नवरात्र उत्सवाची भारतभरातील विविधता | Different Ways Of Celebrating Navratri Across India

विविधतेमध्ये उत्कर्ष आहे. इथली प्रत्येक गोष्ट अनोखी आहे. मग ती भाषा असो, आहार, संस्कृती -  अगदी आपली वस्त्र प्रावरणे देखील. आपण देशाच्या कोणत्या भागात राहतो त्यावर ती अवलंबून असतात. मग याचे मुळीच आश्चर्य वाटायला नको की आपला विशिष्ट प्रादेशिक ठसा उमटवीत विविध प्रथा आणि रुढींप्रमाणे आपल्या पूजनाच्या पद्धतीतही बदल असतात. त्या पूजेच्या विधी विविध आहेत. मात्र यातून देण्यात येणारा संदेश भलेही एकच असेल, पण तो संदेश पोहोचविण्याची पद्धती अगदी वेगळ्याच प्रकारची असू शकते.

ह्याच विविधतेचा उत्सव साजरा करण्याचे ‘नवरात्र’ हे एक उदाहरण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्री. ह्या नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या दरम्यान देवीची नऊ वेगवेगळी रूपे पुजली जातात. हा उत्सव म्हणजे आपण स्वतःला नवचैतन्याने भरून टाकण्यासाठी तसेच आंतरबाह्य शुद्ध होण्यासाठी आपला वेळ आणि सवड देण्याची संधी आहे. तर भारतभरात नवरात्र उत्सव किती विविधतेने साजरा केला जातो ह्यावर आपण एक नजर टाकू या आणि याच्या निखळ विविधतेचे अवलोकन करू या.


उत्तर भारतातील नवरात्र उत्सव | Navratri in North India

उत्तर भारतात नवरात्र उत्सव रावणावर प्रभू रामचंद्रांचा विजय म्हणून साजरा केला जातो. दसऱ्याला रामलीला नाट्याचे यथाविधी सादरीकरण करून ह्या उत्सवाची सांगता होते. 'विजया दशमी' च्या दिवशी दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तींचा विजय साजरा करण्यासाठी रावण आणि कुंभकर्ण ह्यांच्या प्रतिमांचे दहन केले जाते.

देवी माता, तिची निर्मिती असलेल्या आपल्या जीवनातील सर्व रुपे, सर्व कला, संगीत आणि ज्ञान ह्या प्रति आपला परम आदर व्यक्त करण्यासाठी हे नऊ दिवस विशेष पूजा, यज्ञ, होम, उपवास, ध्यान, मौन, गायन, नृत्य आदींनी भरगच्च असतात. समस्त मानवजातीला अज्ञान आणि सगळ्या दुष्ट प्रवृत्तींपासून वाचवणारी तारणहार, रक्षणकर्ता म्हणून देवीला पुजले जाते.

उत्तरेकडील भागात नवरात्रीच्या पर्वावर एकमेकांना भेटी देण्याची प्रथा आहे. त्यात मिठाया, स्त्री पुरुषांसाठी भारतीय वस्त्रे तसेच उपयोगी घरगुती वस्तू इत्यादी भेटीदाखल दिल्या जातात. दिल्लीस्थित वास्तुशास्त्री शोभीता शर्मा कन्यापूजनाबद्दल आपला अनुभव सांगत होत्या. " माझी नवरात्रीची हृद्य आठवण म्हणजे आठव्या, नवव्या दिवशी शेजाऱ्यांकडून आम्हाला आमंत्रण यायचे आणि तिथे आम्हाला देवीसारखे पुजले जायचे. अर्थात, समारंभाच्या अखेरीस मला व माझ्या मैत्रिणींना मिठाई आणि काही दक्षिणा सुद्धा दिली जायची."


पश्चिम भारतातील नवरात्र उत्सव | Navratri in West India

पश्चिम भारतात, विशेषतः गुजरात राज्यात नवरात्र उत्सव गरबा आणि दांडिया रास नृत्याच्या माध्यमातून साजरा केला जातो. गरबा हा नृत्याचा मोहक प्रकार असून त्यात स्त्रिया एका कलशात ठेवलेल्या दिव्याभोवती वर्तुळात फेर धरून आकर्षकरित्या नृत्य करतात. 'गरबा' किंवा 'गर्भा' म्हणजे मातेचा गर्भ. आणि इथल्या संदर्भात कलशातील दिवा प्रतिकात्मकरित्या गर्भातील जीवाला दर्शवतो.तसेच 'गरबा' हे दांडिया नृत्य आहे.ज्यात स्त्रिया आणि पुरुष जोडीने सहभागी होत छोट्या सुशोभित बांबूच्या 'दांडिया' हातात घेऊन नृत्य करतात. ह्या दांडियाच्या टोकाला छोटे घुंगरू बांधलेले असतात आणि जेव्हा दांडिया नृत्याच्या वेळी एकमेकांवर आपटल्या जातात, तेव्हा झंकाराचा नाद करतात. या नृत्याची थोडी बिकट लय असते. नृत्य करणारे धीम्या गतीने सुरुवात करतात आणि मग अगदी बेभानपणे त्यांच्या हालचाली वेग धरू लागतात, तेही अशा प्रकारे की प्रत्येक जण वर्तुळात एकट्याने आपल्या दांडियाने नृत्य करतोच, सोबतच नजाकतीने आपल्या दांडिया जोडीदाराच्या दांडिया समवेत भिडतो.

जिनाक्षी, गुजरात मधील एक होमिओपॅथीक डॉक्टर आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची प्रशिक्षिका या उत्सवाचे वर्णन करताना सांगते, " आम्ही दहाही दिवस दररोज गरबा रात्री नऊ पासून पहाटे चार वाजेपर्यंत खेळत असतो. त्यात स्त्रिया, पुरुष आणि मुले सुद्धा भाग घेतात. प्रत्येक शहर, मग ते अहमदाबाद असो वा बडोदा, त्यांची गरबाची अनोखी वेगवेगळी स्टाईल असते."

“पूजेपेक्षाही जास्त आवड आम्हाला गरबा खेळण्यात असते,  जो गुजरात मधील प्रत्येक सोसायटी व क्लबकडून आयोजित केला जातो. हे नृत्य शिकण्यासाठी प्रत्येक गावागावात आणि शहरात क्लासेस सहजपणे उपलब्ध असतात. त्यात भर म्हणजे अगदी सगळे लोक नवीन ड्रेसेस विकत घेतात, स्त्रियांसाठी चनिया चोली आणि पुरुषांसाठी टर्बन, आणि केडिया. काही लोक रोज उपवास करतात, तरीही रोज संध्याकाळी गरबा खेळण्यासाठी आपली हजेरी लावतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास, "गुजरातला भेट देण्यासाठी आणि ह्या उत्सवपर्वात सहभागी होण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ आहे."


पूर्व भारतातील नवरात्र उत्सव | Navratri in East India

पश्चिम बंगाल आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यात शरद नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस 'दुर्गा पूजा' म्हणून साजरे केले जातात. दुर्गा देवी हाती सारी शस्त्रे घेऊन सिंहावर आरूढ दाखविली जाते. सिंहहा धर्म आणि इच्छाशक्ती दर्शवतो तर शस्त्रे लक्ष्य आणि मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हवी असलेली तीव्रता सूचित करतात. आठवा दिवस हा परंपरेनुसार दुर्गाष्टमीचा असतो. महिषासुराचा वध करताना दर्शविणाऱ्या दुर्गा देवीच्या मुर्त्या उत्कृष्टपणे रेखाटून आणि सजवून मंदिरात आणि इतर ठिकाणी ठेवलेल्या असतात. ह्या मूर्त्यांचे पाच दिवस पूजन केले जाते आणि पाचव्या दिवशी नदीत विसर्जन केले जाते.

कलकत्त्याला इंजिनिअर असलेली जानकी सांगते, "इथे सर्वत्र नवरात्र ‘दुर्गापूजा’ ह्या नांवाने साजरी केली जाते. या सणासाठी आम्ही कित्येक महिने आधीपासून योजना आखायला लागतो. हे पाच दिवस आमचे विश्रांतीचे, परिवाराच्या सोबत घालविण्याचे, तसेच विविध दुर्गा पूजा मंडपांना भेटी देण्याचे असतात, जिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वातावरण आणि वेगवेगळ्या कल्पना असतात. आणि अर्थात दुर्गादेवीच्या विराट मुर्त्या असतात. काही मंडप तर एकदम आगळेवेगळे, अफलातून ध्वनी-प्रकाश योजनेने सजवलेले असतात तर काही अगदी साधे पण मोहक असतात. हीच वेळ असते जेंव्हा स्त्रिया आपल्या ठेवणीतल्या भपकेदार साड्या नेसून मिरवतात, तर पुरुष नवे कुर्ते पायजामे परिधान करतात. पण या सर्वात आवडीचा पूजेचा भाग म्हणजे रोज संध्याकाळी ढोलांच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महाआरतीत भाग घेणे आणि त्यामुळे येणाऱ्या ध्यानमय तंद्रीचा अनुभव घेणे." जानकी भावविभोर होऊन वर्णन करीत होती.


दक्षिण भारतातील नवरात्र उत्सव | Navratri in South India

दक्षिण भारतात नवरात्रीमध्ये मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांना घरी वेगवेगळ्या बाहुल्या आणि छोटे पुतळे ह्यांचे प्रदर्शन असलेला 'कोलू' बघायला आमंत्रित केले जाते. कन्नडमध्ये ह्या प्रदर्शनाला गोंबे हब्बा, तामिळमध्ये बोम्माई कोलू, मल्याळममध्ये बोम्मा गुल्लू तर तेलगूत बोम्माला कोलुवू असे म्हणतात.

कर्नाटक मध्ये नवरात्र म्हणजे दसरा. नवरात्रीच्या नऊही रात्रीला, पुराण कथेतील संदर्भावर आधारीत रात्रभर चालणारे नाट्यमय महाकाव्याचे नृत्य कार्यक्रम, 'यक्षगान'  सादर केले जाते. दुष्टांवर विजयाचे प्रतीक म्हणून मोठ्या थाटामाटात 'म्हैसूर दसरा' साजरा केला जातो. म्हैसूर राजघराण्याकडून आयोजित आणि त्यांची जम्बो सवारी हे मुख्य आकर्षण असलेला हा उत्सव राज्याचा सण मानला जातो.

दक्षिण भारतातील बऱ्याच भागात महानवमीच्या दिवशी 'आयुध पूजा' मोठ्या डामडौलात साजरी केली जाते. शेतीची अवजारे, सर्व प्रकारची अवजारे, पुस्तके, संगीत वाद्ये, उपकरणे, यंत्रे आणि वाहने या दिवशी सजविली जातात आणि त्यांची पूजा केली जाते, तसेच देवी सरस्वतीचे पूजन केले जाते.

दहावा दिवस 'विजया दशमी' म्हणून साजरा केला जातो. केरळमध्ये ह्या दिवशी 'विद्यारंभम्' च्या मुहुर्तावर लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली जाते. दक्षिणेकडील शहर म्हैसूर येथे प्रमुख रस्त्यावरुन चामुंडा देवीची भव्य मिरवणूक काढत दसरा साजरा केला जातो.

अखेरीस नवरात्र हे पर्व आपल्यापेक्षा विशाल असलेल्या चेतनेशी जोडण्याचे पर्व आहे आणि या रूढी-परंपरा त्यासाठी मदतीस येतात. तसेच  हे नऊ दिवस आपल्याला विश्रांतीसाठी, ऊर्जेने भरभरून घेण्यासाठी आणि आपल्या ‘स्व’ सोबत एकरूप होण्यासाठी दिलेले आहेत. म्हणून आपल्या आप्तजनां सोबत आणखी स्नेहाने जुळत खऱ्या अर्थाने जीवनाचा उत्सव साजरा केला जातो.


नवरात्री संबंधित अन्य लेख

  1. चंडी होम | Chandi Homa
  2. नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? | Preperations for Homa during Navratri
  3. नवरात्रीत होणारे ७ होम कोणते ? | Benefits of Homa performed in Navratri
  4. नवरात्रीतील मौन | Silence during Navratri in marathi
  5. नवरात्र उत्सवाची भारतभरातील विविधता | Different Ways Of Celebrating Navratri Across India
  6. आपल्या दैंनदिन जीवनात मंत्र स्नानाचे महत्व | 5 reasons to include mantras in your daily playlist
  7. नवरात्रीतील उपवासाचे महत्व | Importance of fasting during Navratri
  8. २०१८ च्या नवरात्री मध्ये ९ रंगांचे महत्व | Colors of Navratri in Marathi
  9. ललिता सहस्त्रनाम : तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One
  10. देवी तत्व जाणून घेऊया | Understanding Devi
  11. आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Significance of Ayudha Pooja in Marathi

ज्ञानासंबंधी अधिक लेख वाचा | Read more on wisdom

योगाबद्दल अधिक वाचा | Read more about Yoga