायचा.
बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ।।
ज्या तह्रेने गुरुजी सर्वांची काळजी घेतात आणि देशो देशी, गावो गावी सर्वांच्या भल्यासाठी प्रवास करतात हे बघून मला कायम प्रेरणा मिळाली आणि यामुळेच गुरुजी सर्वांचेच प्रेरणास्थान झाले आहेत.
आर्ट ऑफ लिविंग मुळे महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात होतें. ज्या महिलानी शिबीरे केली आहेत त्या समाजात जाऊन सेवा करताहेत, शिबिरे घेताहेत.स्वावलंबी बनताहेत विशेष म्हणजे घरातील पुरुषांची त्याना समंती, प्रोत्साहन मिळते आहे.
युवा नेतृत्व प्रशिक्षण प्रकल्प.
"आज ग्रामीण भागातील युवकां मध्ये शिक्षण आहे, बुद्धी आहे परंतु दिशा नाही, आदर्श नाही. युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबेरांच्या द्वारे या युवकांना गुरुजीच्या रूपाने आदर्श देऊ शकतो. ही शिबीरेच देशाचे भविष्य घडवतील " रोहीणीजी सांगत होत्या .आनंदी पासून खूप आनंदी व्हायचेय, निरोगी पासून अत्यंत निरोगी व्हायचेय तर आर्ट ऑफ लिव्हींग करा. शिबीर न करण्यासाठी काहीही पळवाटा असू शकतील परंतु शिबीर करण्यासाठी हर एक कारण आहे, आनंद प्राप्त करायचाय, शांती हवी आहे, निरोगी रहायचेय, नातेसंबंध आणखी दृढ बनवायचेत -आयुष्य सर्वार्थाने परिपूर्ण बनवायचे आहे- आर्ट ऑफ लिव्हींग शिबीर करा.” रोहिणीजी उत्साहाने सांगत होत्या
हे सर्व ऐकताना रोहिणी दीदींचा उत्साह खालील अभंगातूनच मांडावा लागेल
अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।
मार्गदर्शन, माहिती आणि सेवेसाठी रोहिणीजींशी संपर्क करायचा असल्यास इ मेल - rohini_oak@yahoo.com